HDFC Q3 Results : एचडीएफसी बँकेचे तिमाही निकाल जाहीर; निव्वळ नफा १६७३५ कोटींवर, वाचा ८ ठळक मुद्दे
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  HDFC Q3 Results : एचडीएफसी बँकेचे तिमाही निकाल जाहीर; निव्वळ नफा १६७३५ कोटींवर, वाचा ८ ठळक मुद्दे

HDFC Q3 Results : एचडीएफसी बँकेचे तिमाही निकाल जाहीर; निव्वळ नफा १६७३५ कोटींवर, वाचा ८ ठळक मुद्दे

Jan 22, 2025 03:25 PM IST

HDFC Bank Q3 Net Profit : एचडीएफसी बँकेचे आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले असून बँकेचा निव्वळ नफा २.२ टक्क्यांनी वाढून १६७३५.५० कोटींवर गेला आहे.

एचडीएफसी बँकेचे तिमाही निकाल जाहीर; एनपीएनं वाढवली चिंता! वाचा ८ ठळक मुद्दे
एचडीएफसी बँकेचे तिमाही निकाल जाहीर; एनपीएनं वाढवली चिंता! वाचा ८ ठळक मुद्दे

HDFC Q3 NPA : खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठ्या एचडीएफसी बँकेचे तिमाही निकाल जाहीर झाले आहेत. अनुत्पादक मालमत्ता वाढीची (एनपीए) चिंता वगळता या निकालांनी गुंतवणूकदारांसह बाजारालाही खूश केलं आहे.

बँकेचा निव्वळ नफा चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत २.२ टक्क्यांनी वाढून १६७३५.५० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत हा नफ्याचा आकडा १६३७२.५४ कोटी रुपये होता. या तिमाहीत बँकेचं एकूण एकल उत्पन्न ८१,७१९.६५ कोटी रुपयांच्या तुलनेत ७ टक्क्यांनी वाढून ८७४६०.४४ कोटी रुपये झालं आहे.

> एचडीएफसी बँकेच्या तिमाहीतील निकालातील ठळक मुद्दे

महसूल आणि नफा : आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत बँकेचा निव्वळ महसूल ६.३ टक्क्यांनी वाढून ४२,११० कोटी रुपये झाला आहे. डिसेंबरच्या तिमाहीत करोत्तर नफ्यात (PAT) दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सकल एनपीए (Gross NPA) : एक्स्चेंज फाइलिंगनुसार, या तिमाहीत बँकेचा एकूण एनपीए ३६,०१८.५८ कोटी रुपये आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीतील ३१,०११.६७ कोटी रुपयांच्या तुलनेत तो १६.१५ टक्क्यांनी अधिक आहे. सकल कर्जाच्या तुलनेत सकल एनपीएची टक्केवारी गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीतील १.२६ टक्क्यांवरून १.४२ टक्क्यांवर गेली आहे.

निव्वळ एनपीए (Net NPA) : या तिमाहीत निव्वळ एनपीए ५१.२ टक्क्यांनी वाढून ११,५८७.५४ कोटी रुपये झाला. मागील वर्षी याच तिमाहीत तो ७६६४.१० कोटी रुपये होता. निव्वळ एनपीएची निव्वळ कर्जाच्या तुलनेत टक्केवारी ०.३१ टक्क्यांवरून ०.४६ टक्क्यांवर पोहोचली आहे.

एनआयआय (NII) : बँकेच्या एक्स्चेंज फाइलिंगनुसार, एचडीएफसी बँकेचं निव्वळ व्याज उत्पन्न (येणारे व्याज वजा द्यावे लागणारे व्याज) या तिमाहीत ७.७ टक्क्यांनी वाढून ३०,६५० कोटी रुपये झालं आहे. एकूण मालमत्तेवर कोअर नेट इंटरेस्ट मार्जिन (NIM) ३.४३ टक्के आणि व्याज देणाऱ्या मालमत्तेवर ते ३.६२ टक्के आहे.

ऑपरेटिंग खर्चात वाढ : बँकेचा परिचालन खर्च ७.२ टक्क्यांनी वाढून १७,११० कोटी रुपये झाला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत १५,९६० कोटी रुपये होता.

आर्थिक तरतुदीत घट : तिमाही तरतुदी आणि आकस्मिकता निधीवरील खर्च ४२२० कोटी रुपयांवरून ३,१५० कोटी रुपये झाला आहे.

ठेवी, कासा : आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत बँकेच्या सरासरी ठेवी वार्षिक १६ टक्क्यांनी वाढून २४,५२,८०० कोटी रुपये झाल्या, तर सरासरी CASA (चालू खाते आणि बचत खाते) ठेवी वार्षिक ६ टक्क्यांनी वाढून ८,१७,६०० कोटी रुपये झाल्या आहेत.

अ‍ॅडव्हान्स : या तिमाहीत बँकेची एकूण कर्जे वार्षिक ३ टक्क्यांनी वाढून २५,४२,६०० कोटी रुपये झाली आहेत. किरकोळ कर्जात १० टक्के, तर व्यावसायिक व ग्रामीण बँकिंग कर्जात ११.६ टक्के वाढ झाली आहे. कॉर्पोरेट आणि इतर घाऊक कर्जात मात्र १०.४ टक्क्यांनी घट झाल्याचं एचडीएफसी बँकेनं म्हटलं आहे. 

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner