काही दिवसांपूर्वी एक मित्र भेटला. नोकरीमध्ये १५ वर्षे काढल्यानंतर त्याने स्वतःचा व्यवसाय सुरु केला होता. कारकीर्दीची नवी इनिंग सुरु केल्याबद्दल मी त्याचे अभिनंदन केले, पण तो काहीसा उदास वाटत होता. धंद्यात नवखा असल्याने त्याला टेन्शन आले असावे की काय, अशा शंकेने मी त्याला दिलासा आणि उमेद देऊ लागलो. त्यावर तो म्हणाला, “मला माझ्या नव्या व्यवसायात काहीच समस्या नाही. मी वेगळ्याच कारणाने खिन्न आहे. आजच्या जगात माणुसकी राहिलेली नाही. प्रत्येकजण व्यवहारी झाला आहे. लोक अगदी मैत्री-नातेसंबंधही मोजून-मापून ठेवत आहेत. त्याचा मला त्रास होतोय बघ.”
झाले होते ते असे, की हा माझा मित्र काही कामानिमित्त त्याच्या जुन्या नोकरीच्या ठिकाणी गेला होता. आपल्याला भेटून जुन्या सहकाऱ्यांना आनंद होईल आणि ते भरभरुन गप्पा मारतील, असे त्याला वाटले होते, पण प्रत्यक्षात मात्र वेगळाच अनुभव आला. पूर्वी दिलखुलास थट्टा-मस्करी करणाऱ्या, परस्परांची कामे वाटून घेणाऱ्या आणि लंच टाईममध्ये टिफीन शेअर करणाऱ्या सहकाऱ्यांच्या बोलण्यात जिव्हाळा नसून आता एक प्रकारचा कोरडेपणा आला होता. आपल्या एका सहकाऱ्याने नोकरी सोडून व्यवसाय सुरु केल्याच्या धाडसाचे कुणालाही कौतुक नव्हते. प्रत्येकजण त्याच्याशी जेवढ्यास तेवढे बोलून आपण कामात गर्क असल्याचा आवीर्भाव आणत होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांची तर औरच तऱ्हा. एक कामसू माणूस आपल्या ऑफिसमधून नोकरी सोडून गेला, याचाच राग त्यांच्या तुटक संभाषणातून जाणवत होता.
या सगळ्यावर कडी म्हणजे कंपनीचा हिशेब विभाग (अकाऊंट्स सेक्शन) त्याचे न्याय्य देणे रक्कम देण्यास उशीर करत होता. त्यांच्या दृष्टीने तो आता माजी कर्मचारी झाला असल्याने त्याची संचित रक्कम देण्यात मुद्दाम वेळकाढूपणा चालला होता. माणसांची अशी क्षणार्धात बदललेली वागणूक अनपेक्षित असल्याने माझा मित्र उद्विग्न झाला होता.
मला त्याचा अनुभव ऐकून वाईट वाटले. मित्राची समजूत काढताना मी म्हणालो, “हे बघ. आता तू नवा डाव मांडला आहेस ना? मग जुन्या आठवणी विसरुन जा. व्यवसाय वाढवण्यावर लक्ष दे आणि तुझ्या हाताखाली जे कर्मचारी काम करतील त्यांना असा क्लेशदायी अनुभव येऊ नये, याची काळजी घे. आपले कर्मचारी हे निव्वळ साधन नसून संपत्ती असतात. त्यांना जप. जग कितीही व्यवहारी आणि कोरडे वागले तरी आपण मात्र अंतरीचा उमाळा जपून ठेवावा. खात्रीने सांगतो, की माणसे जोडणे कुणालाही शक्य असते. मी स्वतः माझ्या व्यवसायात कर्मचारी व ग्राहकांप्रती भावनेचा ओलावा जपून ठेवला आहे. लक्षात ठेव, प्रेमाची गुंतवणूक ही सर्वश्रेष्ठ असते.”
नातेसंबंधांची ओढ असणाऱ्या संवेदनशील व्यक्तींची ही व्यथा खरोखर विचार करण्यासारखी आहे. नोकरी पत्करली म्हणजे कुणी वेठबिगार होत नसतो किंवा व्यवसायाचा मालक झाला म्हणून काही तो जगन्नियंता होत नसतो. प्रत्येकजण आपल्या जीवनाचा शिल्पकार असतो आणि भाग्योदय करुन घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. म्हणूनच माझ्याकडचा कुणी कर्मचारी नोकरी सोडून जात असेल तर मी त्याला अडवत नाही. उलट अन्य एखादी कंपनी जास्त पगार देऊन बोलावते, ही त्याच्यासाठी उत्कर्षाची संधीच असते. आपण आपल्या स्वार्थासाठी त्याची वाट कशाला अडवायची? उलट जमेल तेवढे पाठीवर हात ठेऊन ‘चल पुढे,’ असा विश्वास द्यावा, प्रेमाची वर्तणूक ठेवावी. माझ्या कंपनीतील कुणीही नोकरी सोडून अन्यत्र जात असेल तर त्याचे देणे तत्काळ चुकते झाले पाहिजे आणि तो चेहऱ्यावर समाधान व नवी उमेद घेऊन गेला पाहिजे, अशी माझी आमच्या हिशेब विभागाला सख्त सूचना असते.
ग्राहकांबाबतही आम्ही तेच धोरण राबवतो. एकदा आमच्या स्टोअरमध्ये ग्राहक आला, की तो निव्वळ ग्राहक न राहता अदील परिवाराचाच सदस्य बनावा, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो. निरपेक्ष वृत्तीने माणसे जोडण्याच्या स्वभावामुळेच कंपनीतून काम सोडून गेलेल्या कर्मचाऱ्यांशी माझे आजही आपुलकीचे संबंध आहेत. माझ्याकडे अँथनी नावाचा एक ड्रायव्हर होता. अनेक वर्षे काम केल्यानंतर त्याला आपल्या मूळ गावी कुटुंबासमवेत राहण्याची इच्छा झाली. तो कायमचा गोव्याला निघून गेला. फोनवरुन त्याच्याशी बोलताना त्याचा समाधानाचा स्वर मला आनंद देऊन जाई. दुर्दैवाने अँथनीला कमरेचा कर्करोग झाला. मी अँथनीच्या उपचारांचा सर्व खर्च केला, पण तो त्यातून वाचू शकला नाही. अँथनीचे कुटुंबीय आजही माझ्या संपर्कात असतात. आजवर अशा अनेक लोकांच्या सदिच्छा मला लाभल्या असून तोच माझा समाधानाचा ठेवा आहे.