अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या (US Federal Reserve) नुकत्याच संपन्न झालेल्या बैठकीत उच्च व्याजदर कायम ठेवण्याच्या बाजुने मतदान झाल्याने जगभरात सोन्याचे भाव कडाडले आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) एप्रिल २०२४ महिन्यासाठी सोन्याचा वायदा करार ६६,१०० रुपये प्रति १० ग्रॅमवर खुला झाला. कमॉडिटी बाजार सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच सोन्याने ६६,७७८ रुपये प्रति १० ग्रॅमचा उच्चांक गाठला होता.
जगात काही राष्ट्रांमध्ये उफाळून आलेला भूराजकीय वाद तसेच चीनच्या मध्यवर्ती बँकेने सोने खरेदी करण्याचा लावलेला सपाटा यामुळे फेब्रुवारीच्या मध्यापासून सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. शिवाय अमेरिकेचे ताजे जाहीर झालेले पतधोरणही या तेजीसाठी अंशतः कारणीभूत असल्याचे कमोडिटी मार्केट क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, जगभरातील सोने व्यापाऱ्यांसाठी 'अच्छे दिन' परतण्याचे शक्यता काही तज्ञांनी वर्तवली आहे. ‘काल जाहीर झालेलं अमेरिकेचं पतधोरण हे सोने व्यापाऱ्यांसाठी भविष्यात संधी उपलब्ध करून देणारं आहे. सध्या अमेरिकेत महागाईचा दर नियंत्रणात असल्याचं अमेरिकन फेडरल रिझर्व्हचं मत आहे’ असं पेपरस्टोन ग्रुप लिमिटेडचे संशोधन प्रमुख ख्रिस वेस्टन यांनी ब्लूमबर्गला सांगितले.
सिंगापूरमध्ये आज सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी स्पॉट गोल्ड ०.७ टक्क्यांनी वधारून २,२०१.९४ डॉलर प्रति औंस झाले. ब्लूमबर्ग डॉलर स्पॉट निर्देशांक ०.२ टक्क्यांनी घसरला. तर चांदी, प्लॅटिनम आणि पॅलेडियम या सर्व धातूंचे दर वधारले होते. भारतीय सराफा बाजारात आज, २१ मार्च, २०२४ रोजी सोने आणि चांदीच्या दर वाढले असून प्रति १० ग्राम सोन्याची किंमत ६६ हजार रुपयांपेक्षा अधिक झाली आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ६६,९६८ रुपये असून एक किलो शुद्ध चांदीची किंमत ७५,४४८ रुपये झाली आहे.
संबंधित बातम्या