HCL Q2 results : चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत झालेला अपेक्षेपेक्षा चांगला नफा आणि त्यानंतर केलेल्या लाभांशाच्या घोषणेनंतर एचसीएल टेक्नॉलॉजीचा शेअर वधारत आहे. मंगळवारी या शेअरनं ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक नोंदवला. एनएसईवर हा शेअर १८८२.७५ रुपयांवर पोहोचला.
एचसीएल टेक्नॉलॉजीजनं दुसऱ्या तिमाहीत ४,२३५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला. मागील तिमाहीतील ४,२५७ कोटी रुपयांच्या तुलनेत हा नफा ०.५ टक्के कमी आहे. तिमाही आधारावर कंपनीचा महसूल २.९ टक्क्यांनी वाढून २८,८६२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आयटी सर्व्हिसेस, ईआर अँड डी सर्व्हिसेस आणि प्रॉडक्ट्स अँड प्लॅटफॉर्म्स मध्ये अनुक्रमे १.८ %, १.१ % आणि १.४ % वाढ झाली आहे.
चांगल्या तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर कंपनीनं गुंतवणूकदारांना डिविडंड देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, प्रत्येक इक्विटी शेअरमागे १२ रुपये डिविडंड दिला जाणार आहे.
दुसऱ्या तिमाहीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर बहुतेक ब्रोकरेज कंपन्यांनी एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या शेअर्सची टार्गेट प्राइस वाढवली आहे.
नोमुरानं एचसीएल टेकच्या शेअरची किंमत आधीच्या १,९०० रुपयांवरून २००० रुपयांपर्यंत वाढविली. या शेअरला 'बाय' रेटिंग आहे.
एचसीएलनं सर्व प्रमुख निकषांवर अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी नोंदवली आहे, असं अँटिक स्टॉक ब्रोकिंगनं म्हटलं आहे. ही कंपनी वर्षाच्या उर्वरित महिन्यांतही चांगली वाढ देण्यास सक्षम आहे. ब्रोकरेजनं एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या शेअरवर 'बाय' रेटिंग कायम ठेवत टार्गेट प्राइस १८७५ रुपयांवरून २,००० रुपयांपर्यंत वाढवली आहे.
एचसीएल टेकचे शेअर्स लार्ज-कॅप आयटी स्पेसमध्ये आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी करणारा स्टॉक ठरला आहे. एचसीएल टेकच्या शेअरची किंमत एका वर्षात ४६ टक्क्यांनी वाढली आहे. तर, चालू कॅलेंडर वर्षात आतापर्यंत कंपनीच्या शेअरमध्ये एनएसईवर सुमारे २५ टक्के वाढ झाली आहे. तर मागील पाच वर्षांत कंपनीनं गुंतवणूकदारांना २३८.५५ टक्के परतावा दिल आहे.
संबंधित बातम्या