Hindenburg on madhabi puri buch : अदानी समूहाशी मिलीभगत असल्याचे आरोप फेटाळणाऱ्या सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बूच यांच्यावर हिंडेनबर्ग रिसर्च फर्मनं पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. माधवी पुरी यांनी आमच्या आरोपांवर जी उत्तरं दिली आहेत, ती नवे प्रश्न निर्माण करणारी आहेत, असं हिंडेनबर्गनं म्हटलं आहे.
हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेनं मागील वर्षी अदानी समूहावर शेअरच्या किंमतींमध्ये फेरफार केल्याचा व गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. त्यामुळं उद्योग व राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. कालांतरानं शेअर बाजार नियंत्रक संस्था सेबीनं अदानी समूहाला क्लीन चिट दिली. मात्र, हिंडेनबर्गनं सेबीच्या प्रमुखच अदानी समूहाशी मिळाल्याचा आरोप करत या क्लीन चिटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
सेबी प्रमुख माधवी पुरी बूच आणि त्यांचे पती धवल पुरी बूच यांची अदानी समूहाच्या विदेशी फंडात गुंतवणूक असून त्याच माध्यमातून हा समूह हेराफेरी करतो, असा आरोप हिंडेनबर्गनं शनिवारी केला. माधवी पुरी बूच यांनी हे आरोप फेटाळले. 'गेल्या काही वर्षांत अदानी प्रकरणाशी संबंधित आवश्यक ते सर्व खुलासे सेबीला देण्यात आले आहेत. कोणतीही आर्थिक कागदपत्रं खुली करण्यास आमची हरकत नाही. हिंडेनबर्ग रिसर्चविरोधात सेबीने कारवाई केली आहे आणि कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, त्या हिंडेनबर्ग रिसर्चने उत्तर देण्याऐवजी चारित्र्यहननाचा प्रयत्न करणे हे दुर्दैवी आहे, असं त्या म्हणाल्या. त्यावरून पुन्हा एकदा हिंडेनबर्गनं त्यांना घेरलं आहे.
आरोप १ : सेबी प्रमुख अदानी समूहाशी मिळाल्या आहेत. त्यामुळंच अनेक पुरावे असूनही सेबीनं अदानी समूहावर थेट कारवाई केली नाही.
उत्तर : हिंडेनबर्गनं अदानी समूहावर केलेल्या आरोपांची योग्य ती चौकशी झाली आहे. त्यांच्या २६ पैकी २४ आरोपांची चौकशी पूर्ण झाली आहे. इतर चौकशी लवकरच पूर्ण होईल. माधवी पुरी बूच यांनी वेळोवेळी पुरेशी माहिती दिली आहे.
आरोप २ : सेबी प्रमुख आणि त्यांचे पती धवल बूच यांचा अदानी समूहातील विदेशी फंडांमध्ये हिस्सा आहे. हा निधी वेगवेगळ्या कारणांसाठी वापरला जातो. बूच आणि त्यांच्या पतीनं बर्म्युडा आणि मॉरिशसमधील परदेशी फंडांमध्ये अघोषित गुंतवणूक केली. गौतम अदानी यांचे मोठे बंधू विनोद अदानी यांचं त्यावर नियंत्रण होतं.
उत्तर : ही गुंतवणूक २०१५ मध्ये करण्यात आली होती. त्यावेळी आम्ही सिंगापूरमध्ये एक नागरिक म्हणून राहत होतो. पूर्णवेळ सदस्य म्हणून सेबीमध्ये रुजू होण्याच्या दोन वर्षांपूर्वी ही गुंतवणूक करण्यात आली होती. धवलचे बालपणीचे मित्र अनिल आहुजा यांच्या सल्ल्यानुसार बूच यांनी दोन फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला होता. आहुजा हे मॉरिशस स्थित आयपीई प्लस फंडाचे संस्थापक आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी असल्याचं हिंडनबर्गच्या अहवालात म्हटलं आहे.
आरोप ३ : धवल बूच हे अमेरिकन कंपनी ब्लॅकस्टोनमध्ये वरिष्ठ सल्लागार असताना सेबी प्रमुखांनी रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टच्या (REITS) नियमांमध्ये बदल केला होता. त्यांचा फायदा या कंपन्यांना झाला.
उत्तर : धवल बूच यांची नियुक्ती पुरवठा साखळी व्यवस्थापनातील कुशलता पाहून केली गेली होती. माधवी बूच सेबीच्या प्रमुख होण्याआधी ही नियुक्ती झाली होती. धवल बूच यांचा २०१९ पासून खासगी इक्विटी फर्मच्या रिअल इस्टेटशी संबंध नाही
आरोप ४: सिंगापूरची सल्लागार कंपनी अगोरा पार्टनर्सची ९९ टक्के मालकी माधवी बुच यांच्याकडं आहे. सेबी प्रमुख झाल्यानंतर त्यांनी आपला हिस्सा पतीकडे हस्तांतरित केला. या कंपनीला फायनान्शिअल स्टेटमेंट उघड करण्याचं कुठलंही बंधन नव्हतं. त्यामुळं या कंपनीकडून त्यांनी काय कमावलं याची माहिती नाही.
उत्तर : माधवी बूच यांनी सिंगापूरमध्ये राहत असताना दोन सल्लागार कंपन्यांची स्थापना केली. त्यापैकी एक भारतात तर दुसरी सिंगापूरमध्ये होती. माधवी यांची सेबीवर नियुक्ती झाल्यानंतर या दोन्ही कंपन्या निष्क्रिय झाल्या होत्या. त्यावेळी या दोन्ही कंपन्यांची आणि त्यांच्या हिस्सेदारीबाबतची सर्व माहिती सेबीला देण्यात आली होती.