Dream 11 अ‍ॅपचा मालक हर्ष जैनने मुंबईत खरेदी केला १३८ कोटी रुपयांचा फ्लॅट ! जाणून घ्या असं काय आहे खास?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Dream 11 अ‍ॅपचा मालक हर्ष जैनने मुंबईत खरेदी केला १३८ कोटी रुपयांचा फ्लॅट ! जाणून घ्या असं काय आहे खास?

Dream 11 अ‍ॅपचा मालक हर्ष जैनने मुंबईत खरेदी केला १३८ कोटी रुपयांचा फ्लॅट ! जाणून घ्या असं काय आहे खास?

Jan 16, 2025 02:09 PM IST

Dream 11 या गेमिंग अ‍ॅपचा मालक हर्ष जैन याने मुंबईत तब्बल १३८ कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला आहे. या फ्लॅटमध्ये असं काय खास आहे ते जाणून घेऊ या.

Dream 11 अ‍ॅपचा मालक हर्ष जैनने मुंबईत खरेदी केला १३८ कोटी रुपयांचा फ्लॅट (Picture for representational purposes only)
Dream 11 अ‍ॅपचा मालक हर्ष जैनने मुंबईत खरेदी केला १३८ कोटी रुपयांचा फ्लॅट (Picture for representational purposes only) (Mehul R Thakkar/HT)

Dream 11 ही ऑनलाइन गेमिंग अ‍ॅप कंपनी सध्या चांगलीच चर्चेत आहे. कोट्यवधी यूजर्स या अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्या आवडत्या क्रिकेट टीमसोबत व्हर्चुअल क्रिकेट खेळत असतात. या कंपनीच्या लोकप्रियतेमुळे डिजिटल कंपनीचे संस्थापक मालामाल झाले आहेत. या कंपनीचा सीईओ आणि सह-संस्थापक असलेल्या हर्ष आनंद जैन याने मुंबईत नुकताच एक आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर भागात असलेल्या या फ्लॅटची किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. या फ्लॅटची किंमत तब्बल १३८ कोटी रुपये एवढी आहे. इंडेक्शटॅप डॉट कॉम या वेबसाइटने या डिलचा तपशील दिला आहे. 

या फ्लॅटचे एकूण क्षेत्रफळ ९,५४६ चौरस फूट एवढे आहे. हा फ्लॅट ‘लोढा मलबार’ नावाच्या लक्झरी प्रकल्पात खरेदी करण्यात आला आहे. मुंबईतील प्रसिद्ध रिअल इस्टेट डेव्हलपर मॅक्रोटेक डेव्हलपर्सद्वारे मलबार हिल परिसरात हा प्रकल्प उभारला जात आहे. ९ जानेवारी २०२५ रोजी या फ्लॅटचे रजेस्ट्रेशन झाले असून ८ कोटी ३० लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क भरण्यात आल्याचे मालमत्तेच्या कागदपत्रांवरून स्पष्ट होते. या फ्लॅटमध्ये जैन यांना सहा कार पार्किंग मिळणार आहे. हा फ्लॅट १ लाख ४५ हजार रुपये प्रति चौरस फूट दराने जैन यांनी खरेदी केला असल्याचे रजिसट्रेशनच्या कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे. ड्रीम ११ चे हर्ष जैन यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. ड्रीम ११ ची स्थापना २००८ मध्ये हर्ष जैन आणि भावित शेठ यांनी केली होती.

लोढा मलबार मध्ये आहेत देशातले सर्वाधिक लक्झरी फ्लॅट

मार्च २०२३ मध्ये बजाज ऑटोचे चेअरमन नीरज बजाज यांनी याच प्रकल्पात मॅक्रोटेक डेव्हलपर्सकडून २५२.५ कोटी रुपयांना सी-फेसिंग ट्रिपलएक्स फ्लॅट खरेदी केल्यानंतर 'लोढा मलबार' प्रकल्प चर्चेत आला होता. याच महिन्यात फॅमी केअर कंपनीचे संस्थापक, उद्योगपती जे. पी. तापरिया यांच्या कुटुंबीयांनी याच प्रकल्पात सुमारे ३६९ कोटी रुपयांच्या सहा सी-फेसिंग मालमत्ता फ्लॅट खरेदी केले होते. 

पॉलिस्टर लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल गुप्ता यांनी एप्रिल २०२४ मध्ये लोढा मलबारमध्ये २७० कोटी रुपयांना दोन फ्लॅट खरेदी केले होते. लोढा मलबार प्रकल्पात एकूण ३१ मजले असून देशातील सर्वात महागड्या समजल्या जाणाऱ्या मलबार हिल परिसरातील वाळकेश्वर रोडवर या प्रकल्पाचे बांधकाम केले जात आहे. मलबार हिल परिसरात जागेचा दर दीड लाख प्रती चौरस फूट असून सामान्यत: गर्भश्रीमंत असलेले विविध कंपन्यांचे सीईओ, बिझनेस टायकून या परिसरात घर खरेदी करतात. 

Whats_app_banner