IPO investment Tips : शेअर मार्केटमध्ये पैसे कमावण्याच्या अनेक पर्यायांपैकी आयपीओ हा देखील एक पर्याय आहे. काही गुंतवणूकदार यातून बऱ्यापैकी कमाई करतात, तर अर्धवट माहितीच्या आधारे गुंतवणूक करणारे पोळूनही निघतात. यंदाच्या वर्षातील पहिल्या सहा महिन्यांत अनेक आयपीओ बाजारात आले. मात्र, बहुतेक आयपीओंनी गुंतवणूकदारांची निराशा केली. अवघ्या काही आयपीओंनी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले.
लिस्टिंगच्याच दिवशी बंपर नफा मिळवण्याच्या उद्देशानं IPO मध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांना मागच्या महिन्यात मोठा फटका बसला. अनेकांचे पैसे आता अडकून पडले आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशीही या गुंतवणूकदारांना दिलासा मिळू शकलेला नाही. हे सगळं टाळण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
अतिउत्साही गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये जास्त नुकसान सहन करावं लागतं. हे गुंतवणूकदार मागील आयपीओंची कामगिरी किंवा त्यांच्या मित्रांनी मिळवलेला नफा पाहून सट्टा लावताना दिसतात. त्यामुळं त्यांचं नुकसान होण्याची शक्यता जास्त असते.
तुम्ही गुंतवणूक करणार असलेल्या कंपनीचं मूल्यांकन आणि भविष्य काय आहे? कंपनी सध्याच्या क्षेत्रात टिकू शकते का? कंपनीचे मूल्य तिच्या सध्या कामगिरीशी मिळतंजुळतं आहे का?
आयपीओच्या माध्यमातून उभारलेला निधी कंपनी नेमका कुठं वापरणार हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे.
कंपनीचं व्यवस्थापन, ध्येयधोरणे इत्यादींचाही अभ्यास आवश्यक आहे.
कोणत्याही कंपनीच्या आयपीओची ग्रे मार्केटमधील कामगिरी लक्षात घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं. IPO च्या शेवटच्या दिवसापर्यंत ग्रे मार्केट प्रीमियम म्हणजेच GMP ची वाट पाहणं अधिक श्रेयस्कर ठरतं. त्यातून कंपनीचा शेअर काय कामगिरी करू शकतो याचा अंदाज येऊ शकतो.
शेवटच्या दिवशी पैसे गुंतवल्यानं आयपीओला पहिल्या दोन दिवसांत नेमका कसा प्रतिसाद मिळाला आहे हे देखील कळू शकतं.
नवीन गुंतवणूकदार, नातेवाईक किंवा यूट्यूब चॅनेलच्या सल्ल्यानं पैसे गुंतवणं चुकीचं आहे. अनुभवी शेअर बाजार तज्ञाचा सल्ला घेऊनच हा निर्णय घ्यावा.