कॅपिटल गेन टॅक्स कसा टाळावा? नेटकऱ्यांनी सुचवले भन्नाट मार्ग, हे तुम्हालाही सुचणार नाही!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  कॅपिटल गेन टॅक्स कसा टाळावा? नेटकऱ्यांनी सुचवले भन्नाट मार्ग, हे तुम्हालाही सुचणार नाही!

कॅपिटल गेन टॅक्स कसा टाळावा? नेटकऱ्यांनी सुचवले भन्नाट मार्ग, हे तुम्हालाही सुचणार नाही!

Jul 27, 2024 04:39 PM IST

Netizens on capital gain tax : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भांडवली उत्पन्नावरील करात केलेल्या वाढीचे तीव्र पडसाद सोशल मीडियात उमटत आहेत.

कॅपिटल गेन टॅक्स कसा टाळावा? नेटकऱ्यांनी सुचवले भन्नाट मार्ग, हे तुम्हालाही सुचणार नाही!
कॅपिटल गेन टॅक्स कसा टाळावा? नेटकऱ्यांनी सुचवले भन्नाट मार्ग, हे तुम्हालाही सुचणार नाही! (ANI Photo/SansadTV)

Netizens on capital gain tax : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अर्थसंकल्पात प्राप्तिकराविषयी अनेक घोषणा केल्या. त्यात भांडवली उत्पन्नावरील करातील (Captial Gain Tax) वाढ सर्वाधिक चर्चेचा व नाराजीचा विषय ठरली आहे. सोशल मीडियावर या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटत आहेत.

वित्तीय व बिगर वित्तीय मालमत्ता गुंतवणुकीवरील करात वाढ करण्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. त्यानुसार, दीर्घकालीन भांडवली नफा (LTCG) कर १० टक्क्यांवरून १२.५० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे, तर अल्पकालीन भांडवली नफा (STCG) कर १५ टक्क्यांवरून २० टक्के करण्यात आला आहे.

अर्थमंत्र्यांनी इक्विटी आणि इंडेक्स ट्रेडवरील सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (एसटीटी) दरात वाढ केली. शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणाऱ्या छोट्या गुंतवणूदारांसाठी हा धक्का मानला जात आहे. निर्मला सीतारामन यांनी कर प्रस्तावांची घोषणा करताच भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. सरकारचा हा निर्णय गुंतवणूकदार अद्यापही पचवू शकलेले नाहीत. त्यामुळं सोशल मीडियाच्या माध्यमातून यावर उपरोधिक टीका करायला सुरुवात केली आहे.

भांडवली कराच्या वाढीची खिल्ली उडवणारी पोस्ट
भांडवली कराच्या वाढीची खिल्ली उडवणारी पोस्ट

काय म्हणतात नेटकरी?

भांडवली कर टाळण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे शेअर जास्त किंमतींना विकत घ्या आणि कमी किंमतीला विका. अनेक लोकांना हे माहीत नाही, अशी उपरोधिक प्रतिक्रिया एक नेटकऱ्यानं दिली आहे. त्याला दुसऱ्यानं तितकंच भन्नाट प्रत्युत्तर दिलं आहे. 'इन्कम टॅक्स टाळण्याचा एक मार्ग म्हणजे काही कमवूच नका,' असं त्यानं म्हटलं आहे.

या पोस्ट पाहून अनेकांच्या प्रतिभेला बहर आला आहे. एकानं म्हटलं आहे की भांडवली कर वाचवण्याचा आणखी एक मार्ग आहे. तो म्हणजे, खरेदी केलेले शेअर कधी विकूच नका! तर, एका युजरनं थोडा अतिरेकी सल्ला दिला आहे. ‘प्राप्तिकर विभागावर बॉम्बहल्ला करा,’ असा संताप त्यानं व्यक्त केला आहे.

इंग्लंडसारखा कर आणि सोमालियासारख्या सुविधा

आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांनी २०२४ च्या अर्थसंकल्पात करवाढीवर चर्चेचा प्रस्ताव मांडला होता. 'मागच्या १० वर्षांत सरकारनं कर लादून देशातील सर्वसामान्य जनतेचं रक्त शोषलं आहे. त्या बदल्यात सरकार आम्हाला काय देतं? हे सगळं पाहून संताप येतो. आज भारतीय नागरिक सोमालियासारख्या सुविधा मिळवण्यासाठी इंग्लंडसारखा कर भरतो, हे सांगायला मला अजिबात संकोच वाटत नाही, असं राघव चड्ढा म्हणाले.

Whats_app_banner