नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हरयाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीदरम्यान पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची अपेक्षा पुन्हा एकदा वाढली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर दोन ते तीन रुपयांनी कपात करण्याची संधी मिळाली आहे. कारण, अलीकडच्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने पेट्रोलियम कंपन्यांचा वाहन इंधनावरील नफा सुधारला आहे.
ब्लूमबर्ग एनर्जीनुसार, ब्रेंट क्रूडचा नोव्हेंबर फ्युचर्स ०.७७ टक्क्यांनी घसरून ७१.०५ डॉलर प्रति बॅरल झाला. तर, डब्ल्यूटीआय क्रूडदेखील 67.12 डॉलर प्रति बॅरलवर आले आहे. आज तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर अपडेट केले आहेत, पण त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल पोर्ट ब्लेअरमध्ये आहे. दिल्लीत आज पेट्रोल चा दर 101.84 रुपये प्रति लीटर तर डिझेलचा दर 89.07 रुपये प्रति लीटर आहे.
सप्टेंबरमध्ये कच्च्या तेलाचे दर सरासरी ७४ डॉलर प्रति बॅरल होते, तर मार्चमध्ये ते ८३ ते ८४ डॉलर प्रति बॅरल होते. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी कपात करण्यात आली होती.
कोरोनामुळे मार्च 2020 मध्ये किंमती 19.9 डॉलर या दोन दशकांतील नीचांकी पातळीवर घसरल्यानंतर किंमती झपाट्याने वाढल्या आहेत. मार्च 2022 मध्ये 2014 नंतर प्रथमच किंमती 100 डॉलरच्या पुढे गेल्या आणि जून 2022 मध्ये 116 डॉलर प्रति बॅरलच्या दशकातील उच्चांकी पातळीवर पोहोचल्या.
भारतात 2010 आणि 2014 मध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणमुक्त करण्यात आले होते. 2017 पर्यंत तेल विपणन कंपन्या दर 15 दिवसांनी किंमती बदलत होत्या, तेव्हापासून दररोज किंमती बदलल्या पाहिजेत, परंतु तसे झाले नाही.