Petrol Price in Iran : एका कप चहाच्या किमतीत चार लिटरपेक्षा जास्त पेट्रोल मिळालं तर? विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. आजच्या घडीला जगातील सर्वात स्वस्त पेट्रोलची किंमत २.५ रुपयांपेक्षा कमी आहे. भारतात एक कप चहाची किंमत साधारण १० रुपये आहे. याचाच अर्थ एक कप चहाच्या किंमतीत साधारण चार लिटर पेट्रोल.
होय. इराणमध्ये पेट्रोल एक कप चहापेक्षाही स्वस्त आहे. globalpetrolprices.com वर दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, इराणमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत भारतीय रुपयांमध्ये २.३७ रुपये आहे. सर्वात महाग पेट्रोल हाँगकाँगमध्ये आहे. इथं तुम्हाला एक लिटर पेट्रोलसाठी २५८.४८ रुपये मोजावे लागतात. तर, आपल्या देशात सर्वात महाग पेट्रोल राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये ११३.४४ रुपये प्रति लिटर आहे.
भारतात आज सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये ८४.१० रुपये आणि डिझेल ७९.७४ रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. तर, पाकिस्तानमध्ये एक लिटर पेट्रोलची सरासरी किंमत ८१.६६ रुपये (भारतीय चलनात) आहे.
सरकारी तेल कंपन्यांनी नेहमीप्रमाणे आज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. ६५१ व्या दिवशीही तेलाच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. दुसरीकडं, ब्लूमबर्ग एनर्जीवर दिलेल्या ताज्या अपडेटनुसार, ब्रेंट क्रूडची किंमत (एप्रिलचा वायदा) प्रति बॅरल ८१.४१ डॉलरपर्यंत खाली आली आहे. तर, WTI क्रूड प्रति बॅरल ७६.२८ डॉलरवर आहे.
भारताच्या शेजारी देशांमध्ये पेट्रोलचे दर वेगवेगळे आहेत. नेपाळमध्ये पेट्रोल आता १०७.४४ रुपये प्रति लिटर झालं आहे, तर भारतात सरासरी दर १०४.१८ रुपये आहे. श्रीलंकेतही पेट्रोलचा दर १२१.१७ रुपये प्रतिलिटर आहे. वरील सर्व किंमती भारतीय रुपयांतील आहेत.
अफगाणिस्तानमध्ये पेट्रोल ८५.७४ रुपये प्रति लिटर आहे. मालदीवमध्ये पेट्रोलचा दर ७७.१३ रुपये प्रति लिटर आहे. भूतानमध्ये ६७.५८ रुपये प्रति लिटर आणि बांगलादेशमध्ये ९४.४० रुपये प्रति लिटर आहे. चीनमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत ९६.८९ रुपये आहे. नेपाळमध्ये पेट्रोलची सरासरी किंमत आता भारतापेक्षा जास्त आहे.