IPO Listing News Today : हॅम्प्स बायो लिमिटेड या छोट्या कंपनीच्या शेअरनं बाजारात दणदणीत सलामी दिली आहे. पहिल्याच दिवशी कंपनीचा शेअर ९० टक्क्यांच्या तेजीसह ९६.९० रुपयांवर लिस्ट झाला आहे. त्यामुळं गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.
हॅम्प्स बायो ही कंपनी टॅब्लेट, सिरप, कॅप्सूल, इंजेक्टेबल्स, तेल आणि पौष्टिक पूरक आहाराच्या मार्केटिंग आणि वितरण व्यवसायात गुंतलेली आहे. कंपनीचा आयपीओ १३ डिसेंबर २०२४ रोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला आणि १७ डिसेंबरपर्यंत खुला राहिला. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत ५१ रुपये होती.
हॅम्प्स बायो लिमिटेडचे शेअर ९० टक्के प्रीमियमवर सूचीबद्ध झाल्यानंतर लगेचच अप्पर सर्किट लागलं आहे. कंपनीचा शेअर ५ टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह १०१.७४ रुपयांवर पोहोचला आहे. आयपीओतील ५१ रुपयांच्या इश्यू प्राइसच्या तुलनेत शेअरनं जवळपास १०० टक्के उसळी घेतली आहे. कंपनीचं मार्केट कॅप ४४ कोटी रुपयांच्या पुढं गेलं आहे. आयपीओ येण्याआधी कंपनीत प्रवर्तकांचा हिस्सा १०० टक्के होता तो आता ७१.९९ टक्क्यांवर आला आहे.
हॅम्प्स बायोचा आयपीओ १०५७ पट सब्सक्राइब झाला होता. रिटेल इन्व्हेस्टर्स कॅटेगरीचा कंपनीच्या आयपीओमध्ये १३४२.०४ पट हिस्सा होता. तर नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (NII) श्रेणीत हा आयपीओ ७५८.२७ पट सब्सक्राइब झाला. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना केवळ एका लॉटसाठी बोली लावता येणार होती. आयपीओच्या एका लॉटमध्ये २००० शेअर्स होते. म्हणजेच रिटेल गुंतवणूकदारांना कंपनीच्या आयपीओमध्ये १,०२,००० रुपयांची गुंतवणूक करावी लागली. कंपनीचा एकूण इश्यू साइज ६.२२ कोटी रुपयांपर्यंत होता.
आयपीओमधून मिळणाऱ्या रकमेचा वापर हॅम्प्स बायो लिमिटेडच्या एफएमसीजी विभागासाठी प्लांट आणि मशिनरी खरेदी करण्यासाठी, ब्रँडिंग करण्यासाठी, जागरुकता वाढविण्यासाठी आणि इतर व्यावसायिक हेतूसाठी केला जाणार आहे.
३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, हॅम्प्स बायो लिमिटेड ही कंपनी १८० हून अधिक उत्पादनांचा पुरवठा करते. कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या ७८ आहे.
संबंधित बातम्या