HCL Tech Dividend : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा पहिल्या तिमाहीचा निकाल शुक्रवार, १२ जुलै रोजी जाहीर झाला. अपेक्षेपेक्षा चांगले निकाल आल्याच्या पार्श्वभूमीवर एचसीएलनं गुंतवणूकदारांना लाभांशाच्या रूपात गिफ्ट दिलं आहे.
कंपनीच्या संचालक मंडळानं एका शेअरमागे १२ रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. लाभांशासाठी पात्रतेची तारीख २३ जुलै २०२४ निश्चित केली आहे. या लाभांशापोटी देय असलेली रक्कम १ ऑगस्ट २०२४ पर्यंत शेअरहोल्डर्सच्या खात्यात जमा होणार आहे.
कंपनीने आर्थिक वर्ष २०२५ साठी ३ ते ५ टक्के महसूल वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. कंपनीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, वार्षिक आधारावर सेवा महसुलात देखील ३ ते ३ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. ईबीआयटी मार्जिन १८ ते १९ टक्क्यांच्या दरम्यान असण्याची अपेक्षा आहे.
जूनमध्ये संपलेल्या पहिल्या तिमाहीत एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा एकत्रित निव्वळ नफा २०.५ टक्क्यांनी वाढून ४,२५७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ३,५३४ कोटी रुपयांचा नफा झाला होता. त्याचबरोबर, एकत्रित निव्वळ नफा ६.८ टक्क्यांनी वाढला.
जून मध्ये संपलेल्या तिमाहीत एचसीएलला एकत्रित महसूल २८,०५७ कोटी रुपये मिळाला आहे. आर्थिक वर्ष २०२४ च्या पहिल्या तिमाहीत हा आकडा २६,२९६ कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष २०२४ च्या चौथ्या तिमाहीतील २८,४९९ कोटी रुपयांच्या तुलनेत ही वाढ १.६ टक्क्यांनी कमी आहे. जूनअखेर संपलेल्या तिमाहीत कंपनीचं एकत्रित एकूण उत्पन्न ९.५ टक्क्यांनी घसरून २९,१६० कोटी रुपयांवर आलं आहे.
एचसीएल टेकचे मुख्य वित्तीय अधिकारी प्रतीक अग्रवाल यांनी प्रसिद्धीपत्रकात आपली भूमिका मांडली आहे. 'आम्ही आमची भांडवली कार्यक्षमता सुधारण्यासाठी कटिबद्ध आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे.
मागील महिनाभरापासून एचसीएलचा शेअर क्रमाक्रमानं वधारत आहे. या कालावधीत शेअरमध्ये तब्बल ८ टक्क्यांहून जास्त वाढ झाली आहे. काल, आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही कंपनीच्या शेअरमध्ये तेजी होती. काल एचसीएलचा शेअर ३ टक्क्यांपेक्षा जास्त वाढला. सध्या हा शेअर एनएसईवर १५६१.७५ रुपयांवर ट्रेड करत आहे.
संबंधित बातम्या