Share Market News : ह्युंदाई मोटर इंडियाचे चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीचे निकाल नुकतेच जाहीर झाले. कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर १९ टक्क्यांनी घट झाली आहे. या निकालानंतर कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली असून शेअरनं ५२ आठवड्यांचा नीचांक गाठला आहे.
ह्युंदाई मोटर इंडियाला डिसेंबर २०२४ च्या तिमाहीत १,१६१ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला १,४२५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. देशांतर्गत विक्री आणि निर्यात मंदावल्यामुळं कंपनीच्या नफ्यात ही घसरण झाली आहे. परिणामी कंपनीचा शेअर आज १.०२ टक्क्यांनी घसरून १६२७ रुपयांवर बंद झाला. तत्पूर्वी, दिवसभराच्या व्यवहारात शेअरनं ५२ आठवड्यांचा नीचांक गाठला.
चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत ह्युंदाई मोटर इंडियाचा महसूलही १.३ टक्क्यांनी घसरून १६,६४८ कोटी रुपयांवर आला आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ह्युंदाई मोटर इंडियाचा महसूल १६,८७५ कोटी रुपये होता. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ या तिमाहीत ऑटोमोबाईल कंपनीचं एबिटडा मार्जिन ११.२७ टक्के होतं. मागील वर्षी याच तिमाहीत ते १२.८८ टक्के होतं.
ह्युंदाई मोटर इंडियाचा निव्वळ नफा आणि महसूल तिमाही आधारावर अनुक्रमे १६ व ३.५ टक्क्यांनी घसरला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत ह्युंदाई मोटर इंडियाचा नफा १३७५ कोटी रुपये होता. तर, महसूल १७,२६० कोटी रुपये होता.
डिसेंबर २०२४ तिमाहीत कंपनीनं एकूण १,८६,४०८ प्रवासी वाहनांची विक्री केली. देशांतर्गत बाजारात कंपनीनं १,४६,०२२ युनिट्सची विक्री केली आहे. कंपनीच्या विक्रीत एसयूव्ही सेगमेंटचा मोठा वाटा आहे.
ह्युंदाई मोटर इंडियाचा आयपीओ १५ ऑक्टोबर २०२४ रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला होता. तो १७ ऑक्टोबरपर्यंत खुला होता. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत १९६० रुपये होती. ह्युंदाई मोटर इंडियाचा आयपीओ २.३७ पट सब्सक्राइब झाला. कंपनीचा शेअर २२ ऑक्टोबर २०२४ रोजी बीएसईवर १९३१ रुपयांवर लिस्ट झाला.
संबंधित बातम्या