Hyundai IPO : ह्युंडई मोटर्सच्या आयपीओनं केली घोर निराशा, गुंतवणूकदारांची मुद्दलही संकटात
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Hyundai IPO : ह्युंडई मोटर्सच्या आयपीओनं केली घोर निराशा, गुंतवणूकदारांची मुद्दलही संकटात

Hyundai IPO : ह्युंडई मोटर्सच्या आयपीओनं केली घोर निराशा, गुंतवणूकदारांची मुद्दलही संकटात

Published Oct 22, 2024 10:22 AM IST

Hyundai Motors IPO Listing : प्रचंड गाजावाजा झालेल्या ह्युंडई मोटर इंडियाचा आयपीओ आज सूचीबद्ध झाला खरा, पण या शेअरनं गुंतवणूकदारांची निराशा केली.

ह्युंडई मोटर्सच्या आयपीओनं केली घोर निराशा, गुंतवणूकदारांची मुद्दलही संकटात
ह्युंडई मोटर्सच्या आयपीओनं केली घोर निराशा, गुंतवणूकदारांची मुद्दलही संकटात

Hyundai IPO : देशातील सर्वात मोठा आयपीओ असा गाजावाजा झालेल्या ह्युंडई मोटरर्सच्या आयपीओनं गुंतवणूकदारांची घोर निराशा केली आहे. ह्युंडईचा शेअर १.३ टक्क्यांनी घसरून आज बाजारात सूचीबद्ध झाला. त्यामुळं आता गुंतवणूकदारांचे मूळ पैसे वसूल होणंही कठीण झालं आहे.

हा शेअर मंगळवारी, २२ ऑक्टोबर रोजी एनएसईवर १,९६० रुपयांच्या इश्यू प्राइसच्या तुलनेत १.३ टक्क्यांनी कमी होऊन १,९३४ रुपयांवर सूचीबद्ध झाला. बीएसईवर तो आयपीओच्या किमतीपेक्षा १.५ टक्के घसरून १९३१ रुपयांवर सूचीबद्ध झाला.

तब्बाल २७,८७०.१६ कोटींचा आकार असलेला हा आयपीओ आतापर्यंतचा सर्वात मोठा होता. कंपनीची आर्थिक पार्श्वभूमी, बाजारातील दबदबा यामुळं आयपीओबद्दल प्रचंड उत्सुकता होती. मात्र,  तीन दिवसांच्या कालावधीत आयपीओला अपेक्षेइतकी बोली लागली नव्हती. आयपीओमध्ये ९.८९ कोटी शेअर्सच्या तुलनेत २३.६३ कोटी शेअर्ससाठी बोली लागली होती. किरकोळ गुंतवणूकदार आणि बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार श्रेणीतील शेअर्स पूर्ण सबस्क्राइबही झाले नाहीत. केवळ पात्र संस्थात्मक खरेदीदार (QIB) श्रेणीत हा आयपीओ पूर्णपणे सब्सक्राइब झाला होता.

एक्सपर्ट्स काय म्हणतात…

नोमुरानं लिस्टिंगच्या आधीच या स्टॉकवर २,४७२ रुपये प्रति शेअरचं लक्ष्य ठेवून खरेदी सुरू केली होती. त्यांनी सुचवलेल्या टार्गेट प्राइसच्या तुलनेत हा आयपीओ २६ टक्क्यांहून अधिक वाढीसह लिस्ट झाला. ब्रोकरेजच्या मते, भारतीय कार मार्केटमध्ये वाढीला मोठा वाव आहे. कंपनी आर्थिक वर्ष २०२५-२७ मध्ये ७-८ नवीन मॉडेल्सद्वारे (फेसलिफ्टसह) ८ टक्के वॉल्यूम सीएजीआर देईल आणि आर्थिक वर्ष २०२४ मधील १३.१ टक्क्यांवरून वित्त वर्ष २०२७ पर्यंत त्याचे एबिटडा मार्जिन १४ टक्क्यांपर्यंत सुधारेल. एकंदरीत, नोमुरानं आर्थिक वर्ष २०२५-२७ मध्ये ह्युंडई मोटर इंडियासाठी १७ टक्के सीएजीआरचा अंदाज वर्तविला आहे.

मध्यम ते दीर्घ मुदतीचं टार्गेट ठेवून हा स्टॉक खरेदी करावा, असं मॅक्वायरीनं सुचवलं आहे. देशांतर्गत प्रवासी वाहनांची वाढती मागणी, ह्युंडईचा बाजारपेठेतील हिस्सा, नवीन लाँचिंग आणि पोर्टफोलिओ मिश्रणातून मार्जिन सुधारणा यासारख्या घटकावर मॅक्वायरीनं आशा व्यक्त केली आहे.

कशी आहे कंपनी?

ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड ही ह्युंडई मोटर ग्रुपचा भाग आहे. प्रवासी वाहन विक्रीनुसार, ही जगातील तिसरी सर्वात मोठी ऑटो ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर (ओईएम) कंपनी आहे. ही कंपनी विश्वासार्ह, वैशिष्ट्यपूर्ण आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत चारचाकी प्रवासी वाहनं तयार करण्यासाठी ओळखली जाते.

ह्युंडई मोटर इंडिया भारतभरात १,३६६ सेल्स पॉईंट्स आणि १,५५० सर्व्हिस पॉईंट्सच्या विशाल नेटवर्कद्वारे मोबिलिटी सोल्यूशन्स पुरवते. ३१ मार्च २०२४ पर्यंत कंपनीनं देशात आणि देशाबाहेर सुमारे १२ दशलक्ष प्रवासी वाहनांची विक्री केली आहे. ३१ मार्च २०२३ ते ३१ मार्च २०२४ या आर्थिक वर्षात ह्युंडई मोटर इंडियाच्या महसुलात १६ टक्के, तर करोत्तर नफ्यात (पीएटी) २९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner