दुबईत आमच्या अदील ट्रेडिंग कंपनीची वाटचाल छान चालली होती. सुपर स्टोअर्सची संख्या वाढू लागली होती. मी वयाच्या तिशीत असल्याने अंगात भरपूर उत्साह व डोळ्यात प्रगतीची महत्त्वाकांक्षा होती. नेमक्या याच टप्प्यावर मला आयुष्यातील पहिला गुप्तशत्रू भेटला. व्यवसायात भोळे नव्हे, तर बेरकी असावे लागते, हा धडा अद्याप मला शिकायचा होता. त्यातून माझा स्वभाव बोलका आणि दुसऱ्यावर विश्वास टाकण्याचा होता. आमची कंपनी दुबईतील बड्या पुरवठादारांच्या गटात समाविष्ट झाल्यानंतर मला तेथील व्यापारी वर्तुळातून मेजवानीची आमंत्रणे येऊ लागली. व्यवसाय वाढवण्यासाठी जेवढ्या अधिक ओळखी होतील तितके बरे, या हिशेबाने मी प्रत्येक मेजवानीला जायचो. तेथे मी आमच्या कंपनीच्या प्रगतीविषयी आणि आगामी योजनांविषयी दिलखुलास माहिती द्यायचो. ऐकणारेही मिठ्ठासपणे प्रशंसा करायचे.
काही काळाने मला जाणवायला लागले, की सरकारी कार्यालयांतील आमची परवान्याची कामे विनाकारण रखडत आहेत. सर्व कागदपत्रे व्यवस्थित असुनही विलंब का व्हावा, हा प्रश्न मला पडला, पण त्याचे उत्तर काही केल्या मिळत नव्हते. अखेर ‘पाचामुखी परमेश्र्वर’ या म्हणीवर विसंबून मी माझी समस्या परिचित व्यावसायिकांपुढे मांडू लागलो. अनेकांनी अनेक सल्ले दिले, पण एका वयोवृद्ध व्यापाऱ्याने मात्र पहिला प्रश्न विचारला, “तू कुणाला दुखावले तर नाहीस ना?” त्यावर मी चमकलो. माझे कुणाशीच शत्रुत्व नसल्याचे सांगताच ते म्हणाले, “कामात विनाकारण अडथळे येणे, हे अज्ञात गुप्तशत्रूचे काम असू शकते. ही व्यक्ती आपले मित्र, नातलग, समव्यावसायिक यापैकी कुणीही असू शकते. एका गझलमध्ये म्हटल्याप्रमाणे ‘दोस्त होता नहीं हर हाथ मिलानेवाला’, हे लक्षात ठेव.” त्या अनुभवी गृहस्थांचे बोलणे ऐकत असताना मला माझ्या बाबांनी पूर्वी दिलेला इशारा आठवला. ते म्हणायचे की ‘व्यावसायिकाने ग्राहकांशी भरपूर बोलावे, सरकारी व कंपन्यांच्या उच्चाधिकाऱ्यांशी मोजके बोलावे आणि अनोळखी व्यावसायिकांशी तर ख्यालीखुशालीखेरीज काहीही बोलू नये.’
मी आमच्या कंपनीच्या प्रगतीविषयी स्पर्धकांपुढे भरभरुन बोलत होतो, नेमकी तीच गोष्ट माझ्यासाठी अडचणीची ठरत होती. पण यातून धडा घेऊन मी योग्य वेळी शहाणा झालो आणि नंतर व्यावसायिक मेळाव्यांमध्ये मोजके बोलू लागलो. उत्पन्न काय मिळतंय, असे कुणी विचारले तर ‘बस, दाल-चावल निकल जाता है’, असे सांगून सटकू लागलो. त्यानंतर माझ्यापुढील अडचणी हळूहळू कमी होत गेल्या. त्या अनुभवी व्यापाऱ्याचा आडाखा अचूक होता. मी माझ्या समूहाच्या प्रगतीची माहिती देत असताना कुणीतरी शांतपणे ते ऐकत असे आणि वरकरणी प्रशंसा करत मनातून मात्र जळफळे. तो गुप्तशत्रू अखेरपर्यंत गुप्तच राहिला पण मला शहाणे करुन गेला. काही लोक आपला द्वेष स्पष्टपणे बोलून दाखवतात.
एका कार्यक्रमात असेच बोलत असताना ग्रुपमधील एकजण अनपेक्षितपणे मला म्हणाला, “कशाला व्यवसाय वाढवताय? एक दिवस त्या ओझ्याखाली दबून मराल. व्यवसाय जितका लहान आणि आटोपशीर तेवढी जोखीम कमी राहते.” मी त्याच्या या उद्गारांचा मनाशी अर्थ लावत असताना कार्यक्रमाचे संयोजक माझ्या कानात पुटपुटले, “त्याच्याकडे लक्ष देऊ नका. घनचक्कर आहे तो. स्वतःचा व्यवसाय बुडवून बसलाय आणि आता त्याला कुणाचेच चांगले बघवत नाही.” मी आश्चर्यचकितच झालो. अशीही माणसे असतात एकंदर.
व्यवसाय कशाला, अगदी रोजच्या आयुष्यातही अशा द्वेष्ट्या व्यक्तींची गाठ पडते. मी मुंबईला पूर्वी ज्या जुन्या इमारतीत राहायचो तेथे मजल्यावरच्या शेजाऱ्यांखेरीज माझी इतर कुणाशी ओळख नव्हती. प्रत्येकजण आपापल्या कामात गुरफटलेला असायचा. एक दिवस माझ्या कारचा ड्रायव्हर सांगत आला, की काही दिवस कुणीतरी माझ्या कारवर फरशी पुसलेले गढूळ पाणी टाकत होते. आम्ही लक्ष ठेऊन हा प्रकार करणाऱ्या व्यक्तीला पकडले तर ती वरच्या मजल्यावर राहणारी बाई निघाली. मी चक्रावून गेलो. वास्तविक तीही सुखवस्तू होती आणि तिच्या नवऱ्याकडेही गाडी होती मग तिने असे का करावे? ते कारण समजताच मी आश्चर्यचकित झालो. तिच्या नवऱ्याचा व्यवसाय म्हणावा तसा चालत नसल्याने ती मनातून कुढत होती. त्यातून मनोवृत्ती मत्सरी बनून ती असे प्रकार करायची.
मित्रांनो, आपल्यावर जळणाऱ्या व्यक्तींच्या नादी लागल्यास वेळ वाया जातो आणि विकासही खुंटतो. तसे पाहता दुर्जनांचे मन आपण बदलू शकत नाही. प्रगतिपथावर वाटचाल सुरू होताच छुपे रुस्तूम भेटतातच. त्यांच्यापासून एकीकडे सावध राहात शांतपणे आपल्या व्यवसाय-चरितार्थाकडे लक्ष देणे उत्तम.
संबंधित बातम्या