Q3 Results : तिमाही निकालाचे अंदाज चुकल्यानं आयडीएफसी फर्स्ट बँकेचा शेअर पुरता ढासळला!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Q3 Results : तिमाही निकालाचे अंदाज चुकल्यानं आयडीएफसी फर्स्ट बँकेचा शेअर पुरता ढासळला!

Q3 Results : तिमाही निकालाचे अंदाज चुकल्यानं आयडीएफसी फर्स्ट बँकेचा शेअर पुरता ढासळला!

Jan 27, 2025 12:46 PM IST

IDFC First Bank Q3 Results : आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर आयडीएफसी फर्स्ट बँकेचा शेअर ७ टक्क्यांपेक्षा जास्त कोसळला आहे.

Q3 Results : तिमाही निकालाचे अंदाज चुकल्यानं आयडीएफसी फर्स्ट बँकेचा शेअर पुरता ढासळला!
Q3 Results : तिमाही निकालाचे अंदाज चुकल्यानं आयडीएफसी फर्स्ट बँकेचा शेअर पुरता ढासळला!

Bank Stock News : प्रोजेक्ट फायनान्सर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी (आयडीएफसी) आणि कॅपिटल फर्स्ट यांच्या बँकिंग शाखेचे विलीनीकरण करून स्थापन झालेल्या आयडीएफसी फर्स्ट बँकेचे तिमाही निकाल नुकतेच जाहीर झाले. हे निकाल अपेक्षेपेक्षा वेगळे लागल्याचा मोठा परिणाम शेअरवर झाला. बँकेचा शेअर ७ टक्क्याहून जास्त घसरून ५७.६८ रुपयांवर आला. 

बँकेचा निव्वळ नफा ५३ टक्क्यांनी घसरून ३३९.४ कोटी रुपयांवर आला आहे. विश्लेषकांच्या ५५१ कोटी रुपयांच्या अंदाजापेक्षा हा आकडा बराच कमी आहे. निव्वळ नफ्यात झालेली घसरण, ओपेक्समधील वाढ आणि वाढीव तरतुदींमुळं नफ्यात ही घट झाली आहे.

आर्थिक वर्ष २०२५ च्या सप्टेंबर तिमाहीतील २०१ कोटी रुपयांच्या तुलनेत निव्वळ नफा ६९ टक्क्यांनी वाढला आहे. तथापि, आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या नऊ महिन्यांत निव्वळ नफ्यात ४५.३ टक्क्यांनी घट झाली आहे.

मायक्रोफायनान्स (एमएफ) कर्ज वितरणातील मंदी, मायक्रोफायनान्सच्या वाढीव तरतुदी आणि नॉन-एमएफ व्यवसायांमधील क्रेडिट कॉस्ट नॉर्मलायजेशन उत्पन्नात व पर्यायानं नफ्यात घट झाल्याचं बँकेनं म्हटलं आहे.

निव्वळ व्याज उत्पन्न (NII) म्हणजे मिळविलेले व्याज आणि भरलेले व्याज यातील तफावत १४.४ टक्क्यांनी वाढून ४,९०२ कोटी रुपये झाली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत ती ४२८६.६ कोटी रुपये होती. या तिमाहीत कंपनीचं एकूण उत्पन्न वाढून ११,१२३ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ते ९३९६ कोटी रुपये होतं.

ठेवी आणि कर्जात वाढ

अ‍ॅडव्हान्स आणि डिपॉझिटच्या आघाडीवर बँकेनं चांगली वाढ नोंदवली आहे. रिटेल, ग्रामीण आणि एमएसएमई कर्जात वार्षिक २१.३ टक्के वाढ झाल्यानं निव्वळ कर्जात वार्षिक २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ठेवींच्या आघाडीवर, ग्राहकांच्या ठेवींमध्ये वार्षिक अंदाजे ३० टक्के वाढ झाली आहे, किरकोळ ठेवींचं योगदान ८० टक्के आहे. सीएएसए (CASA) ठेवींमध्ये वार्षिक ३२.३ टक्के वाढ झाली आहे. हे गुणोत्तर ४७.७ टक्के इतकं आहे.

एक्सपर्ट काय म्हणतात?

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म सेंट्रम ब्रोकिंगच्या मते, बँकेनं अ‍ॅडव्हान्स आणि ठेवींच्या बाबतीत जोरदार कामगिरी केली आहे. कमी किंमतीच्या ठेवी आकर्षित करण्यात आणि टिकवून ठेवण्यात प्रतिस्पर्ध्यांना मागं टाकलं आहे. तथापि, बँकेला उच्च ऑपरेटिंग खर्च आणि वाढीव क्रेडिट कॉस्ट सह प्रमुख आव्हानांचा सामना करावा लागत आहे. यात आर्थिक वर्ष २०२७ आणि त्यानंतर सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. असं असूनही बँकेचं महत्त्वाकांक्षी रिटर्न ऑन इक्विटी (ROE) उद्दिष्ट आवाक्याबाहेर असून, आर्थिक वर्ष २०२५च्या तिसऱ्या तिमाहीत आणखी एक धक्का बसला आहे.

आर्थिक वर्ष २०२३ च्या चौथ्या तिमाहीत १३ टक्क्यांहून अधिक असलेला तिमाही आरओई आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत ३.६ टक्क्यांपर्यंत घसरला. हे लक्षात घेतल्यास आर्थिक वर्ष २०२५ मध्ये आरओई आधीच कमी झालेल्या आर्थिक वर्ष २०२४ च्या पातळीपेक्षा कमी असेल. परिणामी, सेंट्रम ब्रोकिंगनं आर्थिक वर्ष २०२५ च्या अंदाजात किंचित कपात केली आहे आणि आता बँक आर्थिक वर्ष २०२७ पर्यंतच इक्विटीच्या किंमतीपेक्षा आरओई साध्य करेल अशी अपेक्षा आहे. सेंट्रमनं लक्ष्य किंमत ६१ रुपयांवरून ५८ रुपयांवर आणली आहे.

मोतीलाल ओसवाल यांनी शेअरवरील आपलं 'न्यूट्रल' रेटिंग कायम ठेवत शेअरवरील टार्गेट प्राइस ७० रुपयांपर्यंत कमी केली आहे. ब्रोकरेज कंपनीनं उच्च ऑपरेटिंग खर्चाचं कारण देत आर्थिक वर्ष २०२५ ई आणि २०२६ ई साठी आपल्या कमाईच्या अंदाजात अनुक्रमे २६ टक्के आणि १० टक्के कपात केली.

नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजनं आर्थिक वर्ष २०२५ ई आणि २०२६ ई साठी आपल्या ईपीएस अंदाजांमध्ये अनुक्रमे २२ टक्के आणि २७ टक्के कपात केली. कंपनीनं 'होल्ड' रेटिंग कायम ठेवलं असून ६० रुपये उद्दिष्ट मूल्य ठेवलं आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner