IPO alert : आयपीओतील गुंतवणुकीच्या संधीच्या शोधात असलेल्यांसाठी मोठी बातमी आहे. देशातील सर्वात मोठी असलेल्या एचडीएफसी बँकेची उपकंपनी एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच लवकरच आयपीओ आणणार आहे. तब्बल १२,५०० कोटींच्या या आयपीओसाठी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (SEBI) प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
एचडीबी फायनान्शिअलच्या आयपीओ नवीन इश्यू आणि ऑफर फॉर सेल (OFS) या दोन्हींचे मिश्रण असेल. नवीन इश्यूचा भाग म्हणून कंपनी १० रुपयांच्या २,५०० कोटी रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या शेअरची ऑफर देणार आहे. तर, प्रवर्तक एचडीएफसी बँकेच्या उपकंपनीतील १०,००० कोटी रुपयांच्या इक्विटीची विक्री करणार आहेत. या आयपीओमध्ये २,५०० कोटी रुपयांचा नवा इश्यू असेल. प्रस्तावित आयपीओला सेबीची मंजुरी मिळाल्यानंतर आयपीओसाठी दरपट्टा निश्चित करण्यात येणार आहे.
प्रस्तावित आयपीओनंतर एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस बँकेची उपकंपनी म्हणून कायम राहणार आहे. एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये एचडीएफसी बँकेची ९४.६४ टक्के हिस्सेदारी आहे.
आयपीओसाठी जेएम फायनान्शियल लिमिटेड, बीएनपी परिबा, बोफा सिक्युरिटीज इंडिया लिमिटेड, गोल्डमन सॅक्स (इंडिया) सिक्युरिटीज, एचएसबीसी सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केट्स (इंडिया), आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड यांचा समावेश आहे. मॉर्गन स्टॅनली इंडिया, मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स लिमिटेड, नोमुरा फायनान्शियल अॅडव्हायझरी अँड सिक्युरिटीज (इंडिया) आणि नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड हे आयपीओसाठी लीड बुक रनिंग मॅनेजर आहेत.