HDFC bank SMS alert news : खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसीनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या ग्राहकांशी थेट संबंधित असा हा निर्णय आहे. या निर्णयानुसार एचडीएफसी बँक येत्या २५ जूनपासून १०० रुपयांपेक्षा कमी रकमेच्या UPI व्यवहारांसाठी एसएमएस अलर्ट बंद करणार आहे.
सरकारी असो वा खासगी, सर्वच बँका सध्या आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारच्या ऑनलाइन व मोबाइल बँकिंग सेवा देतात. ग्राहकानं केलेल्या प्रत्येक व्यवहाराचा एसएमएस अलर्ट आणि ई-मेल सूचना हा त्याचाच एक भाग आहे. एचडीएफसी ही बँकही त्यास अपवाद नाही. आतापर्यंत ही बँक १ रुपयांच्या व्यवहाराचाही अलर्ट पाठवत असे. त्यामुळं ग्राहकांना आपण केलेल्या व्यवहाराची माहिती तात्काळ मिळत असे. मात्र आता यात काही प्रमाणात बदल करण्याचा निर्णय बँकेनं घेतला आहे. आता १०० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांसाठी किंवा UPI द्वारे ५०० रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झाल्यासच ग्राहकांना एसएमएस मिळणार आहेत.
एसएमएस अलर्ट बंद होणार असले तरी ई-मेल अलर्ट सुरूच राहतील. सर्व प्रकारच्या व्यवहारांसाठी ईमेल अलर्ट पाठवले जातील, असंही बँकेनं स्पष्ट केलं आहे. यूपीआय पेमेंट अॅप देखील अलर्ट पाठवत असतात. त्यामुळं पुन्हा बँकेनं छोट्या रकमेच्या व्यवहाराचे अलर्ट पाठवण्याची गरज नाही, अशा प्रतिक्रिया ग्राहकांकडून आल्या होत्या. त्याचा विचार करून बँकेनं हा निर्णय घेतला आहे.
UPI व्यवहारांचे प्रमाण पाहता बँका दररोज सरासरी ४० कोटी एसएमएस पाठवतात. यासाठी त्यांना कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. बल्क एसएमएस पाठवण्याची खर्चही वाढतो.
HDFC बँकेनं आपल्या ग्राहकांना सर्व व्यवहारांच्या सूचना मिळवण्यासाठी त्यांचा प्राथमिक ईमेल पत्ता अपडेट ठेवण्याचा सल्ला दिला आहे. UPI व्यवहारांचं सरासरी मूल्य कमी होत आहे. लहान पेमेंटमध्ये वाढ झाली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या डेटानुसार, UPI व्यवहार १०० अब्जांचा टप्पा ओलांडतील आणि वर्षाच्या अखेरीस ११८ अब्जांपर्यंत पोहोचतील.
बँका देखील ५०० रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी UPI Lite ला प्रोत्साहन देत आहेत. या वैशिष्ट्यपूर्ण अॅपमध्ये एक लहान रक्कम बाजूला काढून ठेवता येते. या रकमेला सेकंड फॅक्टर ऑथेंटिकेशनची गरज लागत नाही. त्यामुळं पेमेंट झटपट करता येते.
संबंधित बातम्या