Onion Price Hike : सध्या देशभरात टोमॅटोच्या महागाईनं सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला आहे. टोमॅटोचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारकडून आटोकाट प्रयत्न सुरू असतानाच आता कांदा ‘भाव’ खाऊ लागलाय. टोमॅटो पाठोपाठ कांदाही महागल्यास देशभरात रोष निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळं सावध झालेल्या केंद्र सरकारनं गोदामातील कांद्याचा राखीव साठा खुला करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
कांदा व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार काही बाजारपेठांमध्ये कांद्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळं व्यापाऱ्यांकडील मालाचा साठा कमी झाला आहे. त्यामुळं येत्या काही दिवसांत भावात वाढ होऊ शकते. मात्र, केंद्र सरकारकडे सध्या कांद्याचा सुमारे ३ लाख मेट्रिक टनांचा साठा उपलब्ध आहे. संकटकाळात किंवा महागाईच्या वेळी वापरण्यासाठी हा साठा ठेवला जातो. आता कांद्याच्या वाढत्या किंमती आटोक्यात ठेवण्यासाठी हा साठा खुला करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.
टोमॅटोसह हिरव्या भाज्यांचे भाव वाढल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला आधीच मोठा फटका बसला आहे. त्यात कांदा महागल्यास डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत याची जाणीव सरकारला आहे. त्यामुळंच सरकारी पातळीवर तातडीनं हालचाली झाल्या.
केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी नाफेड आणि एनसीसीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक घेतली. कांद्याचा साठा खुला करण्याविषयी या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर आज हा साठा खुला करण्यात आला. ज्या बाजारपेठांमध्ये कांद्याचा दर, देशातील सरासरी भावापेक्षा अधिक आहे, तिथं हा कांद्याचा साठा पोहोचवला जाणार आहे. त्याचबरोबर राज्यांना सवलतीच्या दरात कांदा उपलब्ध करून देण्याचा निर्णय देखील केंद्रानं घेतला आहे. ई लिलाव किंवा ऑनलाइन विक्रीच्या माध्यमातून कांदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या पर्यायाचीही चाचपणी सरकार करत आहे.
शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा अतिवृष्टीमुळं खराब झाला आहे. त्यामुळे पुरवठ्यावर परिणाम झाला आहे, अशी माहिती राज्यातील एक कांदा विक्रेते नरेंद्र यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना दिली.
संबंधित बातम्या