निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन: स्वतःचा पैसा अखेरपर्यंत ताब्यात ठेवणे शहाणपणाचे…-importance of financial independence post retirement ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन: स्वतःचा पैसा अखेरपर्यंत ताब्यात ठेवणे शहाणपणाचे…

निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन: स्वतःचा पैसा अखेरपर्यंत ताब्यात ठेवणे शहाणपणाचे…

HT Marathi Desk HT Marathi
Sep 27, 2024 10:34 PM IST

नोकरी-व्यवसायातून निवृत्त झाल्यावर अनेकजण मायेपोटी स्वकष्टार्जित संपत्ती व मालमत्ता मुलांच्या हवाली करतात. नेमकी हीच कृती शहाणपणाची न ठरता पुढे पश्चात्तापाची ठरते. कारण वृद्धापकाळात फक्त दोघेच आपली खरी साथ करतात. आपला जोडीदार आणि पैसा...

निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन कसे करावे
निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन कसे करावे

 

धनंजय दातार

मागे एकदा मी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली होती. शेकडो कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या एका उद्योगपतीने निवृत्तीनंतर सर्व कारभार, अधिकार, संपत्ती व मालमत्ता मुलाच्या हाती सोपवले आणि नंतरच्या काळात वृद्धावस्थेत बिचाऱ्यावर एक हक्काचे घर मिळवण्यासाठीही न्यायालयात दाद मागण्याची वेळ आली. त्याक्षणी मला नटसम्राट नाटकातील गणपतराव बेलवलकर ही वृद्ध नटाची व्यक्तीरेखा आणि तिने कळवळून विचारलेला ‘कुणी घर देता का घर?’ हा प्रश्न आठवला. 

घर श्रीमंताचे असो, मध्यमवर्गीयाचे असो वा गरीबाचे असो, असहाय्य वार्धक्याची ही कहाणी बहुतेक ठिकाणी समानच घडताना दिसते. पण याला जबाबदारसुद्धा ती व्यक्ती स्वतः असते, जी भावनेच्या भरात आपली सर्व संपत्ती मुलाबाळांच्या हाती सोपवते. एकदा आपणहून पराधीन झाल्यानंतर नंतर साध्या-साध्या गोष्टींसाठी मुलाबाळांकडे याचना करावी लागते. याचना केल्यावर माणसाची किंमत संपते. उतार वयातही याचना न करता सन्मान टिकवून ठेवायचा असेल तर शहाण्याने आपला पैसा व मालमत्ता मरेपर्यंत ताब्यात ठेवावी. जिवंत असेपर्यंत आपण, आपल्या पश्चात आपला जोडीदार आणि त्याच्यानंतर मग मुलाबाळांचा अधिकार संपत्तीत ठेवावा, ही शिकवण मला माझ्या वडिलांनी दिली.

माझ्या बाबांनी निवृत्त होताना दुकानांची जबाबदारी माझ्यावर सोपवली असली तरी मालकी हक्क कधीच सोडला नाही. उलट माझ्या ताब्यात कारभार देताना एक अट घातली. वार्षिक नफ्याचा एक ठराविक हिस्सा मी त्यांना त्यांच्या हयातीच्या अखेरपर्यंत द्यायचा व उरलेल्या नफ्यात माझ्या कुटुंबाचा, दुकानाचा आणि गुंतवणुकीचा खर्च चालवायचा. मला यात काहीच खटकले नाही कारण तो व्यवसाय माझ्या बाबांनी स्वकष्टाच्या पुंजीतून सुरु केला होता. तेच त्याचे मालक होते. आमच्यातील करारानुसार मी दर सहा महिन्यांनी नफ्याचा हिस्सा बाबांच्या हवाली करत राहिलो. तेसुद्धा हिशेबाच्या बाबत काटेकोर आणि चौकस असत. 

मी एकदा धाडसाने त्यांना विचारले होते, “बाबा, तुम्ही सुनांचे-नातवंडांचे भरपूर लाड करता, पण मी तुमचा मुलगा असून मला मात्र हिशेब मागता. माझ्यावर विश्वास नाही का?” त्यावर बाबा रोखठोक म्हणाले, “दादा, यात विश्वासाचा प्रश्न नाही. मी तुझ्या ताब्यात दुकाने सोपवली तीच संपूर्ण विश्वासाने, पण मी व्यवहार आणि भावनांची गल्लत करणार नाही. मी पूर्वीही कधी मिंधा नव्हतो आणि यापुढेही राहणार नाही. तुझ्याकडून मी नफ्यातील हिस्सा घेतो तो माझ्या मालकी हक्काचा आहे, तुझ्या दयेचा नाही. एक दिवस तुलाही वृद्धत्व येईल म्हणून लक्षात ठेव. ‘आपकमाईची किंमत असते, पण बापकमाईची फिकीर नसते.’ म्हणून आपला पैसा नेहमी आपल्याच ताब्यात ठेवावा.” 

मला एक गोष्ट आठवते. एका दांपत्याला एकुलता एक मुलगा असतो. लहानपणापासून लाडात वाढवलेल्या मुलाचे लग्नही ते थाटात करुन देतात. नवी सून घरात आल्यावर सुरवातीला सासू-सासऱ्यांचे अगत्य करु लागते व मुलगाही आई-वडिलांची नियमित विचारपूस करत असतो. एक दिवस सुनेच्या सल्ल्यानुसार मुलगा मोठे घर घेण्याचे ठरवून वडिलांकडे पैसे मागतो. आई-वडीलही मायेपोटी साठवलेली सर्व पुंजी त्याच्या हवाली करतात. नव्या घरात गेल्यावर मात्र मुलगा आणि सुनेचे वागणे बदलते. वृद्ध आई- वडिलांची रवानगी देवघराच्या खोलीत होते. सासू-सासऱ्यांकडे आता काही डबोले उरले नाही, याची खात्री झाल्याने सुनेचे वागणे बदलते. त्यातच दांपत्यातील पत्नीचे निधन होते. तिच्या माघारी पतीची उपासमार सुरू होते. हा कोंडमारा असह्य झाल्याने तो वृद्ध आपली कहाणी मित्राला सांगतो. मित्र त्याला एक कानमंत्र देतो. त्यानुसार रोज रात्री दार बंद करुन तो वृद्ध एका तपेल्यात नाण्यांचा आवाज करुन पाच हजार-दहा हजार असे आकडे मोठ्या आवाजात मोजायला लागतो. ते कानावर पडताच सून सावध होते व नवऱ्याला सांगते. नंतर दोघांचे वागणे बदलते आणि ते वडिलांची विचारपूस करु लागतात. एक दिवस वृद्ध पिता राम म्हणतो. लोभी मुलगा व सून तपेले उघडतात तर त्यात एक रुपयाची केवळ १०० नाणी असतात आणि तीसुद्धा मित्राला देण्यासाठी असतात. 

मित्रांनो! वृद्धापकाळ खरंच सुखी, सन्मानाचा आणि सोनेरी ठरण्यासाठी पैसा खूपच गरजेचा असतो. ऑस्कर वाइल्डचे एक वाक्य आहे. 

When I was Young, I thought that money was the most important thing in life;

now that I am old, I know that it is. 

(अर्थ – मला तरुणपणी वाटायचे, की पैसा ही जीवनातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. आता वृद्ध वयात

समजतंय की ते खरे आहे.)

(लेखक धनंजय दातार हे दुबईस्थित अदिल उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत)

 

Whats_app_banner