Explainer : सर्वात चांगला टर्म इन्शुरन्स प्लान कसा निवडावा? ध्यानात ठेवा या ५ गोष्टी
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Explainer : सर्वात चांगला टर्म इन्शुरन्स प्लान कसा निवडावा? ध्यानात ठेवा या ५ गोष्टी

Explainer : सर्वात चांगला टर्म इन्शुरन्स प्लान कसा निवडावा? ध्यानात ठेवा या ५ गोष्टी

Jan 04, 2025 12:46 PM IST

How To Choose Best Term Insurance Plan : कोव्हिडनंतर टर्म इन्शुरन्स बाबत जागरुकता वाढली असून लोक हे प्लान खरेदी करू लागले आहेत. हे प्लान खरेदी करताना काय काळजी घ्यावी याबद्दल…

Term Plan Tips : सर्वोत्तम टर्म इन्शुरन्स प्लान कसा निवडावा? ध्यानात ठेवा या ५ गोष्टी
Term Plan Tips : सर्वोत्तम टर्म इन्शुरन्स प्लान कसा निवडावा? ध्यानात ठेवा या ५ गोष्टी

Best Term Insurance Plan : कोव्हिडनंतर लोकांमध्ये विम्याविषयी जागरूकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जीवन विमा, आरोग्य विमा, टर्म इन्शुरन्स आदींची खरेदी लोक मोठ्या प्रमाणात करत आहेत. टर्म इन्शुरन्सचं महत्त्व देखील हल्ली वाढत आहे. या पार्श्वभूमीवर या योजनेविषयी जाणून घेणं औचित्याचं ठरेल.

टर्म इन्शुरन्सचा लाभ ज्यावेळी घरातील कर्त्या पुरुषाचा (ज्यांनी विमा घेतला आहे) अकाली मृत्यू होते, तेव्हा त्याच्या कायदेशीर वारसाला (नॉमिनी) मिळतो. अडचणीच्या काळात मिळालेली ही रक्कम कुटुंबासाठी आणि नॉमिनीसाठी खूप उपयुक्त ठरते. वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या प्रकारचे टर्म इन्शुरन्स प्लान विकत असतात. अशावेळी सर्वसामान्य लोक गोंधळून जातात. कोणता टर्म इन्शुरन्स खरेदी करायचा? काय लक्षात ठेवावं? समजून घेऊया सविस्तर…

आपली गरज समजून घ्या!

टर्म इन्शुरन्स खरेदी करताना आधी तुमची गरज पाहा. आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाला किती पैशांची आवश्यकता असेल याचा विचार करा. समजा तुम्ही आजपासून २० वर्षांसाठी टर्म प्लॅन खरेदी करत असाल तर महागाईनुसार किती पैशांची गरज असेल याचा हिशोब करा. जर तुमच्याकडं होम लोन किंवा पर्सनल लोन असेल किंवा मुलांचं शिक्षण अपूर्ण असेल तर या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. सर्व काही जोडून स्वतःसाठी एक योजना खरेदी करा. बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या कॅलक्युलेटर आणि सल्ला मोफत देत आहेत. त्यांच्याकडूनही मदत मिळू शकते.

कंपन्यांपासून काय लपवायचं?

टर्म इन्शुरन्स खरेदी करणारी व्यक्ती आपल्या वाईट सवयी कंपन्यांपासून लपवू लागते. हे अजिबात करू नका. लक्षात ठेवा हा विमा तुमच्या कुटुंबाच्या फायद्यासाठी आहे. त्यामुळं तुमची छोटीशी चूक कंपनीसाठी क्लेम फेटाळण्याची संधी बनेल. तुम्ही धूम्रपान करता की नाही हे कंपन्या विचारतात. तसं असेल तर कृपया त्याबद्दल माहिती द्या. यामुळं ही योजना थोडी महाग होऊ शकते पण तुमचं कुटुंब पूर्णपणे सुरक्षित राहील. विमा कंपन्या भरपाई देताना अनेक गोष्टी तपासतात. अशा वेळी त्यांच्यापासून काहीही लपवता येत नाही.

कोणत्या कंपनीचा टर्म इन्शुरन्स प्लान खरेदी करावा?

या प्रश्नाचं उत्तर सोपं नाही. मात्र, तुम्ही गोंधळत असाल तर तुम्ही कंपन्यांची आकडेवारी तपासून पाहणं गरजेचं आहे. टर्म इन्शुरन्स विकणारी कंपनी या क्षेत्रात किती वर्षांपासून कार्यरत आहे हे सर्वप्रथम पाहा. त्याच्या व्यवसायाचा आकार किती मोठा आहे? व्यवसायाचा आकार लहान असेल तर अशा कंपनीकडून टर्म इन्शुरन्स खरेदी करणं टाळावं. कारण ही कंपनी या क्षेत्रात किती वर्षे टिकेल याची शाश्वती नसते.

टर्म इन्शुरन्स खरेदी करताना सेटलमेंटची रक्कम किती मोठी आहे हे नक्की पहा. जर रक्कम कमी असेल तर अशी कंपनी टाळा. त्याचबरोबर कंपनीची सेटलमेंट टक्केवारी किती आहे, हेही तपासा. ही टक्केवारी ९८ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास अशा कंपनीकडून विमा खरेदी करणं टाळावं. ही सर्व माहिती आयआरडीएआयच्या संकेतस्थळावर सहज मिळू शकते. आयआरडीएआय दरवर्षी या सर्व माहितीसह एक अहवाल जारी करते. मात्र, हा अहवाल एक वर्ष जुना असतो.

प्लान खरेदी करताना होतात या चुका

जेव्हा एखादी व्यक्ती टर्म इन्शुरन्स खरेदी करायला जाते, तेव्हा कधी नकळत तर कधी जाणूनबुजून त्याच्याकडून चुका होतात. एखादा प्लॅन खरेदी करताना त्यात कोणते रायडर्स उपलब्ध आहेत, हे लक्षात ठेवा. उदाहरणार्थ, समजा तुम्ही १ कोटी रुपयांचा प्लॅन खरेदी केला आहे. त्या प्लॅनमध्ये क्रिटिकल इलनेस, अ‍ॅक्सिडेंटल असे रायडर्स नसतील तर ती सुविधा तुम्हाला मिळणार नाही.

अनेकदा असं होतं की, कंपन्या गंभीर आजाराची रक्कमही मूळ रकमेत जोडतात. समजा १ कोटींचा प्लॅन असेल तर गंभीर आजाराच्या वेळी तुम्हाला ३० लाख रुपये मिळतात. मग फक्त ७० लाख रुपये शिल्लक राहतात. असा प्लान टाळा. जेव्हा आपण एखादी योजना खरेदी करता तेव्हा या सर्व रायडर्सची तपासणी नक्की करा. ती स्वतंत्र राहील किंवा मूळ रकमेत जोडली जाईल.

परताव्यासाठी टर्म इन्शुरन्स खरेदी करू नका

कोणतीही व्यक्ती कठीण परिस्थितीसाठीच टर्म इन्शुरन्स खरेदी करते. अशा वेळी त्यातून परताव्याची अपेक्षा ठेवू नका. जर तुम्ही तसं करत असाल तर तुम्ही चूक करत आहात. कारण अशा योजना महाग असतात आणि जेव्हा परतावा मिळतो तेव्हा तो खूप कमी असतो. ज्याचा दीर्घकालीन फारसा फायदा होत नाही.

Whats_app_banner