
Chanda Kochhar leaves Jail : कथित कर्जघोटाळ्याच्या प्रकरणात सीबीआयनं अटक केलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर व त्यांचे पती दीपक कोचर अखेर जेलमधून सुटले आहेत.
व्हिडिओकॉन समूहाला ३ हजार कोटींच्या कर्ज देताना कोचर यांनी अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यांचे पती दीपक कोचर यांचीही त्यांना साथ होती, असा दावा करत सीबीआयनं कोचर पती-पत्नीला २३ डिसेंबर रोजी अटक केली होती.
कोचर दाम्पत्यानं आपल्याविरोधातील घोटाळ्याचे सर्व आरोप फेटाळत सीबीआयच्या कारवाईला आव्हान दिलं होतं. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली चौकशी सुरू करण्यासाठी परवानगी घेणं बंधनकारक आहे. मात्र, सीबीआयनं अशी कुठलीही परवानगी घेतली नव्हती, असा युक्तिवाद कोचर दाम्पत्यानं याचिकेत केला होता. या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. न्यायालयानं कोचर दाम्पत्याचा युक्तिवाद ग्राह्य धरला. तसंच, गुन्हा दाखल झाल्यानंतर चार वर्षानंतर कोचर यांना अटक करण्यामागील कारण सीबीआयनं स्पष्ट करण्यात आलेलं नाही. शिवाय, आरोपी गुन्हा कबुल करत नाहीत याचा अर्थ ते चौकशीला सहकार्य करत नाहीत, असा होत नाही, असं निरीक्षण नोंदवत न्यायालयानं कोचर दाम्पत्याला जामीन मंजूर केला. त्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन आज चंदा कोचर यांची भायखळ्याच्या तुरुंगातून सुटका झाली.
येत्या १५ जानेवारीला कोचर दाम्पत्याच्या मुलाचं लग्न आहे. त्याच्या काही दिवस आधीच सुटका झाल्यानं कोचर दाम्पत्याला मोठा दिलासा मिळाला आहे. व्हिडिओकॉनचे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योगपती वेणूगोपाल धूत याच प्रकरणात सध्या तुरुंगात आहेत.
संबंधित बातम्या
