Share Market Updates Today : लष्करी वापर होण्याची भीती व्यक्त करत चीननं चिप बनविण्याची सामुग्री अमेरिकेला निर्यात करण्यास बंदी घातली आहे. भारतीय शेअर बाजारातील काही कंपन्यांना या निर्णयाचा फायदा झाला आहे. HEG लिमिटेड ही याची सर्वात मोठी लाभार्थी ठरली आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये आज, ३ डिसेंबर रोजी १२ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.
सलग दुसऱ्या दिवशी कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. अशा प्रकारे दोन दिवसात कंपनीचे शेअर्स 30% वाढले. शेअरचा हा सहा वर्षांतील उच्चांक आहे. तसंच, आजच्या वाढीमुळं शेअरनं ५६९.७० रुपयांची पातळी गाठत ५२ आठवड्यांचा उच्चांक नोंदवला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीननं अमेरिकेला ग्रॅफाइट, गॅलियम, जर्मेनियम, अँटीमोनी आणि सुपरहार्ड सामग्री निर्यात करण्यास बंदी घातली आहे. याचा थेट फायदा भारतीय कंपन्यांना होणार आहे.
एचईजी हा दीर्घकाळापासून जगातील सर्वात मोठा सिंगल साइट ग्रेफाइट इलेक्ट्रोड प्लांट आहे. या प्लांटची क्षमता वर्षाला ८० हजार टन आहे. कंपनीनं अलीकडंच १ लाख टनपर्यंत विस्तार पूर्ण केला असून ही कंपनी ग्रॅफाइट इलेक्ट्रोड्सची तिसरी सर्वात मोठी उत्पादक बनली आहे. तब्बल २० वर्षांपेक्षा अधिक काळापासून जगातील ३५ देशांत कंपनीची ६५ ते ७० टक्के उत्पादनं तयार होतात.
कंपनीनं १८ ऑक्टोबर २०२४ रोजी स्टॉक स्प्लिटची घोषणा केली होती. १० रुपये दर्शनी मूल्य असलेला प्रत्येक इक्विटी शेअर प्रत्येकी २ रुपये दर्शनी मूल्याच्या ५ इक्विटी शेअर्समध्ये विभाजित करण्यात आला होता. म्हणजेच एक शेअर ५ भागांत विभागला गेला. तरलता वाढवण्याच्या उद्देशानं कंपनीनं शेअर विभाजनाचा निर्णय घेतला होता. याशिवाय कंपनीच्या इक्विटी शेअर्सची किंमत कमी असल्यानं किरकोळ गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी आहे.
संबंधित बातम्या