HCL Dividend : तिमाही निकाल येताच एचसीएल टेकनं केली मोठी घोषणा, गुंतवणूकदारांना डबल डिविडंड देणार
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  HCL Dividend : तिमाही निकाल येताच एचसीएल टेकनं केली मोठी घोषणा, गुंतवणूकदारांना डबल डिविडंड देणार

HCL Dividend : तिमाही निकाल येताच एचसीएल टेकनं केली मोठी घोषणा, गुंतवणूकदारांना डबल डिविडंड देणार

Jan 13, 2025 06:14 PM IST

HCL Tech Q3 Results News : भारतातील तिसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीचे तिमाही निकाल जाहीर झाले असून कंपनीनं डिविडंडची घोषणा केली आहे.

HCL Dividend : नफ्यामध्ये २४० कोटींची वाढ! एचसीएल टेकनं केली डिविडंडची घोषणा
HCL Dividend : नफ्यामध्ये २४० कोटींची वाढ! एचसीएल टेकनं केली डिविडंडची घोषणा

HCL Tech Dividend News : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) या आघाडीच्या आयटी कंपनीनंतर आता एचसीएल टेक्नॉलॉजीसचे तिमाही निकाल जाहीर झाले आहेत. तिमाही निकाल जाहीर होताच कंपनीनं टीसीएसच्या पावलावर पाऊल ठेवत गुंतवणूकदारांना डबल डिविडंडची भेट दिली आहे.

एचसीएल टेक्नॉलॉजीजनं आर्थिक वर्ष २०२४-२५ (आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाही) साठी ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीचे निकाल सोमवारी, १३ जानेवारी रोजी जाहीर केले. निकालानुसार, कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा ५.५ टक्क्यांनी वाढून ४,५९१ कोटी रुपये झाला आहे.

देशातील तिसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी असलेल्या एचसीएलचं कामकाजातून मिळणारं उत्पन्न पाच टक्क्यांनी वाढून २९,८९० कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ते २८,४४६ कोटी रुपये होतं.

किती मिळणार लाभांश?

कंपनीच्या संचालक मंडळानं आर्थिक वर्ष २०२५ साठी कंपनीच्या प्रत्येकी २ रुपये अंकित मूल्य असलेल्या शेअरमागे १८ रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. यात कंपनीच्या पब्लिक लिस्टिंगला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त प्रति शेअर ६ रुपये विशेष लाभांशाचा समावेश आहे. याचाच अर्थ अंतरिम लाभांश १२ रुपये आहे.

डिविडंडसाठी रेकॉर्ड डेट काय?

एचसीएल टेकनं स्टॉक एक्स्चेंजला या संदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार, अंतरिम लाभांश देण्याची रेकॉर्ड डेट १७ जानेवारी २०२५ ही निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच या तारखेला कंपनीच्या रेकॉर्डमध्ये जे भागधारक असतील, त्यांना डिविडंडचा लाभ मिळेल. तर, अंतरिम लाभांश प्रत्यक्ष खात्यात जमा होण्याची तारीख २४ जानेवारी २०२५ ही असेल.

काय म्हणाले कंपनीचे सीईओ?

तिमाही निकालाबाबत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ सी. विजयकुमार यांनी आनंद व्यक्त केला. 'ही वाढ व्यवसाय विविध विभागातील कामगिरीवर आधारीत आहे. आमच्या डिजिटल आणि एआय तंत्रज्ञानाच्या सेवेवर ग्राहकांनी विश्वास व्यक्त केल्याचं हे द्योतक आहे, असं विजयकुमार म्हणाले. आमच्याकडं येणाऱ्या विविध प्रस्तावांमध्ये एआय आधारित सेवेला अधिक मागणी आहे. त्या दृष्टीन कंपनीला अधिक एआय सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं विजयकुमार म्हणाले.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner