Business Ideas : उद्योग-व्यापारात ‘अर्धवट ज्ञानी म्हणजे दु:खाचा धनी’…
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Business Ideas : उद्योग-व्यापारात ‘अर्धवट ज्ञानी म्हणजे दु:खाचा धनी’…

Business Ideas : उद्योग-व्यापारात ‘अर्धवट ज्ञानी म्हणजे दु:खाचा धनी’…

Jan 30, 2025 06:59 PM IST

केवळ निरीक्षणाने, दुसऱ्याचे अनुकरण करुन किंवा नक्कल करुन माणूस यशस्वी होत नाही. एखाद्या क्षेत्रात उतरायचे झाल्यास आपल्याला त्याबद्दल बारकाईने माहिती असावी लागते किंवा गाठीला काही अनुभव तरी लागतो.

उद्योग-व्यापारात अर्धवट ज्ञान धोक्याचे असते
उद्योग-व्यापारात अर्धवट ज्ञान धोक्याचे असते

 

धनंजय दातार

आमच्या कंपनीत आंध्र प्रदेशातून एक मुलगा हेल्पर म्हणून जॉईन झाला होता. प्रत्येक व्यक्तीत काही ना काही हुनर असते आणि त्याचे प्रदर्शन करुन शेजारी-पाजारी अथवा ऑफिसमध्ये छाप पाडण्याचे प्रयत्न अगदी स्वाभाविक असतात. हा मुलगाही त्याला अपवाद नव्हता. तो काम चांगले करायचा, त्याबरोबरच इतरांच्या उपयोगीही पडायचा. सहकारी कर्मचाऱ्यांपैकी कुणाला बरे नसेल तर हा जवळच्या पिशवीतून त्यांना औषधे द्यायचा. हळूहळू त्याची प्रसिद्धी वाढू लागली. कामगारांपैकी अनेकजण आजारी पडल्यास डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा या मुलाकडून औषधे घेऊ लागले. औषधांबाबत त्याचा हातगुण असल्याची चर्चा कानोकानी होऊ लागली. एक दिवस आमच्या मॅनेजरनीही या मुलाच्या निदान करण्याच्या आणि उपचारांच्या कौशल्याबद्दल मला सांगितले. त्यांची अपेक्षा होती, की या माहितीमुळे मी खूश होईन.

हा मुलगा औषधांबरोबर इंजेक्शन्सही देतो, हे कळल्यावर मला त्याचे कौतुक वाटण्यापेक्षा धक्काच बसला. मी तातडीने त्याची पिशवी आणि खोलीवरचे सामान तपासण्याच्या सूचना स्टाफला दिल्या. तलाशीत त्याच्याकडे अनेक डॉक्टरी उपकरणे आणि इंजेक्शनच्या सीरिंज मिळाल्या. मी त्याला बोलवून हा काय प्रकार आहे, असे विचारले. त्यावर त्याने अभिमानाने सांगितले, की ‘सर! येथे येण्यापूर्वी मी आमच्या गावातील डॉक्टरांकडे कंपाऊंडर म्हणून काम करत होतो. शाळकरी वयापासूनच मला डॉक्टरी व्यवसायाचे आकर्षण होते. त्या डॉक्टर साहेबांचे काम बघून बघून मी उपचारांबाबत खूप शिकलो. लक्षणे ओळखून रोगांचे निदान करणे, इंजेक्शन्स देणे, मलमपट्टी करणे, औषधांच्या पुड्या तयार करणे, लहान शस्त्रक्रियांच्या वेळी सहाय्यक म्हणून मदत करणे, अशी कामे मी करु लागलो. त्यामुळे मला छोट्या-मोठ्या रोगांवरची औषधे आणि उपचारांची माहिती झाली आहे. आता त्याचाच फायदा मी अल्प मोबदल्यात इतरांना करुन देतो.’

यावर मी त्याला अगदी शांत आणि ठाम शब्दांत सांगितले, ‘मित्रा! तू या क्षणापासून हा उद्योग बंद कर. तू धोक्याच्या उंबरठ्यावर उभा आहेस. सुदैवाने अजून काही विपरीत घडलेले नाही, पण तुझ्या औषधोपचारामुळे एखाद्या आजारी माणसाबाबत काही दुर्घटना घडली तर तुझे आयुष्य उद्ध्वस्त होईल. एक तर तुझ्याकडे डॉक्टरची अधिकृत पदवी व परवाना नाही. तू डॉक्टरी विद्या ही वैद्यकीय महाविद्यालयातून प्रमाणपत्रासह प्राप्त केलेली नाहीस. अनेक लोक केमिस्टला आजाराची लक्षणे सांगून औषधे मागतात पण तेही चुकीचे असते. तू तर केमिस्टही नाहीस. केवळ निरीक्षणाच्या जोरावर मिळवलेल्या अल्पशा ज्ञानाने डॉक्टर बनता येत नाही. त्यासाठी कष्टाने शिक्षण घ्यावे लागते. डॉक्टरला शरीररचनेचे आणि औषधशास्त्राचे बारकाईने ज्ञान असावे लागते. ताप आला, की पिवळी गोळी आणि पोट बिघडले, की काळी गोळी, इतके हे सोपे नसते. प्रकृतीनुसार रुग्णाची लक्षणे बदलत असतात. लक्षात ठेव. अर्धवट ज्ञानाच्या जोरावर केलेल्या उपचाराने एखाद्याचा जीवसुद्धा जाऊ शकतो. एखाद्याने खटला भरला आणि कायद्याच्या कचाट्यात सापडलास तर कडक शिक्षेला पात्र ठरशील.’ मी नंतर लेखी आदेश काढून त्याच्याकडून उपचार घेण्यास आमच्या कर्मचाऱ्यांना मनाई केली.

केवळ निरीक्षण, दुसऱ्याचे अनुकरण किंवा नक्कल करुन माणूस यशस्वी होत नाही. व्यवसायातही हेच तत्त्व लागू पडते. माझ्या कंपनीत एक माणूस बरेच वर्षे काम करत होता. हळूहळू त्याला वाटू लागले, की आपणही असाच व्यवसाय करावा. त्याने नोकरी सोडून मसाल्यांच्या व्यवसायात उडी घेतली, पण तो लवकरच अयशस्वी झाला. त्याचे कारण म्हणजे कोणत्याही व्यवसायाची परिपूर्ण माहिती घेऊन मगच त्यात पाऊल टाकावे, हा साधा नियम तो विसरला. त्याला कच्च्या मालाची खरेदी, उत्पादनांची शुद्धता जपणे, वितरणाचे जाळे उभारणे यातील काहीच माहिती नव्हती. मग त्याने आमच्या उत्पादनांची नक्कल करण्याचा मार्ग अनुसरला, पण तेथेही तो तोंडघशी पडला. ग्राहकांना अस्सल आणि नक्कल यातील फरक कळत असल्याने त्याचे मसाले विकले जाईनात. अखेर त्याने व्यवसायातून गाशा गुंडाळला. या उदाहरणातून दिसून येते, की अनुभवाबरोबरच ज्ञानही महत्त्वाचे असते.

आपण महाभारतात अभिमन्यूची कथा वाचली असेल. त्याला चक्रव्यूहात कसे घुसायचे इतकेच ठाऊक होते, पण सुखरूप बाहेर पडण्याची युक्ती ठाऊक नव्हती. अत्यंत शूर योद्धा असूनही अर्धवट ज्ञानामुळे त्याचे मरण ओढवले. अर्धवट ज्ञान हे अज्ञानापेक्षाही अधिक घातक असते.

एक छान सुविचार नेहमी लक्षात ठेवण्यासारखा आहे

‘अर्धवट ज्ञानी म्हणजे दु:खाचा धनी’

(लेखक धनंजय दातार हे दुबईस्थित अदिल उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत)

Whats_app_banner