HUL Q3 Results : शॅम्पूपासून चहापर्यंत आणि टूथपेस्टपासून आईसक्रीमचे उत्पादन करणारी देशातील सर्वात मोठी एफएमसीजी कंपनी असलेल्या हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडने चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबरपर्यंतच्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्याचबरोबर कंपनीनं आपला आईस्क्रीम व्यवसाय मूळ व्यवसायापासून वेगळा केला असून या नव्या कंपनीचे बीएसई आणि एनएसईवर लिस्टिंग करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने आईस्क्रीम व्यवसायाची कंपनी वेगळी करण्यास मान्यता दिली आहे. नव्या कंपनीत विद्यमान भागधारकांना १:१ प्रमाणात शेअर मिळणार आहेत.
हिंदुस्थान युनिलिव्हरच्या शेअरहोल्डर्सना कंपनीतील प्रत्येक समभागासाठी आईस्क्रीमच्या नवीन कंपनीचा एक शेअर मोफत मिळणार आहे. क्वालिटी वॉल्स (इंडिया) लिमिटेड असे या नव्या कंपनीचे नाव असणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही कंपनी स्वतंत्र, सार्वजनिक सूचीबद्ध कंपनी म्हणून काम करेल. सप्टेंबर २०२४ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या एका स्वतंत्र समितीच्या शिफारशीनंतर कंपनीच्या संचालक मंडळाने आईसक्रीम उत्पादनासाठी नवी कंपनी करण्यासाठी मंजुरी दिली होती.
डिसेंबर तिमाहीत हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीचा निव्वळ नफा १९.१८ टक्के एवढा वाढला आहे. कंपनीचा नफा २९८९ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला २,५०८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न १६,०५० कोटी रुपये होते, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत १५,७८१ कोटी रुपये होते. डिसेंबर तिमाहीत एकूण खर्च वाढून १२,५७६ कोटी रुपये झाला आहे. हा खर्च मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत १२,३०५ कोटी रुपये होता.
हे वाचाः नफा वाढताच आयटी कंपनीची मोठी घोषणा
संबंधित बातम्या