Share Market : एका दिवसात तब्बल १२ टक्क्यांनी कोसळला हा शेअर; असं काय घडलं?-iex share price slip by 12 percent today here is the reason ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Share Market : एका दिवसात तब्बल १२ टक्क्यांनी कोसळला हा शेअर; असं काय घडलं?

Share Market : एका दिवसात तब्बल १२ टक्क्यांनी कोसळला हा शेअर; असं काय घडलं?

Sep 24, 2024 04:15 PM IST

IEX share price : इंडियन एनर्जी एक्स्चेंजचा शेअर आज तब्बल ११.५२ टक्क्यांनी कोसळला. केंद्र सरकारचा निर्णय यामागे असल्याचं बोललं जात आहे.

एका दिवसात तब्बल १२ टक्क्यांनी कोसळला IEX चा शेअर; असं काय घडलं?
एका दिवसात तब्बल १२ टक्क्यांनी कोसळला IEX चा शेअर; असं काय घडलं?

IEX Share Price : शेअर बाजारासाठी आजचा दिवस चढउताराचा राहिला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये बरीच हालचाल पाहायला मिळाली असली तरी दिवसअखेर बाजार कालच्या पातळीवरच स्थिरावला. अनेक शेअरमध्ये आज चढउतार पाहायला मिळाले. मात्र, सर्वाधिक चर्चा इंडियन एनर्जी एक्स्चेंज (IEX) या शेअरची होती. हा शेअर आज जवळपास १२ टक्क्यांनी कोसळला. त्यामुळं गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली आहे.

आयईएक्सचा शेअर आज २४० च्या आसपास खुला झाला. मात्र बाजार उघडल्यापासून तो क्रमाक्रमानं घसरत गेला. दिवसअखेर एनएसईवर तो तब्बल ११.५२ टक्क्यांनी घसरून बंद झाला. त्यामुळं गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं आहे. या शेअरमध्ये इतकी मोठी घसरण होण्यामागे मार्केट कपलिंगचा सरकारचा निर्णय आहे.

कपलिंग ही काय भानगड आहे?

मार्केट कपलिंग या संकल्पनेनुसार, वेगवेगळ्या पॉवर एक्स्चेंजेसवर वेगवेगळी किंमत नसेल. सध्या प्रत्येक पॉवर एक्सचेंजेसवर स्वतंत्रपणे खरेदी व विक्री होते. किंमतीही वेगळ्या असतात. नव्या पद्धतीत देशभरातून येणाऱ्या खरेदी व विक्रीच्या ऑर्डर एकत्र केल्या जातील आणि MCO (Market Coupling Operator) च्या माध्यमातून प्रत्येक विभागासाठी एक किंमत ठरवली जाईल.

सध्या देशातील एकूण ऊर्जेपैकी ९० टक्के ऊर्जेचं ट्रेडिंग IEX द्वारे होतं. थोडक्यात या व्यवसायात आयईएक्सचं एकहाती वर्चस्व आहे. त्या तुलनेत इतर एक्सचेंजेसमधून होणारं ट्रेडिंग अगदीच किरकोळ आहे. कपलिंगची पद्धत सुरू झाल्यानंतर एक्सचेंजवर विजेची ट्रेडिंग वाढेल आणि इतर एक्सचेंजेसचा व्यवसाय देखील वाढेल. नवीन पॉवर एक्सचेंजेस सुरू करण्याच्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळं या क्षेत्रातील आयईएक्सची एकाधिकारशाही संपुष्टात येईल.

ग्रिड-इंडिया सध्या मार्केट कपलिंगच्या संदर्भात अभ्यास करत आहे. तो अभ्यास झाल्यानंतर केंद्रीय विद्युत नियामक आयोग या संदर्भात अंतिम निर्णय घेईल. ही नवी यंत्रणा आर्थिक वर्ष २०२५ च्या सुरुवातील किंवा अखेरीस लागू करण्याची योजना आहे. या सगळ्या घडामोडींचा परिणाम सध्या आयईएक्सच्या शेअरच्या किंमतीवर दिसत आहे.

 

(डिस्क्लेमर : हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणूक करण्यासाठी आपल्या सल्लागारांशी चर्चा करा.)

 

Whats_app_banner
विभाग