hyundai ipo news : पैसे तयार ठेवा! ह्युंडई कंपनी आणतेय देशातील सर्वात मोठा आयपीओ, एलआयसीचा विक्रम मोडणार
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  hyundai ipo news : पैसे तयार ठेवा! ह्युंडई कंपनी आणतेय देशातील सर्वात मोठा आयपीओ, एलआयसीचा विक्रम मोडणार

hyundai ipo news : पैसे तयार ठेवा! ह्युंडई कंपनी आणतेय देशातील सर्वात मोठा आयपीओ, एलआयसीचा विक्रम मोडणार

Jun 15, 2024 01:16 PM IST

Hyundai Motor IPO news : ह्युंडई मोटर या कंपनीनं देशातील आजवरचा सर्वात मोठा आयपीओ आणण्याची तयारी केली आहे.

ह्युंडई कंपनी आणतेय देशातील सर्वात मोठा आयपीओ, एलआयसीचा विक्रम मोडणार, पैसे तयार ठेवा!
ह्युंडई कंपनी आणतेय देशातील सर्वात मोठा आयपीओ, एलआयसीचा विक्रम मोडणार, पैसे तयार ठेवा!

stock market news updates : आयपीओच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दक्षिण कोरियन कंपनी ह्युंदाई मोटरची भारतीय कंपनी आयपीओ आणण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी कंपनीनं सेबीकडं (SEBI) आवश्यक कागदपत्रं सादर केली आहेत.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, हा आयपीओ सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात बाजारात धडकण्याची शक्यता आहे. कंपनीनं शनिवारी दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार, कंपनी आपली हिस्सेदारी १७.५ टक्क्यांनी कमी करण्याची शक्यता आहे.

२५ हजार कोटी उभारणार

आयपीओच्या माध्यमातून सुमारे २५ हजार कोटी रुपये उभारण्याचा ह्युंडईचा प्रयत्न असेल. सेबीची मंजुरी मिळाल्यास हा देशातील सर्वात मोठा IPO ठरणार आहे. दोन वर्षांपूर्वी एलआयसीच्या २१ हजार कोटींचा आयपीओ आणला होता. ह्युंडईचा आयपीओ तो विक्रम मोडणार आहे.

नवीन शेअर्सची विक्री नाही!

स्टॉक एक्सचेंजला सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, Hyundai Motor एकूण १४.२ कोटी शेअर्स विकणार आहे. अहवालानुसार, कंपनी आयपीओद्वारे कोणतेही नवीन शेअर्स जारी करणार नाही. ऑफर फॉर सेल या प्रकारातील हा आयपीओ असेल. अर्थात, प्रवर्तकांकडील शेअर्सच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जातील.

२० वर्षांपूर्वी आला होता मारुती सुझुकीचा IPO

तब्बल २० वर्षांनंतर एखाद्या मोटर कंपनीचा आयपीओ येत आहे. यापूर्वी मारुती सुझुकीचा आयपीओ २००३ मध्ये आला होता. या आठवड्याच्या सुरुवातीला ओला इलेक्ट्रिक या इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनीला आयपीओ लॉन्च करण्यासाठी भांडवली बाजार नियामक सेबीची मंजुरी मिळाली आहे.

१०३१ शहरांमध्ये विक्री केंद्रे

ह्युंडई मोटर इंडिया लिमिटेड ही मारुती सुझुकी नंतरची भारतातील दुसरी सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ह्युंडई इंडियानं ४६५३ कोटींच्या नफ्यासह एकूण ६० हजार कोटी महसूल मिळवला. देशातील नॉन-लिस्टेड कार उत्पादक कंपन्यांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे.

ह्युंडई कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये १३ प्रवासी वाहने आहेत. कंपनीची १०३१ शहरांमध्ये एकूण १३६६ विक्री केंद्रे आणि १५५० सर्व्हिस सेंटर्स आहेत. कंपनीच्या चेन्नई प्लांटची उत्पादन क्षमता ८.२ लाख युनिट्स आहे. आर्थिक वर्ष २०२६ पर्यंत ही क्षमता ९.९४ लाख युनिटपर्यंत पोहोचू शकते.

एसयूव्ही विक्रीवर भर

कंपनी SUV विक्रीवर खूप लक्ष केंद्रित करत आहे. कंपनीच्या एकूण विक्रीत एसयूव्हीचा वाटा ५३ टक्के आहे. कंपनी ईव्ही सप्लाय चेनवरही भर देत आहे. ह्युंदाई मोटर स्थानिक आणि जागतिक ईव्ही डीलर्सशी सहकार्य करार करून पुरवठा साखळी सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.

 

(डिस्क्लेमर : वरील वृत्त हे माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner