Business Ideas : व्यवसाय-उद्योग करताना हुकूमाचे पान जवळ हवेच...
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Business Ideas : व्यवसाय-उद्योग करताना हुकूमाचे पान जवळ हवेच...

Business Ideas : व्यवसाय-उद्योग करताना हुकूमाचे पान जवळ हवेच...

HT Marathi Desk HT Marathi
Nov 25, 2024 11:43 PM IST

business ideas : कुस्तीतील एका डावपेचानुसार आपली मान दुसऱ्याच्या हातात असेल तर त्याचीही मान आपल्या हातात असायला हवी, जेणेकरुन प्रतिस्पर्धी आपल्याला सहजासहजी लोळवून चीत करु शकणार नाही.

'उद्योगमंत्र' - उद्योग कसा उभारावा
'उद्योगमंत्र' - उद्योग कसा उभारावा

 

धनंजय दातार

उद्योजक-व्यावसायिकाने समोरच्या पक्षाशी व्यावसायिक करार करताना ते आपला वकील किंवा सनदी लेखापाल (सीए) अशा अनुभवी लोकांच्या मार्गदर्शनाखाली नीट लेखी करुन घेणे फार महत्त्वाचे असते. व्यवसायात समोरच्या व्यक्तीची आश्वासने किंवा तोंडी व्यवहारांवर भरवसा ठेवणे, हा निव्वळ भोळसटपणा ठरतो. मला धंद्याच्या सुरवातीच्या काळात असाच वचनभंगाच्या फसवणुकीचा अनुभव आला होता. भारतातील एका अगरबत्ती उत्पादकाला त्याचा माल आखाती देशांमध्ये विकायचा होता. त्याने प्राथमिक चर्चेत “मी केवळ तुमच्या कंपनीतर्फेच माझ्या अगरबत्त्यांचे वितरण करणार आहे,” असा शब्द मला दिला. मी त्याच्यावर भरवसा ठेवला व कोणताही लेखी करार न करता एकदम मोठी ऑर्डर दिली. तो उत्पादक दुबईत येताच उत्तम पाहुणचार करुन त्याला अगदी माझ्या गाडीतून नेऊन स्थानिक बाजारपेठ फिरवून दाखवली. पुढे या गृहस्थाने एकाच शिपमेंटमधून तो माल माझ्याप्रमाणेच अन्य एकाला पाठवला. 

आम्ही मागवलेला साठा संथपणे खपत असल्याने मी चौकशी केली. तेव्हा त्या ब्रँडच्या अगरबत्त्या दुबईतील अन्य दुकानांमध्येही विकल्या जात असल्याचे समजले. त्या उत्पादकाने नफ्याच्या लालसेने मला दिलेला शब्द पाळला नाही, याचे मला वाईट वाटले. मी त्यानंतर त्याच्याशी कुठलाच व्यवहार केला नाही आणि कुणाच्याही साखरपेरणीला भुलायचे नाही, असा खडा कानाला लावला.  या प्रसंगातून मी शहाणा आणि व्यवहार कठोर झालो. कोणताही व्यवहार लेखी, स्पष्ट अटी नमूद करुन व कायदेशीर सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली करु लागलो. 

काही वर्षांपूर्वी भारतातील एका प्रसिद्ध ब्रँडने त्यांची उत्पादने आखाती देशांच्या बाजारपेठेत वितरित करण्याचा प्रस्ताव माझ्यापुढे मांडला. चर्चेदरम्यान त्या कंपनीने विविध उत्पादनांच्या जोरावर आपण भारतीय बाजारपेठ अल्पावधीत कशी काबीज केली, हा मुद्दा माझ्या मनावर ठसवणे सुरु केले. मी अर्थातच त्यांच्या मोठेपणाला बळी पडलो नाही. आम्ही तुमच्या उत्पादनांचे आखाती देशांतील एकमेव वितरक असू, यासंदर्भातील करार कागदोपत्री होईल आणि लेखी शर्तीच ग्राह्य धरल्या जातील, असे मी सुरवातीलाच स्पष्ट केले. मी जरा जास्तच व्यवहारी व रोखठोक असल्याची त्यांची समजूत झाली, पण मी माझ्या भूमिकेवर ठाम राहिलो. 

लोक स्वतःचा फायदा साधण्यासाठी इतरांचा निव्वळ वापर करुन घेतात, हे जळजळीत सत्य मला उमगले होते. कधीकधी कॉन्ट्रॅक्ट हातातून जात असेल तर व्यापारी जवळचा शिलकी मालाचा साठा प्रसंगी कमी किंमतीत विकून गुंतवलेले शक्य तेवढे भांडवल मोकळे करण्याचा मार्ग अनुसरतात. पण असा व्यवहार आतबट्ट्याचा ठरुन त्यांचेच नुकसान होते. दुसरीकडे एकदा खरेदीदारांना कमी किंमतीत माल मिळायला लागला की ते अन्य व्यापाऱ्यांशीही घासाघीस सुरु करतात. परिणामी किंमती घसरत जाऊन अंतिमतः बाजारपेठेचेही नुकसान होते. हे टाळायचे असेल तर आपल्या पोर्टफोलिओत उत्पादनांचे वेगवेगळे ब्रँड ठेवावे लागतात म्हणजे त्यातील एक हातातून गेला तरी इतर ब्रँड विकून तग धरता येते. सगळी अंडी एकाच टोपलीत ठेऊ नयेत, कारण एक नासले तर इतरही लगेच नासतात, अशा अर्थाची इंग्रजी म्हण येथे सार्थ ठरते.

व्यवसायासाठी एकच कंपनी किंवा ब्रँडवर विसंबणे किती धोक्याचे असते, याचे दुर्दैवी उदाहरण मी पाहिले आहे. एक सुपर मार्केटची साखळी होती. तिला एक व्यावसायिक डाळी, मसाले आदी वस्तू पॅक करुन देत असे. काही वर्षे सातत्याने पुरवठा केल्यावर त्याला स्वतःच्या धंद्याचा विस्तार करण्याची इच्छा झाली. त्याने कर्ज काढून नवे घर विकत घेतले आणि पॅकेजिंगची नवी यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठीही मोठा खर्च केला. सुपर मार्केट आपल्याला कायम काम देत राहील, या भरवशावर त्याने हे धाडस केले, पण लवकरच त्याच्यावर तोंडघशी पडण्याची वेळ आली. एक दिवस त्या सुपर मार्केटने ते पॅकिंगचे काम अकस्मात् या पुरवठादाराकडून काढून घेऊन कमी किंमत आकारणाऱ्या दुसऱ्या व्यावसायिकाला दिले. जुन्या पुरवठादारासाठी हा फारच मोठा धक्का होता. त्याने व्यवसाय विस्तारासाठी ज्यांच्याकडून कर्ज घेतले होते ते खासगी सावकार आणि बँका कर्जवसुलीसाठी अगदी घरापर्यंत येऊन तमाशा करु लागले. त्या तणावातच या व्यावसायिकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. मित्रांनो, ‘दुधाने तोंड पोळल्यावर माणूस ताकही फुंकून पितो’, अशी म्हण आहे. व्यवसाय हे तीव्र स्पर्धेचे क्षेत्र असल्याने व्यावसायिकाने सदैव सावध राहणे गरजेचे असते. व्यवहारात फसायचे नसल्यास तोंडी आश्वासनांपेक्षा उभय पक्षांतील कागदोपत्री व कायदेशीर करार हे आपल्या हातातील हुकूमाचे पान ठरते.

(लेखक धनंजय दातार हे दुबईस्थित अदिल उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत)

Whats_app_banner