अखंड सावधानतेचे महत्त्व मला स्वतः व्यवसाय सांभाळू लागलो तेव्हा दोन-तीन वेळा ठेच बसल्यानंतर उमगले. दुबईत आमच्या अल अदील ट्रेडिंग कंपनीची पाच गोदामे (गोडाउन्स) औद्योगिक वसाहतीत होती. त्यातील चार गोदामे एकाच कंपाऊंडमध्ये लागून होती तर पाचवे गोदाम दुसऱ्या कंपाऊंडमध्ये स्वतंत्र होते. एकदा शेजारच्या गोदामाचा मालक फटाक्यांचा साठा उतरवून घेत असताना दुर्दैवाने ठिणगी पडून त्या साठ्याचा जबरदस्त स्फोट झाला आणि त्यामुळे आमच्याही सर्व गोदामांचे आत साठवलेल्या मालासह नुकसान झाले. मी स्वतः त्या स्फोटातून जिवानिशी वाचलो. गोदामांचा व मालाचा विमा उतरवलेला असल्याने नुकसान भरपाई मिळण्याबाबत मी निश्चिंत होतो. पण प्रत्यक्षात विमा भरपाई मिळवणे फार जिकीरीचे ठरले.
मी चार गोदामांचा विमा एका कंपनीकडून, तर पाचव्या गोदामाचा विमा दुसऱ्या कंपनीकडून घेतला होता. कागदपत्रे-जाबजबाब सादर करुन चिकाटीने पाठपुरावा केल्यावर मला त्यातील चार गोदामांची नुकसान भरपाई संपूर्ण नव्हे, तरी बऱ्यापैकी मिळाली. पण दुसऱ्या कंपनीने मात्र दाव्यात अनेक त्रुटी काढून आणि नियमांवर बोट ठेऊन माझ्या पाचव्या गोदामासाठी नुकसान भरपाई नाकारली. संबंधित एजंटला विचारले असता त्याने कारणादाखल पॉलिसीच्या कागदपत्रात शेवटी अगदी बारीक अक्षरात लिहिलेल्या अटी मला दाखवल्या. मला धक्का बसला, पण चूक माझीच होती. पॉलिसी घेतल्यानंतर मी ती बारकाईने वाचलीच नव्हती.
खऱे तर मी कंपनीच्या दावा निराकरण तसेच भरपाईविषयक अटी व शर्ती एजंटकडून आधीच समजून घ्यायला हव्या होत्या. या निष्काळजीपणाचा फटका मलाच बसला. झालेल्या नुकसानीच्या बदल्यात अगदीच मामुली रक्कम मला भरपाई म्हणून मिळाली. या अनुभवाने माझे डोळे खऱ्या अर्थाने उघडले. तेव्हापासून नंतर मी हातात येणारा प्रत्येक कागद बारकाईने वाचून बघायला लागलो. इंग्रजी वाक्यांचा अर्थ समजला नाही तर सल्लागाराला विचारु लागलो. या सवयीचा मला पुढे खूप फायदा झाला.
दुबईत माझ्या खूपशा ओळखी होत्या. माझ्या मित्राला एकदा अधिकारपत्र (पॉवर ऑफ ॲटर्नी) व इच्छापत्र (वुईल) यासंदर्भातील कायदेशीर प्रक्रियेसाठी कुणी वकील हवा होता. मी उत्साहाने मित्राला एका ओळखीच्या वकिलाकडे घेऊन गेलो. मित्रानेही पूर्ण विश्वासाने समोर आलेल्या सर्व कागदपत्रांवर सह्या केल्या आणि त्यावर न्यायालयात शिक्कामोर्तबही झाले. मित्राला तातडीने मुंबईला जायचे असल्याने तो ती कागदपत्रे माझ्या ताब्यात सोपवून निघून गेला. दुसऱ्या दिवशी मी सहज ती कागदपत्रे चाळत असताना माझे लक्ष कागदपत्रातील मजकुराकडे गेले आणि वाचत असताना मला धक्काच बसला.
त्या वकिलाने ते अधिकारपत्र खुशाल स्वतःच्या नावाने बनवून घेतले होते. वकिलाच्या नावाची शिफारस मीच केली असल्याने आणि मित्राने माझ्यावर पूर्ण विश्वास टाकला असल्याने मी पेचात सापडलो. लिखापढीतील घातपाताचा हा अनुभव माझ्यासाठी नवीन होता. प्रश्न त्या वकिलाच्या लबाडीचा नसून माझ्या शिफारसीचा होता. दुसरी गोष्ट म्हणजे त्या व्यवहारासाठी मी साक्षीदार असल्याने एकप्रकारे माझीही काही नैतिक जबाबदारी होती. अखेर ‘स्नेह्यासाठी पदरमोड कर, परंतु जामीन राहू नको’, हा शाहीर अनंत फंदींच्या फटक्यातील इशारा आठवत मी स्वतः खर्च करुन मित्राला तातडीने बोलवून घेतले आणि पुन्हा सव्यापसव्य करुन ते कागदपत्र अचूक बनवून घेतले. यासंदर्भात वकिलाकडे विचारणा करता टायपिस्टच्या नजरचुकीने नावांची अदलाबदल झाल्याची सफाई देऊन त्याने स्वतःची जबाबदारी झटकून टाकली.
पूर्वी एजंट व विमा कंपनीबाबत जो अनुभव आला तसेच येथे घडले होते. मी कागदपत्र बारकाईने बघितले नसते तर पुढे ही चूक मित्राला महागात पडली असती. ब्रिटीशांचा भारतावर अंमल असताना कागदी घोड्यांना फार महत्त्व प्राप्त झाले. पूर्वी शब्द, शपथ व विश्वासाला महत्त्व होते, परंतु न्यायालयीन खटल्यांत कागदोपत्री नोंद हाच महत्त्वाचा पुरावा ठरु लागल्याने सामान्य निरक्षर लोकांचे फार नुकसान झाले. कर्जाच्या कागदावर काय लिहीले आहे याची माहिती नसल्याने व भोळेपणाने अंगठा उठवल्याने निरक्षर गरीबांच्या जमिनी कालांतराने सावकारांनी वसुलीच्या नावावर घशात घातल्याची उदाहरणे आहेत.
मित्रांनोऽ एखाद्यावर काम सोपवलेत तरी त्याचा वेळोवेळी आढावा घ्या. आवश्यक कागदपत्रांचा व नियम- प्रक्रियांचा अर्थ स्वतः किंवा जाणकारांकडून समजून घ्या. व्यवहाराची कागदपत्रे काळजीपूर्वक सांभाळून ठेवा. कायदेशीर कागदपत्रातील चुका कुसळाइतक्या क्षुल्लक असल्या तरी कालांतराने मुसळ बनू शकतात. पत्रात ‘ध’ चा ‘मा’ झाला तर पेशवाईत मोठे राजकारण घडले. म्हणूनच अखंड सावधान असावे, हे उत्तम.
संबंधित बातम्या