मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Business Ideas : उद्योग क्षेत्रात ‘जो दिखता है वोही बिकता है...’ हेच सूत्र चालतं…

Business Ideas : उद्योग क्षेत्रात ‘जो दिखता है वोही बिकता है...’ हेच सूत्र चालतं…

HT Marathi Desk HT Marathi
May 09, 2024 10:15 PM IST

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी (Simple living, high thinking) हे तत्त्व एरवी अनुसरण्यासाठी कितीही महान असले तरी व्यावसायिक जगात मात्र ते बाजूला ठेवावे लागते. किमान श्रीमंतांच्या जगात तरी भपकेबाज राहणी हेच प्रवेशासाठीचे ओळखपत्र असते.

Business ideas- Importance of self marketing
Business ideas- Importance of self marketing

 

ट्रेंडिंग न्यूज

धनंजय दातार

आमची ‘अदील’ कंपनी व्यवसायात स्थिरावल्यावर एक गोष्ट मला जाणवली, की आपला प्रभाव पडण्यासाठी नुसते खूप बोलून उपयोग नसतो तर काही गोष्टी मूकपणे इतरांना जाणवून द्याव्या लागतात. विशेषतः उच्चभ्रू आणि श्रीमंत वर्गात वावरायचे तर तुमच्याकडे संपत्तीचे ओळखपत्र लागते किंवा किमान तसा आव आणावा लागतो. इथे भपक्याला महत्त्व असते. तुमची कार साधी आहे, की आलिशान आहे, यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. हे उमगल्याने मी मोठेच धाडस करुन चक्क रोल्स रॉईस कंपनीची महागडी फँटम मॉडेलची कार खरेदी केली. तिचे वैशिष्ट्य म्हणजे कंपनीने गेल्या १०५ वर्षांमध्ये तशा केवळ १८ गाड्या बनवल्या होत्या आणि मी खरेदी केलेले मॉडेल दुबईतील पहिलेच होते.

या कारच्या खरेदीसाठी एका बँकेने मला मदत केली. त्यावेळी गाडीच्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी मला त्या बँकेच्या व्यवस्थापकाला भेटावे लागले. माझी कंपनी, व्यवसायाचे स्वरुप, अकाऊंटमधील उलाढाल याबद्दल त्याला इत्थंभूत माहिती होती. त्याने मला एक साधासा प्रश्न विचारला, “दातार साहेब! दुबईत कुणाहीकडे नसलेली सुंदर कार तुम्ही खरेदी केलीत तर दाखवायला आणलीय का? कुठे पार्क केलीय?” त्यावर मी उत्तरलो, “कुठे म्हणजे? आमच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये. बँकेची शाखा घराजवळच असल्याने मी चालतच आलो. येताना कार आणलेली नाही. विनाकारण कशाला दिखावा करायचा?” त्यावेळी आमचे दुकान बँकेपासून जवळच्या इमारतीत खालच्या मजल्यावर होते आणि आम्ही वरच्या मजल्यावर राहात होतो. यावर तो व्यवस्थापक हसून म्हणाला, “सरऽ नाराज होणार नसलात तर एक सांगतो. तुम्ही तुमची आलिशान कार रस्त्यावर सगळ्यांना दिसेल अशी पार्क करत जा. त्यावर कायमस्वरुपी एक शोफर तैनात करा आणि सर्वत्र दिमाखाने फिरत जा. लोकांपुढे मुद्दाम कार मिरवा.”

त्याच्या त्या सल्ल्याने माझी करमणूक झाली, पण तो मात्र शांतपणे म्हणाला, “साहेबऽ हे सांगण्यामागे कारण आहे. तुमची कंपनी छान प्रगती करत आहे, हे उलाढालीवरुनच लक्षात येतंय पण ते केवळ बँकेला ठाऊक असून चालणार नाही. जे बडे उद्योजक तुमच्याशी व्यवहार करणार आहेत त्यांना आकडेवारीच्या भाषेत रस नसतो. ते केवळ पैशाची भाषा जाणतात. तुम्ही साधेपणाने राहिलात तर ते तुम्हाला त्यांच्या बरोबरीचे समजणार नाहीत. त्यामुळे तुम्ही स्वतः बोलण्यापेक्षा तुमच्या पैशाला बोलू द्या. एक काम करा. ही कार घेऊन समुद्र किनाऱ्यावर जा आणि तेथे शांतपणे विचार करा.” त्याच्या सूचनेतील तथ्य पडताळण्यासाठी मी कार काढून शोफरला घेऊन जुमैरा बीचवर गेलो. जुमैरा बीच ही दुबईतील अशी जागा आहे जेथे अतिश्रीमंत वर्गातील लोकांची कायम वर्दळ असते. मी मुद्दाम माझी गाडी सगळ्यांना दिसेल अशी पार्क केली. ती फँटम मॉडेलची रोल्स रॉईस त्यावेळी दुबईतील एकमेव असल्याने चमत्कारच घडला. माझी कार बघण्यासाठी विशेषतः तरुणाईची खूपच गर्दी झाली. जो तो गाडीजवळ येऊन निरखून बघू लागला. शोफरकडून त्यांना समजले, की ही गाडी अदील ट्रेडिंग कंपनीचे मालक धनंजय दातार यांची आहे. ही बातमी हळूहळू उद्योजकांच्या वर्तुळात पसरताच मला आपोआप प्रसिद्धी मिळाली.

त्या बँक मॅनेजरचे शब्द पुढे खरे ठरले कारण नंतर मी व्यावसायिक भेटी घ्यायला जायचो तेव्हा उच्चभ्रू लोक आधी माझ्या कारकडे बघून माझी पत जोखायचे आणि आपोआप अदबीने बोलायचे. एकेकाळी मी साधा दुकानदार असताना याच दुबईत कुणी मुलाच्या वाढदिवसासारख्या घरगुती कार्यक्रमालाही मला बोलावत नव्हते पण आता मात्र मला मोठमोठ्या शाही मेजवान्यांची आमंत्रणे न मागता येऊ लागली. बिझनेस डील्स सहजपणे होऊ लागली. मला ठाऊक होते, की हा सगळा पैशाचा चमत्कार होता. मी भपक्यासाठी धाडसाने थोडा अधिक खर्च केला, पण त्या प्रसिद्धीचा लाभही व्यवसायाच्या प्रगतीसाठी अचूक उठवला.

मित्रांनोऽ मी पैशाला देव किंवा सर्वस्व न मानता माणुसकी, मैत्री, नाती ही मूल्ये त्याहून श्रेष्ठ मानतो, पण त्याचवेळी व्यवहारी जगातील पैशाचे महत्त्वही दुर्लक्षत नाही. हिरा अंधारात राहिला तर उपयोग काय? ‘जो दिखता है वोही बिकता है’ हा आजच्या जगातील यशाचा मंत्र आहे. नेहमीच ‘झाकले माणिक’ राहण्यात फायदा नसतो त्यामुळे वेळप्रसंगी श्रीमंतीचा आव आणून प्रसिद्धीचा फायदा घेण्यात मागे राहू नका.

(लेखक धनंजय दातार हे दुबईस्थित अदिल उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत)

WhatsApp channel