एचडीएफसी बँकेच्या शेअरनं गाठला आतापर्यंतचा उच्चांक; मार्केट कॅप १४ लाख कोटींच्या पार
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  एचडीएफसी बँकेच्या शेअरनं गाठला आतापर्यंतचा उच्चांक; मार्केट कॅप १४ लाख कोटींच्या पार

एचडीएफसी बँकेच्या शेअरनं गाठला आतापर्यंतचा उच्चांक; मार्केट कॅप १४ लाख कोटींच्या पार

Dec 03, 2024 03:15 PM IST

HDFC Bank Share Price : मागचे काही दिवस ठराविक पातळीवर रेंगाळणाऱ्या एचडीएफसी बँकेच्या शेअरनं आज नवा उच्चांक गाठला.

एचडीएफसी बँकेच्या शेअरची किंमत
एचडीएफसी बँकेच्या शेअरची किंमत

HDFC Bank Block Deal : मधल्या काळात फारशी हालचाल न करणाऱ्या एचडीएफसी बँकेच्या शेअर आता हलू लागला आज शेअरनं आतापर्यंतचा उच्चांक गाठला. शेअरचा भाव १८३७.४० रुपयांवर पोहोचला. मागील बंद किंमतीच्या तुलनेत हे प्रमाण १.८ टक्क्यांनी अधिक आहे. यामुळं एचडीएफसी बँकेचे मार्केट कॅप पुन्हा १४ लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. 

ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये आज २१.७ लाख शेअर्सची ब्लॉक डील झाली. या ब्लॉक डीलचा तपशील उपलब्ध नव्हता. यामुळं खरेदीदार आणि विक्रेते कोण हे समजू शकलं नाही. दुपारी तीनच्या सुमारास एचडीएफसीचा शेअर १.३० टक्क्यांनी वधारून १८२८.२५ रुपयांवर व्यवहार करत होता.

एचडीएफसी बँकेच्या १८०४.७० रुपयांच्या बंद किंमतीनुसार, ब्लॉक डीलचं एकूण मूल्य सुमारे ३९२ कोटी रुपये असेल. एचडीएफसी बँकेचं बाजार भांडवल २८ नोव्हेंबर रोजी १४.०१ लाख कोटी रुपयांवर पोहोचलं होतं, परंतु नंतर जोरदार नफावसुलीमुळं ते १४ लाख कोटी रुपयांच्या खाली घसरलं. आता पुन्हा ते १४ लाख कोटींच्या वर गेलं आहे.

एका महिन्यात ६ टक्क्यांनी वाढला शेअर

देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या शेअरची किंमत एका महिन्यात ६ टक्क्यांहून अधिक वाढली आहे. या बँकेच्या शेअरनं वार्षिक ७ टक्क्यांपेक्षा जास्त (YTD) आणि दरवर्षी सुमारे १३ टक्के परतावा दिला आहे.

एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये नुकतीच झालेली तेजीही नोव्हेंबरच्या अखेरीस लागू झालेल्या एमएससीआय रिबॅलन्सिंगमुळं झाली. एमएससीआय इमर्जिंग मार्केट्स इंडेक्समध्ये एचडीएफसी बँकेचं वेटेज ताज्या रिबॅलन्सिंगमध्ये वाढलं आहे. यामुळं निष्क्रिय आवक (Passive Inflow) सुमारे १.९ अब्ज डॉलरनं वाढली आहे.

एचडीएफसी बँकेची आर्थिक स्थिती कशी आहे?

एचडीएफसी बँकेनं सप्टेंबर २०२४ मध्ये संपलेल्या तिमाहीत एकल निव्वळ नफा ५.३ टक्क्यांनी वाढून १६,८२१ कोटी रुपये नोंदवला आहे. निव्वळ व्याज उत्पन्न (NII) वार्षिक आधारावर १० टक्क्यांनी वाढून २७,३९० कोटी रुपयांवरून ३०,११० कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. एचडीएफसी बँकेचा एकूण ताळेबंद ३४,१६,३०० कोटी रुपयांवरून ३६,८८,१०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

एचडीएफसी बँक टेक्निकल व्ह्यू

तांत्रिक आघाडीवर एचडीएफसी बँक तेजीच्या कप अँड हँडल पॅटर्नमधून बाहेर पडली. लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंट्स अँड सिक्युरिटीजचे रिसर्च हेड अंशुल जैन म्हणाले, 'एचडीएफसी बँकेनं आपल्या साप्ताहिक चार्टवर ७२ आठवड्यांच्या कप अँड हँडल फॉर्मेशनमधून उल्लेखनीय ब्रेकआऊट मिळवला आहे.

काय करावं?

शॉर्ट टर्म ट्रेडर्स एचडीएफसी बँकेचा शेअर १८२० रुपयांना खरेदी करू शकतात आणि स्टॉपलॉस १७७५ रुपयांवर ठेवू शकतात. तथापि, दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवल्यास अधिक फायदा होऊ शकतो.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.) 

Whats_app_banner