Gold in Pakistan: पाकिस्तानात सापडली सर्वात मोठी सोन्याची खाण; कंगाल देश होणार मालामाल
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold in Pakistan: पाकिस्तानात सापडली सर्वात मोठी सोन्याची खाण; कंगाल देश होणार मालामाल

Gold in Pakistan: पाकिस्तानात सापडली सर्वात मोठी सोन्याची खाण; कंगाल देश होणार मालामाल

Jan 15, 2025 05:34 PM IST

आर्थिकदृष्ट्या कंगालीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात सोन्याची मोठी खाण सापडली आहे. या खाणीतून सोने काढण्यासाठी सौदी अरेबियाच्या कंपनीशी करार करण्यात येणार आहे.

पाकिस्तानात सापडली सोन्याची खाण
पाकिस्तानात सापडली सोन्याची खाण

पाकिस्तानातील पंजाब प्रांतात सिंधू नदीच्या खोऱ्यात प्रचंड मोठ्या सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत. या खाणींमध्ये सुमारे ३२.६ मेट्रिक टन सोन्याचे साठे असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ पाकिस्तान'ने हे सोन्याचे साठे शोधून काढले आहे. या सोन्याची किंमत सुमारे ६०० अब्ज पाकिस्तानी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पंजाब प्रांताच्या खाणमंत्र्याने पाकिस्तानात सोन्याच्या खाणीचा शोध लागल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा

पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानच्या उत्तरेकडील डोंगराळ भागातून वाहणाऱ्या सिंधू नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात सोन्याचे साठे सापडले आहेत. सोन्याच्या खाणींनी समृद्ध अशा सिंधू नदीच्या पात्रात बेकायदा खाणकाम करण्यास पाकिस्तान सरकारने बंदी घालली आहे. हिवाळ्यात नदी पात्रातील पाण्याची पातळी कमी होते तेव्हा स्थानिक नागरिक नदीपात्रातून सोन्याचे कण गोळा करत असल्याने सरकारने या भागात उत्खननासंदर्भात कलम १४४ लागू केले आहे. हे सोने हिमालयातून प्रवाहाद्वारे खाली येतात आणि पेशावरभोवती जमा होतात. कालांतराने सोन्याचे कण सिंधू नदीच्या वेगाने वाहणाऱ्या पाण्याद्वारे वाहून जात नदीपात्रात जमा होतात. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात अटकजवळ सोन्याचे साठे असू शकतात, असे पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. पंजाब प्रांतात अटक जिल्ह्यात ३२ किलोमीटरच्या परिसरात सोन्याच्या खाणीचे साठे पसरलेले असल्याचे म्हटले जाते.

पाकिस्तान होणार मालामाल

पाकिस्तानात सोन्याचे साठे सापडल्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला फायदा होऊन देशावर असलेले आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांचे कर्ज फेडण्यास मदत होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. या खाणींचे योग्य पद्धतीने उत्खनन केल्यास या सोन्याच्या ठेवी पाकिस्तान सरकारला भरीव महसूल मिळवून देऊ शकतात तसेच आर्थिक स्थैर्य निर्माण करू शकतात, असं बोललं जात आहे. याशिवाय सोने काढण्याच्या प्रक्रियेद्वारे पाकिस्तानातील तरुणांसाठी नवीन रोजगार निर्माण होऊन अटकसारख्या भागात अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. पण त्यासाठी प्रशासनाने खाण कामे व्यवस्थित नियंत्रित, कायदेशीर आणि शाश्वत असल्याची खात्री करणे आवश्यक आहे, असं तज्ञांचे म्हणणे आहे.

Whats_app_banner