Stock Market News : तिसऱ्या तिमाहीचे अपेक्षेपेक्षा जास्त चांगले आल्यामुळं एचडीएफसी लाइफच्या शेअरनं आज मोठी उसळी घेतली. या शेअरचा भाव सकाळी साडेदहाच्या सुमारास १० टक्क्यांपेक्षाही जास्त वधारला आणि सहा आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर ६५९ रुपयांवर पोहोचला. यामुळं विश्लेषकांनी शेअरवरील खरेदीची शिफारस कायम ठेवली आहे.
बुधवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीनं डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. त्यानुसार, कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात १५ टक्क्यांनी वाढ झाली असून तो ४२१.३१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत तो ३६७.५४ कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचं प्रीमियममधून येणारं निव्वळ उत्पन्न १० टक्क्यांनी वाढून १६,८३२ कोटी रुपये झालं आहे. मागील वर्षाच्या याच तिमाहीत ते १५,२७३ कोटी रुपये होतं.
एचडीएफसी लाइफच्या वैयक्तिक वार्षिक प्रीमियम समतुल्य (एपीई) मध्ये विक्रमी २४ टक्के वाढ झाल्यामुळं करोत्तर नफा (PAT) मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. कंपनीच्या निव्वळ प्रीमियम उत्पन्नातही तिमाही-दर-तिमाही १३ टक्क्यांनी वाढ झाली असून, जुलै ते सप्टेंबर या कालावधीत १६,६१४ कोटी रुपये होतं.
विमा कंपनीची व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM) वर्षागणिक १८ टक्क्यांनी वाढून ३.३ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. स्थिरता गुणोत्तरात लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे. १३ व्या महिन्याचं स्थिरता गुणोत्तर ८७ टक्क्यांपर्यंत वाढलं असून ६१ व्या महिन्याचं प्रमाण ६१ टक्क्यांपर्यंत वाढलं आहे.
डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या अपेक्षेपेक्षा चांगल्या कामगिरीनंतर विश्लेषकांनी शेअरबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आहे. जागतिक ब्रोकरेज फर्म सीएलएसएनं एचडीएफसी लाइफवर 'आउटपरफॉर्म' कॉल कायम ठेवला, परंतु लक्ष्य किंमत कमी करून ६९० रुपये प्रति शेअर केली. आर्थिक कामगिरी चांगली असली तरी, सीएलएसएनं कमकुवत बाजार भावना आणि बँका मिक्स कॅपिंगविषयी तपशीलाच्या अभावामुळं चिंता व्यक्त केली आहे.
जागतिक ब्रोकरेज फर्म जेफरीजनं ७५० रुपये प्रति शेअरच्या टार्गेट प्राइससह खरेदीची शिफारस केली आहे. प्रीमियम वाढ जेमतेम असली तरी प्रॉडक्ट मिक्समुळं नवीन व्यवसायाचं मूल्य (VNB) वाढत असल्याचं ब्रोकरेजनं म्हटलं आहे.
इन्व्हेस्टेकनेही आपलं 'बाय' रेटिंग कायम ठेवलं असून प्रति शेअर ८५० रुपये हे टार्गेट प्राइस निश्चित केलं आहे. त्याचप्रमाणे एचएसबीसीनंही 'बाय' कॉल कायम ठेवला असून प्रति शेअर ७५० रुपये ही टार्गेट प्राइस दिली आहे. नवीन ग्राहक अधिग्रहण आणि वितरण वाहिन्यांच्या विस्तारावर लक्ष केंद्रित केल्यामुळं तिसऱ्या तिमाहीत अनुक्रमिक मार्जिन सुधारणा अपेक्षेपेक्षा जास्त होती.
मॅक्वेरीनं 'न्यूट्रल' भूमिका कायम ठेवत ५७० रुपये प्रति शेअरचं टार्गेट प्राइस ठेवलं आहे.
संबंधित बातम्या