Stock Market Updates : देशातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी खासगी बँक असलेल्या अॅक्सिस बँकेत एचडीएफसी म्युच्युअल फंडानं आपला हिस्सा वाढवला आहे. फंडानं आपली गुंतवणूक ४.९७ टक्क्यांवरून ५ बेसिस पॉईंटनं वाढवून ५.०२ टक्के केली आहे. त्यामुळं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा उंचावल्या असल्या तरी बँकेचा शेअर मात्र आज घसरला आहे.
६ जानेवारी २०२५ पर्यंत अॅक्सिस बँकेत एचडीएफसी म्युच्युअल फंडाची एकूण हिस्सेदारी कंपनीच्या पेड-अप भागभांडवलाच्या ५.०२ टक्के होती.
अधिग्रहणापूर्वी एचडीएफसी म्युच्युअल फंडाकडं १५,३८,४५,७०५ समभाग होते, जे अॅक्सिस बँकेतील ४.९७ टक्के समभाग होते. अधिग्रहणानंतर एचडीएफसी म्युच्युअल फंडाकडे १५,५३,३५,०२१ शेअर्स म्हणजेच ५.०२ टक्के हिस्सा आहे.
बीएसईवरील शेअरहोल्डिंग पॅटर्नडेटानुसार, एचडीएफसीनं आपल्या विविध म्युच्युअल फंड योजनांद्वारे चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीअखेर अॅक्सिस बँकेत १३,०६,०५,०४५ शेअर्स किंवा ४.४२ टक्के हिस्सा ठेवला होता. म्हणजेच एचडीएफसीनं डिसेंबर तिमाहीत अॅक्सिस बँकेतील आपला हिस्सा लक्षणीय वाढवला. डिसेंबर तिमाहीतील शेअरहोल्डिंग पॅटर्नची आकडेवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
सप्टेंबर तिमाहीतील शेअरहोल्डिंग डेटा पॅटर्ननुसार, एचडीएफसीव्यतिरिक्त एसबीआय, निप्पॉन, कोटक, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल, यूटीआय आणि मिरे अॅसेटसह इतर अनेक टॉप फंड हाऊसेसची अॅक्सिस बँकेत हिस्सेदारी आहे. सप्टेंबर तिमाहीत म्युच्युअल फंडांकडं अॅक्सिस बँकेत ७५,५७,५४,४८२ शेअर्स म्हणजेच २५.६० टक्के हिस्सा होता.
अॅक्सिस बँकेच्या शेअर्सवर गेल्या वर्षभरापासून दबाव आहे. यापूर्वी त्यात ४ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. अॅक्सिस बँकेचा शेअर १९ एप्रिल रोजी ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर ९९५.९५ रुपये आणि गेल्या वर्षी १२ जुलै रोजी ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर १,३३९.५५ रुपयांवर पोहोचला होता. गेल्या तीन महिन्यांपासून मासिक आधारावर घसरण झाल्यानंतर जानेवारीत हा शेअर जवळपास अर्ध्या टक्क्यांनी वधारला. अॅक्सिस बँक डिसेंबर तिमाहीचे निकाल गुरुवार, १६ जानेवारी रोजी जाहीर करणार आहे.
संबंधित बातम्या