ICICI Share Price: आयसीआयसीआय बँकेचे शेअर खरेदी करण्यासाठी झुंबड, काय आहे कारण?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  ICICI Share Price: आयसीआयसीआय बँकेचे शेअर खरेदी करण्यासाठी झुंबड, काय आहे कारण?

ICICI Share Price: आयसीआयसीआय बँकेचे शेअर खरेदी करण्यासाठी झुंबड, काय आहे कारण?

Updated Oct 25, 2022 01:27 PM IST

ICICI Bank Share Price: आयसीआयसीआय बँकेचे शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली आहे.

ICICI Bank Share Price
ICICI Bank Share Price

ICICI Bank Share Price: दिवाळी मुहुर्ताच्या ट्रेडिंगनंतर आज शेअर बाजारात निरुत्साह दिसत आहे. सेन्सेक्समध्ये घसरण झालेली दिसत असताना आयसीआयसीआय बँकेच्या शेअरच्या भावानं उच्चांक गाठला आहे. मंगळवारी बाजार सुरू झाल्यानंतर ICICI बँकेच्या शेअर्सचा भाव ९४२.७० वर पोहोचला. मागील ५२ आठवड्यांतील हा सर्वाधिक भाव आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालाचा हा परिणाम असल्याचं बोललं जात आहे.

ब्रोकरेज फर्म एडलवाइसच्या माहितीनुसार, आयसीआयसीआय बँकेनं गेल्या काही काळापासून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मागील सलग आठ तिमाहींमध्ये बँकेनं सर्वोत्तम परफॉर्मर म्हणून आपलं स्थान कायम राखलं आहे. एडलवाइसच्या अंदाजानुसार, बँकेचे शेअर्स १,११५ रुपयांवर जाऊ शकतात. प्रगतीचा आलेख बघता आयसीआयसीआय बँकेचा शेअर खरेदी करणं फायदेशीर ठरू शकतं, असं या ब्रोकरेज फर्मनं म्हटलं आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या कर्जपुरवठ्यामध्ये सातत्यानं वाढ होत आहे. कर्ज पुरवठ्यातील वाढीचा दर सध्या २२.७ टक्के इतका आहे. त्याच बरोबर कर्जपुरवठ्यावरील खर्चात कपात करण्यातही बँकेला यश आलं आहे. तंत्रज्ञानातील गुंतवणुकीमुळं दैनंदिन उलाढाल वाढण्यास मदत झाली आहे. बुडीत कर्जाच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. या सगळ्याचा सकारात्मक परिणाम बँकेच्या तिमाही ताळेबंदावर झाला आहे. बँकेच्या शेअर्समध्ये आणखी चढ-उतार होण्याची शक्यता आहे, असंही 'एडलवाइस'नं म्हटलं आहे.

सप्टेंबर तिमाहीअखेरचा नफा किती?

आयसीआयसीआय बँकेचा एकत्रित निव्वळ नफा ३१.४३ टक्क्यांनी वाढून ८००६.९९ कोटींवर पोहोचला आहे. बँकेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार, दुसऱ्या तिमाहीत बँकेचं एकूण उत्पन्न वाढून ३१,०८८ कोटी रुपयांवर गेलं आहे. त्याच वेळी, एकूण खर्च किंचित १९,४०८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत हा खर्च १८,०२७ कोटी रुपये होता. मागील आर्थिक वर्षात बँकेनं बुडीत कर्जासाठी २७१३.४८ कोटींची तरतूद केली होती. या वर्षी ही तरतूद १६४४.५५ कोटी रुपयांपर्यंत खाली आली आहे.

 

(टीप: (टीप: संबंधित वृत्त हे कंपनीच्या शेअर बाजारातील कामगिरीवर आधारीत आहे. हा कुठल्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणुकीचा निर्णय आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करूनच घ्यावा.)

Whats_app_banner