Business Ideas : उद्योग-व्यवसायात संपत्तीच्या लोभाने आंधळा झालेला माणूस नाती-गोती, मैत्री सर्वच विसरतो…
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Business Ideas : उद्योग-व्यवसायात संपत्तीच्या लोभाने आंधळा झालेला माणूस नाती-गोती, मैत्री सर्वच विसरतो…

Business Ideas : उद्योग-व्यवसायात संपत्तीच्या लोभाने आंधळा झालेला माणूस नाती-गोती, मैत्री सर्वच विसरतो…

HT Marathi Desk HT Marathi
Dec 18, 2024 10:33 PM IST

समर्थ रामदासांनी मनाच्या श्लोकात ‘नको रे मना लोभ हा अंगिकारु’, असे बजावले ते योग्यच आहे. लोभ हा असा दुर्गुण आहे, जो एकदा मनात रुजला, की सदसद्विवेकबुद्धीला झाकोळून टाकतो. संपत्तीच्या लोभाने आंधळा झालेला माणूस नाती-गोती, मैत्री, संवेदनशीलता विसरुन जातो.

उद्योग व्यवसायात अती लोभ हा दुर्गुण असतो
उद्योग व्यवसायात अती लोभ हा दुर्गुण असतो

 

धनंजय दातार

‘माणसाला किती जमिनीची गरज असते?’ ही लिओ टॉलस्टॉय या प्रसिद्ध लेखकाची अगदी छोटीशी कथा आहे. राजाने जाहीर केलेल्या स्पर्धेत अधिकाधिक जमीन मिळावी म्हणून एक शेतकरी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अखंड धावतो आणि अखेर उर फुटून मरतो. त्याच्या वाट्याला अखेर केवळ साडेतीन हात (देह पुरण्याइतकी) जमीन येते. लोभी माणसाच्या वाट्याला अखेर निराशा येते, हे या कथेचे तात्पर्य. 

मी आजवरच्या आयुष्यात स्वतःला हावरटपणापासून कायम लांब ठेवले असले तरी अनेक लोभी माणसांना फार जवळून बघितले आहे. त्यांच्या आयुष्याची परवड होतानाही पाहिली आहे. माझ्या माहितीचा एक संपन्न व्यावसायिक होता, ज्याचा व्यवसाय खरं तर चांगला चालला होता, पण तो इतका हावरट बनला, की सतत पैशाचाच विचार करायला लागला. कुटुंबाला वेळ देईना, की मित्रांमध्ये मिसळेना. हळूहळू या लोभीपणाने त्याचे कुटूंब कंटाळून त्याच्यापासून दुरावले व तो एकटा पडला. दुर्दैवाने त्याचे निधनही एकाकी अवस्थेतच झाले. अखेरच्या क्षणी पाणी पाजायला त्याची पत्नीही जवळ नव्हती, मुलेही नव्हती आणि साठवलेल्या गडगंज पैशाचा काही उपयोग नव्हता. 

पैशाच्या मोहापायी माणूस मित्र, कुटूंब, नाती, आरोग्य यांच्याकडे दुर्लक्ष करतो तेव्हा दुःखाखेरीज त्याच्या पदरात काहीच पडत नाही. मुंबईत एक फरसाण बनवणारा व्यावसायिक होता. त्याचा नमकीनचा ब्रँड लोकप्रिय आणि प्रसिद्ध होता. कोट्यवधींची उलाढाल होती आणि सर्व काही चांगले होते. या व्यावसायिकाची बहीण एकदा आर्थिक अडचणीत सापडली. भावाने बहिणीला काहीतरी १५ लाख रुपयांची मदत केली. पुढे तो त्या पैशावरुन बहिणीला वारंवार विचारणा करु लागला. बहिणीने ते पैसे स्वतःसाठी वापरले नव्हते तर तिच्या पतीला झालेले कर्ज निवारण्यासाठी खर्च केले होते. ती बिचारी स्वतःचाच संसार मेटाकुटीने चालवत होती. इकडे भावाचा गैरसमज झाला, की आपले पैसे बुडवायचे आहेत म्हणून बहीण कायम सबबी सांगून देणे टाळत आहे. 

एक दिवस हा भाऊ बहिणीच्या घरी जाऊन “माझे उसने घेतलेले पैसे दे, त्याशिवाय मी येथून जाणार नाही,” असे म्हणून हट्ट धरुन बसला. बहिणीने परोपरीने सांगितले, की “माझ्याकडे सध्या इतके पैसे नाहीत, पण मी तुझ्या कर्जाची जमेल तशी संपूर्ण परतफेड करेन.” तरीही हा ऐकेना. शब्दाने शब्द वाढत गेला आणि त्यातून मोठे भांडण झाले. अखेर वैतागाने बहीण म्हणाली, “माझ्याकडे विष खायलाही पैसा नाही हे सांगणे तुला खोटं वाटतंय ना? मग मी तुझ्यासमोर जीवच देते. मग तर तुझी खात्री पटेल ना?” इतके बोलून ती थांबली नाही तर तिने तिरीमिरीत आतल्या खोलीत जाऊन खरोखर गळफास लावून घेतला. बहिणीचा मृतदेह बघताच भाऊ हादरला आणि त्याला आपली चूक उमगली. त्याला स्वतःच्या कृत्याचा इतका पश्चात्ताप झाला, की त्यानेही भावनेच्या भरात जवळच्या रेल्वे स्टेशनवर जाऊन धावत्या आगगाडीखाली स्वतःला झोकून दिले. एक लोभ आणि उतावीळपणा नियंत्रणात ठेवला असता तर दोन जीव हकनाक गेले नसते. म्हणून माणसाने पैशाच्या लोभापोटी जवळची नाती तोडू नयेत, ती यासाठीच.

लोभीपणापायी पुष्कळ लोक हातात असलेला चांगला धंदा घालवून बसतात. दुबईत एक पुरवठादार व्यापारी होता. एका मोठ्या कंपनीला तो झुंबरांसाठी लागणारे क्रिस्टल्स (लोलक) बनवून द्यायचा. कंपनीचा त्याच्यावर अत्यंत विश्वास होता आणि त्यांनी त्याला मोठा व्यवसायही मिळवून दिला होता. पण आपणच एकमेव पुरवठादार आहोत, या गर्वातून या माणसाला पैशाचा लोभ सुटला. झटपट पैसा मिळवण्यासाठी त्याने बनावट क्रिस्टल्स बनवण्याचा कारखाना पंजाबमध्ये काढला आणि तो डुप्लिकेट माल दुसऱ्या नावाने जगभर विकायला लागला. पण त्याला व्यवसाय देणारी कंपनी बेसावध नव्हती. बाजारात नकली क्रिस्टल्सचा पुरवठा होत आहे, हे समजल्यावर त्यांनी सगळी पाळेमुळे खणून काढली. आपण ज्याच्यावर विश्वास ठेवला तोच पुरवठादार आपल्याला अंधारात ठेऊन हे उद्योग करत आहे, हे कळल्यावर कंपनीचा त्याच्यावरचा विश्वास उडाला. कंपनीने त्याच्यावर फसवणुकीचे एवढे खटले दाखल केले, की तो पुरता हैराण झाला. अखेर त्याला जाहीर माफी मागावी लागली आणि नुकसान भरपाईही द्यावी लागली, त्याने कंपनीचे कंत्राट गमावलेच, शिवाय ही बातमी समजताच व्यापारी वर्तुळात त्याचे नाव खराब झाले ते कायमचेच.  

मित्रांनो, संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून दिलेला इशारा ध्यानात ठेवण्यासारखा आहे

आमिषाचे आसा । गळ गिळी मासा ।

फुटोनिया घसा । मरण पावे ॥

 

(लेखक धनंजय दातार हे दुबईस्थित अदिल उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत)

 

Whats_app_banner