World's Thinnest and Lightest Foldable Phone Launched: आयएफए बर्लिन येथे सुरू असलेल्या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स इव्हेंटमध्ये ऑनरने आपला लेटेस्ट फोल्डेबल फोन ऑनर मॅजिक व्ही ३ लॉन्च केला आहे. कंपनीचा दावा आहे की, हा जगातील सर्वात पातळ आणि हलका फोल्डेबल स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये अनेक उत्कृष्ट स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनची किंमत आणि त्यात मिळणाऱ्या फीचर्सबाबत जाणून घेऊयात.
सॅमसंगचा लोकप्रिय फोल्डेबल फोन गॅलेक्सी झेड फोल्ड ६ पेक्षा हा फोन पातळ आहे. गॅलेक्सी झेड फोल्ड ६ ची जाडी १२.१ मिमी आहे. परंतु, मॅजिक व्ही ३ ची जाडी फक्त ९.२ मिमी आहे, ऑनरचा हा फोन सॅमसंगपेक्षा सुमारे ३ मिमी पातळ आहे, जी फ्लॅगशिप फोनसाठी मोठी गोष्ट आहे. ऑनरच्या नव्या फोल्डेबल फोनचे वजनही केवळ २२६ ग्रॅम आहे.
ऑनर मॅजिक व्ही ३ मध्ये ६.४३ इंचाची कर्व्ड ओएलईडी एक्सटर्नल स्क्रीन आहे, जी फुल एचडी प्लस रिझोल्यूशन देते. फोनमध्ये ७.९२ इंचाचा प्रायमरी ओएलईडी डिस्प्ले पॅनेल आहे, जो २३४४×२१५६ पिक्सल रिझोल्यूशनला सपोर्ट करतो. दोन्ही डिस्प्लेमध्ये १२० हर्ट्झ एलटीपीओ रिफ्रेश रेट, डॉल्बी व्हिजन, एचडीआर व्हिव्हिड आणि स्टायलस सपोर्ट आहे. यात ५,००० नाइट्सची पीक ब्राइटनेस देखील देण्यात आली आहे.
ऑनर मॅजिक व्ही ३ क्वालकॉमच्या फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ चिपसेटसह सुसज्ज आहे. या प्रोसेसरमध्ये १६ जीबी रॅम आणि १ टीबीपर्यंत स्टोरेज देण्यात आला आहे.
ऑनर मॅजिक व्ही ३ मध्ये बॅटरीही दमदार आहे. फोनमध्ये 66 वॅट वायर्ड फास्ट चार्जिंग आणि ५० वॅट वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५१५० एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड १४ ओएसवर आधारित मॅजिकओएस ८ कस्टम स्किनवर चालतो. फोनमध्ये अनेक एआय फीचर्स, समांतर स्पेस आणि स्मार्ट प्रायव्हेट कॉल्स सारखे फीचर्स सपोर्ट केले आहेत.
फोटोग्राफीसाठी मॅजिक व्ही ३ मध्ये ऑनरची फाल्कन कॅमेरा सिस्टीम देण्यात आली आहे. यात ओआयएस (ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन) सह ५० मेगापिक्सलचा १/१.५६ इंचाचा मेन सेन्सर, ४० मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि १०० एक्स डिजिटल झूम आणि ओआयएस सपोर्टसह ५० मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी या फोनमध्ये २० मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
ऑनरने मॅजिक व्ही ३ ला रेडसर ब्राउन, ब्लॅक आणि ग्रीन असे तीन कलर ऑप्शन दिले आहेत. फोल्डेबल ची युरोपमध्ये किंमत १ हजार ९९९ युरो (सुमारे १.८६ लाख रुपये) आहे.