इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबईने (IIM, Mumbai) लॉजिस्टिक्स शिक्षण आणि कौशल्य विकास श्रेणीतला २०२४ सालचा प्रतिष्ठित लिप्स (LEAPS-Logistics, Excellence, Advancement & Performance Shield) पुरस्कार पटकावला आहे. या श्रेणीत ३४ स्पर्धकांमध्ये आयआयटी मुंबईने प्रथम क्रमांक पटकावला. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते आयआयएम, मुंबईचे संचालक प्रा. मनोज कुमार तिवारी यांना नुकताच हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी गोयल यांच्या हस्ते पुरस्कार 'लॉजिस्टिक्स ईज अक्रॉस डिफरंट स्टेट्स' (LEADS) रिपोर्ट २०२४चे प्रकाशन करण्यात आले. राष्ट्रीय लॉजिस्टिक्स धोरण, २०२२ अंतर्गत केंद्र सरकारच्या उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाद्वारे हा अहवाल तयार करण्यात आला असून भारतात लॉजिस्टिक्स क्षेत्राच्या वाढीसाठी मार्गदर्शक सूचीचा यात समावेश आहे.
आयआयएम मुंबईने ‘लिप्स’ पुरस्कार जिंकल्यानंतर संस्थेचे संचालक प्रा. तिवारी म्हणाले, ‘लॉजिस्टिक्स क्षेत्रासाठी आवश्यक असे व्यवस्थापन आणि कौशल्य विकास विषयाचे शिक्षण देण्याच्या आमच्या वचनबद्धतेवर या पुरस्काराने शिक्कामोर्तब केले आहे. हे शिक्षण अधिकाधिक चांगल्या दर्जाचे करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. केंद्र सरकार आणि व्यवस्थापन मंडळाने दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो. भारताच्या आर्थिक प्रगतीमध्ये लॉजिस्टिक्सची मोठी भूमिका राहणार आहे. त्यामुळे या क्षेत्राला पुरक असे प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीमध्ये आयआयएम मुंबई आपले योगदान देत आहे.'
आयआयएम मुंबईच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष आणि ऑलकार्गो ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष शशी किरण शेट्टी यांनी भारताच्या लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन उद्योगात मोलाचे योगदान दिले असून भारतातील जुन्या बंदरांचे आधुनिकीकरण, वेअरहाउसिंगमध्ये पायाभूत सुविधांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आधुनिकीकरण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे भारत हा जागतिक व्यापारात एक स्पर्धक देश म्हणून उदयास आला आहे. शेट्टी यांनी या क्षेत्रातील संशोधनाला प्रोत्साहन देत अनेक प्रतिभावंतांना स्थान दिले आहे.
१९६३ साली स्थापन झालेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबईची देशातील टॉप बिझनेस स्कूलमध्ये गणना होते. केंद्र सरकारच्या पीएम गतीशक्ती योजनेसाठी मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी नोडल एजेन्सी म्हणूनही आयआयएम मुंबईने यापूर्वी महत्वाची भूमिका वठवली आहे.
संबंधित बातम्या