Income tax filing : पगारदार करदाते असाल तर 'या' पाच गोष्टी नीट लक्षात ठेवा, अन्यथा होईल मनस्ताप
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Income tax filing : पगारदार करदाते असाल तर 'या' पाच गोष्टी नीट लक्षात ठेवा, अन्यथा होईल मनस्ताप

Income tax filing : पगारदार करदाते असाल तर 'या' पाच गोष्टी नीट लक्षात ठेवा, अन्यथा होईल मनस्ताप

May 20, 2024 12:26 PM IST

Income tax filing tips for salaried taxpayers : कर विवरणपत्र योग्य पद्धतीनं फाईल करता यावं यासाठी पगारदार करदात्यांनी काही गोष्टी नीट लक्षात घ्यायला हव्यात. कोणत्या आहेत या गोष्टी?

Income tax : पगारदार करदाते असाल तर 'या' पाच गोष्टी नीट लक्षात ठेवा
Income tax : पगारदार करदाते असाल तर 'या' पाच गोष्टी नीट लक्षात ठेवा

Income tax filing tips for salaried taxpayers : प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची ३१ जुलै ही अंतिम मुदत जवळ येत आहे. त्यामुळं आता अनेकांची तारांबळ उडालेली दिसेल. लवकरात लवकर कर विवरणपत्र भरता यावं यासाठी आवश्यक कागदपत्रे, फॉर्म आणि इतर माहिती घेणं आवश्यक आहे. 

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यापूर्वी काही साध्या गोष्टींची पूर्तता करणं गरजेचं असतं. त्यात आधार कार्ड पॅनशी लिंक असणं, परतावा व्यवस्थित मिळावा यासाठी योग्य बँक खात्याचा योग्य तपशील देणं गरजेचं असतं. पगारदार करदात्यांना प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर) दाखल करण्यासाठी आवश्यक असलेल्या काही महत्त्वाच्या तपशीलांची माहिती इथं देत आहोत. तुम्ही पगारदार करदाते असाल तर खालील मुद्द्यांची नोंद घ्या…

योग्य फॉर्म

कर विवरणपत्र भरण्याआधी योग्य आयटीआर फॉर्म निवडा. अन्यथा, तुम्हाला योग्य फॉर्म वापरून पुन्हा सुधारित आयटीआर भरावा लागेल. जर तुम्ही पगारदार करदाते असाल तर इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी तुम्हाला आयटीआर-१ भरावा लागेल.

आयटीआर-१ म्हणजे काय?

ज्याचं एकूण उत्पन्न आर्थिक वर्षात ५० लाख रुपयांपेक्षा जास्त नाही, अशा निवासी व्यक्तींना आयटीआर-१ भरता येतो. यात पगारातून येणारं उत्पन्न, एक घर, कौटुंबिक पेन्शन, कृषी उत्पन्न (५,००० रुपयांपर्यंत) आणि इतर उत्पन्नाचा समावेश आहे. बचत खात्यावरील व्याज, ठेवींवरील व्याज आणि वाढीव नुकसान भरपाई किंवा कौटुंबिक पेन्शनवर मिळणारं व्याज यांचाही यात समावेश आहे.

आयटीआर-१ कोणाला भरता येत नाही?

ज्यांचं उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा अनिवासी भारतीयांना आयटीआर -१ दाखल करता येणार नाही. लॉटरी, अश्वशर्यत, कायदेशीर जुगारातून उत्पन्न मिळालेलं असेल, करपात्र भांडवली नफा (अल्पकालीन किंवा दीर्घ मुदतीचा) आणि असूचीबद्ध इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल आणि एकापेक्षा जास्त घरांच्या मालमत्तेतून मिळालेलं उत्पन्न असेल तर अशा व्यक्तींनाही आयटीआर १ चालत नाही.

आयटीआर भरण्याआधी कोणती कागदपत्रे हवीत?

आपल्याला एआयएस (वार्षिक माहिती विवरण) डाउनलोड करावं लागेल आणि फॉर्म १६, घरभाडे पावती (लागू असल्यास), गुंतवणूक देय प्रीमियम पावती (लागू असल्यास) च्या प्रती ठेवाव्या लागतील. अर्थात, करदात्यांनी आपल्या विवरणपत्रासोबत कोणतीही कागदपत्रे (उदा. गुंतवणुकीचा पुरावा, टीडीएस प्रमाणपत्र) जोडणं गरजेचं नाही. मूल्यांकन किंवाचौकशीसाठी कर अधिकाऱ्यांनी ही कागदपत्रं मागवल्यास ती सोबत असणं आवश्यक आहे.

आयटीआर भरताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या?

> सर्वप्रथम एआयएस आणि फॉर्म २६ एएस डाउनलोड करा आणि टीडीएस / टीसीएस तपासा. काही विसंगती असल्यास त्याची जुळवाजुळव नक्की करा.

>आपला आयटीआर भरताना द्यावयाची कागदपत्रे उदा. बँक स्टेटमेंट / पासबुक, व्याज प्रमाणपत्रे, सूट किंवा वजावटीचा दावा करण्याच्या पावत्या, फॉर्म १६, फॉर्म २६ एएस (वार्षिक माहिती विवरण), गुंतवणुकीचे पुरावे इत्यादी संकलित आणि काळजीपूर्वक तपासण्याची खात्री करा.

> करदात्यांनी पॅन, कायमचा पत्ता, संपर्क तपशील, बँक खात्याचा तपशील इत्यादी तपशील योग्य असल्याची खात्री करावी.

> रिटर्न ई-फाइल केल्यानंतर त्याचं ई-व्हेरिफिकेशन करा. तुम्हाला तुमच्या रिटर्नची मॅन्युअली पडताळणी करायची असेल तर तुम्ही आयटीआर-व्ही पावतीची स्वाक्षरी केलेली फिजिकल कॉपी (स्पीड पोस्टद्वारे) सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटर, इन्कम टॅक्स विभाग, बेंगळुरू ५६०५०० या पत्त्यावर पाठवू शकता.

Whats_app_banner