Hindustan Zinc Dividend news : सर्वाधिक लाभांश देण्याचा इतिहास असलेल्या हिंदुस्तान झिंक या वेदांता समूहातील कंपनीनं आपल्या लौकिकाला जागत नव्या आर्थिक वर्षात दुसऱ्यांदा लाभांश जाहीर केला आहे. कंपनीच्या संचालक मंडळानं एका शेअरमागे १९ रुपये लाभांश देण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळं गुंतवणूकदार सुखावले आहेत.
यापूर्वी कंपनीनं प्रति शेअर १० रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला होता. हिंदुस्तान झिंकनं बीएसईला या संदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार, संचालक मंडळानं २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी २ रुपये प्रति शेअर अंकित मूल्यावर ९.५० टक्के अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. लाभांशापोटी द्यावी लागणारी रक्कम ८,०२८.११ कोटी रुपये इतकी आहे.
लाभांशाच्या वृत्तामुळं आज हिंदुस्तान झिंकचा शेअर घेण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी कंपनीचा शेअर जवळपास ३ टक्क्यांनी वधारला आणि ५१३ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. २२ मे २०२४ रोजी शेअरचा भाव ८०७ रुपये होता ही ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळी होती. तर, शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर २८५ रुपये आहे. ही किंमत या वर्षी मार्चमध्ये होती.
हिंदुस्तान झिंकच्या शेअर्स विक्रीच्या ऑफरमधून सुमारे ३,२०० कोटी रुपये जमा झाले आहेत. वेदांता समूहातील कंपनी हिंदुस्तान झिंकच्या समभागांच्या विक्रीच्या ऑफरला किरकोळ आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या विक्रीतून वेदांताला सुमारे ३,२०० कोटी रुपये मिळतील, असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला आहे.
ओएफएस (Offer for sale)मधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वापर कंपनी आपला ताळेबंद संतुलित करण्यासाठी आणि विस्तार प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीसाठी करणार आहे. गेल्या महिन्यात पात्र संस्थात्मक वाटपातून ८,५०० कोटी रुपयांची भर पडल्यानं वेदांता समूह आणि हिंदुस्तान झिंक या दोन्ही कंपन्यांचे कर्ज कमी होण्यास मदत होणार आहे. किरकोळ गुंतवणुकदारांसाठी इश्यू साइज ५१.४४ लाख शेअर्सची होती, तर एकूण ९३.८२ लाख शेअर्स विक्रीसाठी काढण्यात आले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ४.६२ कोटी शेअर्स राखीव ठेवण्यात आले होते, तर एकूण संस्थात्मक खरेदी ६.३६ कोटी शेअर्स राखीव होते. १६ ते १९ ऑगस्ट दरम्यान चाललेल्या ओएफएस प्रक्रियेनंतर हिंदुस्तान झिंकमधील वेदांताचा हिस्सा ६३.४२ टक्क्यांवर आला आहे.