Hyundai Motor India Q2 Results : देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ आणणाऱ्या ह्युंदाई मोटर इंडिया या कंपनीनं लिस्टिंगनंतर पहिले तिमाही निकाल सादर केले आहेत. लिस्टिंगनंतर कंपनीला पहिल्याच तिमाही निकालांमुळं दुसरा मोठा धक्का बसला आहे. ह्युंदाई मोटर इंडियाचा एकत्रित निव्वळ नफा सप्टेंबर २०२४ तिमाहीत १६ टक्क्यांनी घसरून १३७५ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ऑटोमोबाइल कंपनीला १६२८ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा झाला होता.
ह्युंदाई मोटर इंडियाचा महसूल चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत ७ टक्क्यांनी घटून १७,२६० कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीचे उत्पन्न १८,६६० कोटी रुपये होते. जुलै ते सप्टेंबर २०२४ या तिमाहीत कंपनीचा एबिटडा १० टक्क्यांनी घसरून २२०५ कोटी रुपयांवर आला आहे. तर चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचे मार्जिन ३० बेसिस पॉईंटने घसरून १२.८ टक्क्यांवर आले आहे.
ह्युंदाई मोटर इंडियाने चालू आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत एकूण १.९१ लाख वाहनांची विक्री केली. देशांतर्गत बाजारात कंपनीने १.४९ लाख युनिट्सची विक्री केली आहे. कंपनीच्या तिमाही विक्रीत एसयूव्ही सेगमेंटचा मोठा वाटा आहे. तर सप्टेंबर तिमाहीत निर्यातीचे प्रमाण ४२,३०० युनिट होते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ६ महिन्यांचा विचार केल्यास कंपनीचा महसूल २ टक्क्यांनी घसरून ३४६०५ कोटी रुपये झाला आहे. तर नफा २८६५ कोटी रुपयांवर आला आहे.
ह्युंदाई मोटर इंडियाचा आयपीओ १५ ऑक्टोबर २०२४ रोजी उघडला गेला आणि तो १७ ऑक्टोबरपर्यंत खुला राहिला. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत १९६० रुपये होती. ह्युंदाई मोटर इंडियाचा शेअर २२ ऑक्टोबर रोजी बीएसईवर १९३१ रुपयांवर लिस्ट झाला होता. कंपनीचा आयपीओ एकूण २.३७ पट सब्सक्राइब झाला. मात्र लिस्टिंग निराशाजनक झाली होती.
लिस्टिंग झाल्यापासून ह्युंदाई मोटर इंडियाचा शेअर एकाच पातळीवर आहे. लिस्टिंगच्या दिवशी २२ ऑक्टोबर रोजी हा शेअर एनएसईवर १८१९.६० रुपयांवर होता. आज तो शेअर १८२० रुपयांवर आहे.