Share Market news : देशातील सर्वात मोठा आयपीओ अशी चर्चा असलेला ह्युंडई मोटर इंडिया लिमिटेडचा आयपीओ आज बाजारात दाखल झाला आहे. हा आयपीओ १७ ऑक्टोबर २०२४ पर्यंत खुला राहणार आहे. हा आयपीओ नेमका कसा आहे? कंपनीची परिस्थिती कशी आहे आणि यात गुंतवणूक करावी की नाही याबाबत माहिती घेणं महत्त्वाचं आहे.
ह्युंडई मोटर इंडिया लिमिटेडचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. शेअर बाजारातील जाणकारांच्या मते, आज ग्रे मार्केटमध्ये कंपनीचे शेअर्स ६५ रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहेत.
निविदेच्या पहिल्या दिवशी, आज सकाळी १०.२७ वाजेपर्यंत बुक बिल्ड इश्यू ०.०३ पट, पब्लिक इश्यूचा रिटेल भाग ०.०५ पट आणि एनआयआय भाग ०.०३ वेळा सब्सक्राइब झाला होता.
> ह्युंडई मोटर इंडियाच्या आयपीओसाठी १८६५ ते १९६० रुपये प्रति इक्विटी शेअर असा दरपट्टा निश्चित करण्यात आला आहे.
> हा आयपीओ आजपासून गुरुवारपर्यंत खुला राहणार आहे.
> ह्युंदाई मोटर इंडियाआयपीओ आकार २७,८७०.१६ कोटी रुपये आहे. म्हणजेच, कंपनीला आयपीओतून एवढे पैसे उभारायचे आहेत.
> ह्युंडई मोटर इंडियाच्या आयपीओच्या एका लॉटमध्ये सात शेअर्स मिळणार आहेत.
> शेअर वाटपाची संभाव्य तारीख १८ ऑक्टोबर २०२४ म्हणजे या आठवड्यात शुक्रवार आहे.
> केफिन टेक्नॉलॉजीजची बुक बिल्ड इश्यूचे अधिकृत रजिस्ट्रार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
> कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, एचएसबीसी सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केट्स प्रायव्हेट लिमिटेड, जेपी मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि मॉर्गन स्टॅनली इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांना पब्लिक ऑफरचे लीड मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.
> ह्युंडईचा आयपीओ २२ ऑक्टोबर २०२४ रोजी बीएसई आणि एनएसईवर 'टी +३' लिस्टिंग नियमाद्वारे सूचीबद्ध होण्याची अपेक्षा आहे.
ह्युंडई मोटर इंडियाच्या आयपीओला लेमन मार्केट्सचे रिसर्च अॅनालिस्ट गौरव गर्ग यांनी 'सबस्क्राइब' टॅग दिला आहे. हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ ठरणार आहे. यातील गुंतवणुकीमुळं गुंतवणूकदारांना भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या कार निर्मात्यासोबत काम करण्याची अनोखी संधी मिळणार आहे. कंपनीची ऑपरेशनल कार्यक्षमता उत्तम आहे. सुमारे ९० टक्के पार्ट्स स्थानिक आहेत. पुढील काळात कंपनीच्या वाढीसाठी मोठा वाव आहे, असं गर्ग यांनी म्हटलं आहे.
मास्टर कॅपिटलनं देखील आयपीओ खरेदी करण्याची शिफारस केली आहे. 'ग्राहकांच्या आवडीनिवडींची सखोल समज आणि ईव्ही मार्केट शेअर वाढवून आपल्या प्रवासी वाहन पोर्टफोलिओचा विस्तार करून आपली मजबूत स्थिती कायम ठेवण्याची कंपनीची योजना आहे. इच्छुक गुंतवणूकदार दीर्घ मुदतीसाठी आयपीओमध्ये गुंतवणूक करू शकतात, असं मास्टर कॅपिटलनं म्हटलं आहे.
स्वस्तिका इन्व्हेस्टमेंटच्या वेल्थ हेड शिवानी न्याती यांनी आयपीओला 'अप्लाय फॉर लॉन्ग टर्म' हा टॅग दिला आहे. हा आयपीओ ऑफर फॉर सेल (ओएफएस) आहे, त्यामुळं कंपनीला यातून कोणतंही उत्पन्न मिळत नाही. आयपीओचा आकार लक्षात घेता लिस्टिंगवर खूप मोठा नफा मिळविणं सोपं नाही. दीर्घकालीन दृष्टीकोन आणि संभाव्य आव्हानं स्वीकारण्याची तयारी असलेले गुंतवणूकदार यात गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतात, असं शिवानी न्याती यांनी म्हटलं आहे.
आदित्य बिर्ला, आनंद राठी, अरिहंत कॅपिटल मार्केट्स, बजाज कॅपिटल, कॅनरा बँक सिक्युरिटीज, चोलामंडलम सिक्युरिटीज, आयसीआयसीआय डायरेक्ट, आयडीबीआय कॅपिटल, केआर चोक्सी सिक्युरिटीज, मारवाडी शेअर्स अँड फायनान्स, एसबीआय कॅपिटल सिक्युरिटीज, एसएमआयएफएस यांनीही आयपीओला 'सबस्क्राइब' टॅग दिला आहे.
संबंधित बातम्या