HCL Tech News Today : एचसीएल टेकच्या तिमाही निकालाचे नकारात्मक पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत. सेनेक्स किंचित सकारात्मक असताना आज सुरुवातीच्या व्यवहारात एचसीएलचा शेअर ९ टक्क्यांहून अधिक घसरून १८०४.१० रुपयांवर आला आहे.
एचसीएल टेकचा शेअर आज १९३६.१० रुपयांवर उघडला आणि १८०४.१० रुपयांच्या आजच्या नीचांकी पातळीवर घसरला. सकाळी १०.४० वाजता एचसीएल टेक ९.३१ टक्क्यांच्या घसरणीसह १८०४.१० रुपयांच्या आसपास व्यवहार करत होता. एचसीएल टेक्नॉलॉजीजनं चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल नुकतेच जाहीर केले. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या (ऑक्टोबर-डिसेंबर) तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा ५.५४ टक्क्यांनी वाढून ४,५९१ कोटी रुपये झाला आहे.
एचसीएल टेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सी. विजयकुमार यांनी सध्याच्या मागणी आणि खर्चानुसार महसूल वाढीचा अंदाज वाढविला आहे. कंपनीनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी २०२३-२४ च्या याच तिमाहीत कंपनीला ४,३५० कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.
एचसीएल टेकनं विकासदराचा अंदाज ३.५-५ टक्क्यांवरून ४.५ ते ५ टक्क्यांवर नेला. डिसेंबर २०२४ मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीचा कामकाजातून मिळणारा महसूल ५.०७ टक्क्यांनी वाढून २९,८९० कोटी रुपये झाला आहे. क्रमिक आधारावर नफ्यात ८.४ टक्के आणि महसुलात ३.५६ टक्के वाढ झाली आहे.
ही वाढ सर्व व्यवसाय विभागांच्या चांगल्या कामगिरीचा परिणाम आहे, असं कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ सी. विजयकुमार यांनी म्हटलं आहे. त्यांनी तिमाही निकालावर समाधान व्यक्त केलं आहे.
अमेरिकेच्या नव्या नेतृत्वाच्या धोरणांचा कंपनीच्या व्यवसायावर परिणाम होईल का, असं विचारलं असता एचसीएलचे चीफ ऑफ पब्लिक ऑफिसर (CPO) रामचंद्रन सुंदरराजन यांनी नकारार्थी उत्तर दिलं. एच १ बी व्हिसावर कंपनी फारच कमी अवलंबून असल्यानं कंपनीवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. अमेरिकेतील ८० टक्के लोक स्थानिक आहेत. त्यामुळं एच १ बी वरील आपलं अवलंबित्व खूपच कमी आहे, असं ते म्हणाले.
'एचसीएल टेकनं गेल्या तिमाहीत २,१३४ कर्मचाऱ्यांची भरती केली. त्यामुळं एकूण कर्मचाऱ्यांची संख्या २ लाख २० हजार ७५५ झाली आहे. मार्च तिमाहीत आणखी एक हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या तुलनेत २०२५-२६ मध्ये कंपनीला अधिक लोकांना नियुक्त करण्याची अपेक्षा आहे, असंही त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या