Year Ender 2024 : सरत्या वर्षात कशी राहिली भारताची आर्थिक वाटचाल? २०२५ कडून काय आहेत अपेक्षा?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Year Ender 2024 : सरत्या वर्षात कशी राहिली भारताची आर्थिक वाटचाल? २०२५ कडून काय आहेत अपेक्षा?

Year Ender 2024 : सरत्या वर्षात कशी राहिली भारताची आर्थिक वाटचाल? २०२५ कडून काय आहेत अपेक्षा?

HT Marathi Desk HT Marathi
Dec 26, 2024 01:07 PM IST

Year Ender 2024 News in Marathi : नव्या वर्षाचं स्वागत करताना जुन्या वर्षाचं सिंहावलोकन करणं महत्त्वाचं ठरतं. आर्थिक बाबतीत ते अधिकच गरजेचं असतं. पाहूया भारतासाठी जुनं वर्ष कसं राहिलं?

Year Ender 2024 : सरत्या वर्षात कसा राहिला भारताचा आर्थिक विकास? २०२५ कडून काय आहेत अपेक्षा?
Year Ender 2024 : सरत्या वर्षात कसा राहिला भारताचा आर्थिक विकास? २०२५ कडून काय आहेत अपेक्षा?

Year Ender 2024 : भारत देश जागतिक पातळीवर मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत आहे. आत्मनिर्भर भारत घडवण्याच्या दिशेनं सुरू केलेल्या प्रयत्नांचे परिणाम आता दिसू लागले आहेत. मेक इन इंडिया अंतर्गत जगभरातील कंपन्या आता भारतात येऊन आपली उत्पादनं बनवत आहेत. पाहूया २०२४ आर्थिक आघाडीवर कसं गेलं?

जीएसटी संकलन : कर संकलनाच्या आघाडीवर मोठी तेजी आहे. एप्रिल २०२४ मध्ये जीएसटी संकलन २.१० लाख कोटींच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचलं होतं. नोव्हेंबरमध्ये हा आकडा १.८२ लाख कोटी होता.

परकीय चलनाचा साठा : परकीय चलनाचा साठा २० सप्टेंबर रोजी २.८४ अब्ज डॉलरनं वाढून ६९२.३० अब्ज डॉलरवर पोहोचला. याच महिन्यात परकीय चलन साठ्यानं नवा उच्चांक गाठला.

सर्वात कमी बेरोजगारी : आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीत शहरी बेरोजगारीचा दर ६.४ टक्क्यांवर आला आहे. २०१७ नंतरच्या आकडेवारीनुसार ही सर्वात कमी बेरोजगारी आहे.

सोन्या-चांदीच्या भावात तेजी: गेल्या ४५ वर्षांत पहिल्यांदाच एका वर्षाच्या कालावधीत सोने आणि चांदीच्या दरात सर्वाधिक वाढ झाली आहे. सोने ८१,००० रुपये प्रति किलो झालं तर, चांदीनं १ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा ओलांडला.

यूपीआयचं वाढतं वर्चस्व : जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत यूपीआयनं १५,५४७ कोटींहून अधिक व्यवहार हाताळले असून, त्याद्वारे २२३ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत.

७.२८ कोटी आयटीआर : २०२४-२५ या कर निर्धारण वर्षासाठी एकूण ७.२८ कोटी आयटीआर दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ५.२७ कोटी विवरणपत्रे नव्या करप्रणालीअंतर्गत भरण्यात आली.

सेन्सेक्स-निफ्टी उड्डाण : सप्टेंबरमध्ये सेन्सेक्सनं ८५,९७८.२५ चा विक्रमी उच्चांक गाठला. निफ्टीनंही २६,२७७ चा उच्चांक गाठला. तेव्हापासून चढ-उतार सुरूच आहेत.

काय आहेत अपेक्षा आणि उद्दिष्टे?

सन २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे. त्यासाठी सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) उत्पादन क्षेत्राचा वाटा सध्याच्या १७ टक्क्यांवरून २५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नीती आयोगानं व्हिजन-२०४७ देखील सादर केलं आहे. या अंतर्गत अर्थव्यवस्थेनं सध्याच्या ३.३६ ट्रिलियन डॉलरच्या पातळीवरून ९ पटीनं वाढ करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे.

दरडोई उत्पन्न प्रतिवर्ष २,३९२ डॉलरच्या पातळीवरून आठ पटीनं वाढविण्याचं उद्दिष्ट आहे. त्यामुळं २०४७ पर्यंत ३० ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था असलेल्या भारताचं दरडोई उत्पन्न वार्षिक १८ हजार डॉलर होईल. यामुळं गावं गरीबमुक्त होणार आहेत. सर्वसामान्यांना चांगली घरे, शिक्षण, पिण्याचे स्वच्छ पाणी, सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देणं याचाही या व्हिजनमध्ये समावेश आहे.

रोजगारवाढ : सरकारनं १४ क्षेत्रांमध्ये प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजना सुरू केली. आता मोबाइल मॅन्युफॅक्चरिंग, फार्मास्युटिकल, इंजिनीअरिंग गुड्स अशा अनेक क्षेत्रांना याचा फायदा झाला आहे. या क्षेत्रांत रोजगाराच्या संधी वाढत आहेत. देशातील तरुणांना कौशल्यानं सुसज्ज करण्याचं काम सरकार करत आहे.

भारतानं यावर्षी चार युरोपीय देशांसोबत मुक्त व्यापार करार (FTA) केला आहे. येत्या १५ वर्षांत एक कोटी नोकऱ्या निर्माण होतील. यामध्ये स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड आणि लिनसेनस्टाईन यांचा समावेश आहे.

भारताची सेमीकंडक्टर बाजारपेठ २०२६ पर्यंत ५५ अब्ज डॉलर आणि २०३० पर्यंत ११० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. सध्या स्मार्टफोन, कार, डेटा सेंटर आणि इलेक्ट्रिकल डिव्हाइसमध्ये सेमीकंडक्टरचा वापर केला जातो.

Whats_app_banner