Business Ideas: श्रीमंतीमुळे मुलांना बिघडू देऊ नका...
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Business Ideas: श्रीमंतीमुळे मुलांना बिघडू देऊ नका...

Business Ideas: श्रीमंतीमुळे मुलांना बिघडू देऊ नका...

HT Marathi Desk HT Marathi
Published Feb 12, 2025 08:25 PM IST

Business Ideas : पूर्वायुष्यात गरीबीत दिवस काढल्यानंतर घरात समृद्धी येते तेव्हा पुष्कळ नवश्रीमंतांची एक चूक होते. बालपणी हव्याशा वाटणाऱ्या गोष्टी आपल्याला मिळाल्या नाहीत त्या निदान आपल्या मुलांना तरी मिळाव्यात, या भावनेतून ते मुलांचे अवाजवी लाड करतात. परिणामी पुढे मुले उन्मत्त बनतात.

मुलांचे अतीलाड करू नका. श्रीमंतीमुळे मुलांना बिघडू देऊ नका
मुलांचे अतीलाड करू नका. श्रीमंतीमुळे मुलांना बिघडू देऊ नका

धनंजय दातार

मी एकदा वर्तमानपत्रातील एक बातमी वाचत होतो. मुंबईत अत्यंत श्रीमंत घरांमधील मुले कोट्यवधी रुपये किंमतीच्या गाड्या घेऊन रात्री उशिरा रहदारीच्या रस्त्यावर थरारक रेस खेळतात. समोरुन वेगात येणाऱ्या अशा गाड्या बघून आणि त्यांच्या इंजिनांच्या कर्कश्श आवाजाने स्त्यावरुन जाणारे अन्य वाहन चालक भांबावून जातात. बावचळून गेल्याने काहींचे गाडीवरचे नियंत्रणही जाते. समाजाला त्रास होणाऱ्या शर्यती खेळणाऱ्या मुलांपेक्षा मी त्यांच्या पालकांना दोषी मानतो. आपल्या मुलांना जबाबदार, कायद्याचे पालन करणारे आणि सुसंस्कृत नागरिक बनवण्यापेक्षा समाजाला उपद्रव देणारे धनदांडगे बनवण्यात या पालकांचे फाजील लाड कारणीभूत असतात. असली श्रीमंती काही कामाची नाही. 

मागे दुबईत एक प्रकार असा घडला, की एका श्रीमंत पालकाला पोलिस स्टेशनमधून ‘अमुक दिवशी, अमुक वेळेला तुमची गाडी कोण चालवत होते?’, अशी विचारणा फोनवर झाली. वडिलांनी मुलाचे नाव सांगताच पोलिस अधिकाऱ्याने दोघांना चौकशीसाठी पोलिस स्टेशनला पाचारण केले. तेथे गेल्यावर पोलिसांनी सांगितले, की तुमच्या गाडीने कुणाला तरी धडक दिली असून हा हिट अँड रनचा प्रकार समजून पोलिस तपास करत आहेत. यावर चक्रावलेल्या वडिलांनी मुलाकडे विचारणा केली असता त्याने आपल्या गाडीने कुणालाही धडक न दिल्याचे ठामपणे सांगितले. त्यावर पोलिसांनी त्याच्यापुढे एक व्हिडिओ क्लिप पुरावा म्हणून ठेवली. त्यामध्ये त्या गाडीपुढे एकजण आडवा पडला असून बाकी मुलेही डोकावून बघत असल्याचे दिसत होते. गाडीची नंबर प्लेटही क्लिपमध्ये दिसत होती. याखेरीज एक महिलाही साक्षीदार होती जिने हा प्रकार पाहिला होता. स्पष्ट पुरावा समोर येताच मग कुठे त्या मुलाने कबूल केले, की प्रत्यक्षात कोणताही अपघात घडला नव्हता. 

या मुलाने आणि त्याच्या मित्रांनी सोशल मिडियावर गंमत म्हणून क्लिप टाकण्यासाठी अपघाताचा देखावा निर्माण केला होता. गाडीपुढे आडवा पडलेला आणि जखमी झाल्याचा अभिनय करणारा त्यांच्याच गटातील मित्र होता. या बनावट अपघाताचे चित्रीकरण चालू असताना तो देखावा एका महिलेनेही पाहिला होता आणि तिनेच पोलिसांना कळवले होते. अपघातातील जखमी व्यक्तीला उपचारासाठी कुठे दाखल केले आहे, हे शोधून काढण्यासाठी पोलिस दोन दिवस दुबईतील सर्व रुग्णालये पिंजून काढत होते. खरा प्रकार समोर येताच पोलिसांनी तपास थांबवला, पण कायदा व सुव्यवस्था यंत्रणेचा वेळ नाहक खर्ची घातल्याच्या कारणावरुन वडील आणि मुलावर कारवाईचा पवित्रा घेतला. अखेर खूप गयावया केल्यानंतर त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले. मुलांच्या असल्या खोड्यांमुळे पोलिस यंत्रणेला आणि पालकांना विनाकारण मनस्ताप झाला.

माझ्या मुलांचे मी कधीही अवाजवी लाड केले नाहीत. त्यांच्या गाडी चालवण्यावर माझे नेहमीच लक्ष असते. एकदा माझा मोठा मुलगा हृषिकेश त्याच्या आईला सांगत होता, की गाडी चालवताना मागून येणाऱ्या एका बेदरकार वाहनाने त्याच्या गाडीला किंचित धडक दिली असून ती गाडी न थांबता निघून गेली. मी ते ऐकले आणि त्याला स्थानिक कायद्याची जाणीव करुन दिली. आपली चूक नसली तरी अशा अपघाताचे रिपोर्टिंग आपण तत्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात करायचे असते. मी स्वतः त्याला पोलिस स्टेशनला घेऊन गेलो व घडलेल्या प्रकाराबाबत लेखी निवेदन देऊन आलो. हृषिकेश मला म्हणाला, “बाबा, गाडीचे किरकोळ नुकसान झाले आहे त्यासाठी एवढा उपद्व्याप कशाला करायचा?” त्यावर मी म्हणालो, “तो धडक मारुन गेलेला चालक कदाचित तुझ्याइतका सभ्य नसेल. स्वतःची चूक असुनही त्याने तुझ्याविरुद्धच धडक दिल्याची खोटी तक्रार दिली तर नसता मनस्ताप होईल. त्यापेक्षा घटना घडल्यावर लगेच पोलिसांकडे आपले निवेदन दिल्यास आपण सेफ होतो. कायद्याचे पालन करण्याबाबत आपण नेहमीच सतर्क असावे.” 

मित्रांनो, तरुण पिढीपुढे ध्येय किंवा आदर्श नसल्यास ते भरकटण्याचा धोका असतो. विशेषतः सध्याच्या काळात श्रीमंतांनी आपल्या मुलांना अतिलाड, व्यसने, बेफिकीरी, विलासी राहणी व कुसंगती यापासून जपण्यासाठी फारच सावध राहिले पाहिजे. मुले अखेर आपलेच अनुकरण करतात. म्हणून शिस्तीची सुरवात स्वतःपासून करावी. संपत्तीच्या जोरावर उन्मत्त होऊन इतरांना नाडण्याची वृत्ती ही तमोगुण असते, असा इशारा देताना समर्थ रामदास म्हणतात,

प्राप्त जालिया संपत्ती। जीवांसी करी यातायाती ।

कळवळा नोहे चित्ती । तो तमोगुण ॥

(धनंजय दातार हे दुबईस्थित अदिल उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.)

Whats_app_banner