पैशाच्या चिंतेमुळं येणारा मानसिक ताण कसा कमी कराल? जाणून घ्या सहज करता येण्यासारख्या गोष्टी
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  पैशाच्या चिंतेमुळं येणारा मानसिक ताण कसा कमी कराल? जाणून घ्या सहज करता येण्यासारख्या गोष्टी

पैशाच्या चिंतेमुळं येणारा मानसिक ताण कसा कमी कराल? जाणून घ्या सहज करता येण्यासारख्या गोष्टी

Jul 22, 2024 02:21 PM IST

Money Management : आर्थिक ताण ही सार्वत्रिक अडचण आहे. कमाई कमी असो की जास्त, पैशाची चिंता सर्वांनाच भेडसावते. योग्य नियोजनाद्वारे या चिंतेवर मात करता येते. कशी ते पाहूया…

पैशाच्या चिंतेमुळं येणारा मानसिक ताण कसा कमी कराल? जाणून घ्या सहज करता येण्यासारख्या गोष्टी
पैशाच्या चिंतेमुळं येणारा मानसिक ताण कसा कमी कराल? जाणून घ्या सहज करता येण्यासारख्या गोष्टी (Photo via Pixabay)

'माझे सगळे पैसे जातात कुठे? 'पैसे वाचवायचे तरी कसे? असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात येत असतील ना? आर्थिक ताण ही एक सार्वत्रिक समस्या आहे. उत्पन्न कमी असो की जास्त, ही चिंता प्रत्येकालाच सतावत असते. अनपेक्षित खर्च किंवा कर्जाची सतत चिंता आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकते. त्यामुळं आर्थिक ताणतणावाची लक्षणं ओळखणं आणि प्रभावीपणे आर्थिक व्यवस्थापन करण्यासाठी प्रयत्न करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

पैशाची चिंता भावनिक निरोगीपणावर लक्षणीय परिणाम करू शकते. एका संशोधनानुसार १७ टक्के भारतीय आर्थिक अस्थिरतेमुळं तणावात आहेत.

आर्थिक चिंतेची कारणे

वाढते कर्ज : सातत्याने होणारी कर्जवाढ हे आर्थिक चिंतेचे एक प्रमुख कारण असू शकतं. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये भारतातील वैयक्तिक कर्जात २६ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. उद्योग, सेवा आणि बिगर अन्न क्षेत्रातील कर्जाच्या वाढीपेक्षा हे प्रमाण जास्त आहे.

बेरोजगारीची चिंता : एखाद्या व्यक्तीच्या रोजगाराची स्थिती त्यांच्या आर्थिक आरोग्यावर परिणाम करू शकते. आज करिअर करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत, परंतु नोकरकपातीची भीती आणि बदलत्या काळाशी जुळवून घेता येण्याची चिंताही वाढत आहेत. ऑल इंडिया आयटी अँड आयटीईएस एम्प्लॉईज युनियनच्या (AIITEU) म्हणण्यानुसार, २०२३ मध्ये आयटी / आयटीईएस क्षेत्रातील सुमारे २० हजार टेक कर्मचाऱ्यांना छुप्या नोकरकपातीमुळं रोजगार गमवावा लागला.

सामाजिक दबाव: सोशल मीडिया ब्राउझिंगमुळे भावनावेगातून होणारी खरेदी, पैशाबद्दल नकारात्मक दृष्टिकोन आणि संपत्ती व यशाविषयीच्या अवास्तव अपेक्षा निर्माण होतात. जनरेशन झेड उपभोगवादी, स्वत:ची प्रतिमा आणि प्रतिष्ठा निर्माण करण्याच्या चक्रात अडकली आहे. महागड्या आणि दुर्मिळ वस्तूंची खरेदी म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा टिकवण्याचा मार्ग असा त्यांचा समज असतो, असं एका अभ्यासातून समोर आलंय.

रोकड किंवा क्रेडिटची कमतरता: रोख रक्कम उपलब्ध नसणं हे देखील काही लोकांच्या चिंतेचं कारण असतं. पैसे गुंतवणुकीत अडकले असतील किंवा क्रेडिट कार्डचा अतिवापर सुद्धा यासाठी कारणीभूत असू शकतो.

या ताण-तणावांमुळे तरुण पिढी मादक द्रव्यांचं सेवन, जुगार खेळणे, अति खाणे, आत्महत्येचे विचार या सगळ्या दुष्टचक्रात अडकते.

आर्थिक आरोग्य आणि खराब मानसिक आरोग्य हे दुष्टचक्र

  • आर्थिक समस्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतात, कारण कर्ज किंवा इतर आर्थिक अडणींमुळं नैराश्य किंवा चिंतेची भावना उद्भवू शकते.
  • खराब मानसिक आरोग्यामुळं आर्थिक व्यवस्थापन करणं अधिक कठीण होतं. बिलांच्या वाढत्या ओझ्याचा निपटारा करताना झुंजावं लागतं. चिंता किंवा नैराश्यामुळं कामाकडं दुर्लक्ष होतं, त्याचा पुन्हा उत्पन्नावर परिणाम होतो.

आर्थिक तणावाचा सामना करण्यासाठी काही उपाय

 

एखाद्याशी बोला: आर्थिक अडचणींचा सामना करत असाल तर आपल्या विश्वासाच्या व्यक्तीचा आधार घ्या. त्याच्याशी बोला. अशा अडचणीचा सामना करणारे तुम्ही एकटे नाहीत हे लक्षात असू द्या.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या : कर्ज व्यवस्थापन, आर्थिक व्यवस्थापन, अर्थसहाय्य किंवा लाभ पदरात पाडून घेणे या सगळ्यावर मार्गदर्शन करण्यासाठी व समुपदेशनासाठी बऱ्याच संस्था किंवा ऑनलाइन स्त्रोत आहेत.

आर्थिक स्थितीचा मागोवा घ्या : आपल्या आर्थिक उलाढालींचा आढावा घ्या. विविध वेबसाइट्स आणि अॅप्स हे करण्यासाठी मदत करू शकतात. मागील खर्चाचं मूल्यांकन करण्यासाठी आपण पावत्या आणि बँक स्टेटमेंटचे पुनरावलोकन करू शकता. काही आर्थिक अडचणी सोप्या असतात. मात्र, आपल्या आर्थिक परिस्थितीचा योग्य आढावा घेतल्यास अधिक स्पष्टता येते.

योजनेला चिकटून राहा : आपली सध्याची आर्थिक परिस्थिती ओळखा आणि खर्च, बचत आणि गुंतवणुकीसाठी रणनीती तयार करा. त्या रणनीतीवर कायम राहा. गरज पडल्यास जवळच्या व्यक्तींची किंवा तज्ज्ञांची मदत घ्या.

मासिक बजेट तयार करा : आपल्या उत्पन्नाचे विशिष्ट भाग किंवा श्रेणींमध्ये विभाजन करा आणि बचतीसाठी ठराविक रक्कम वेगळी काढा. मासिक बजेटच्या बाहेर जाणं टाळा.

Whats_app_banner