Share Market News in Marathi : गुजरात टूलरूम लिमिटेडच्या शेअरनं सध्या बाजारात मोठी हवा केली आहे. कंपनीनं ५:१ या प्रमाणात बोनस देण्याचे संकेत दिले आहेत. ही बातमी पसरल्यामुळं गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावला असून सलग दुसऱ्या दिवशी शेअरला ५ टक्क्यांचं अप्पर सर्किट लागलं आहे.
गुजरात टूलरूमचा शेअर गुरुवारी बीएसईवर ५ टक्क्यांनी वधारून १८.०८ रुपयांवर पोहोचला. बुधवारी देखील कंपनीच्या शेअरमध्येही ५ टक्क्यांची वाढ झाली. कंपनी आपल्या भागधारकांना एक शेअरच्या बदल्यात ५ शेअर मोफत देण्याचा विचार करत आहे. कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ४५.९७ रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १०.७५ रुपये आहे.
गुजरात टूलरूम लिमिटेड (Gujarat Toolroom Ltd) कंपनीच्या संचालक मंडळाची सोमवारी, ६ जानेवारी २०२५ रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत ५:१ या प्रमाणात बोनस समभाग देण्याच्या प्रस्तावावर विचार करून त्याला मंजुरी देण्यात येणार आहे. कंपनीनं बोनस शेअरची रेकॉर्ड डेट अद्याप जाहीर केलेली नाही.
गुजरात टूलरूमनं कंपनीनं मार्च २०२३ मध्ये आपल्या शेअर्सचं विभाजन केलं होतं. कंपनीनं १० रुपयांच्या अंकित मूल्याच्या शेअरची प्रत्येकी १ रुपयांच्या अंकित मूल्याच्या १० शेअर्समध्ये विभागणी केली होती.
गुजरात टूलरूमच्या शेअरमध्ये गेल्या ५ वर्षात ४६५७ टक्के वाढ झाली आहे. गेल्या ३ वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये १४८५ टक्के वाढ झाली आहे. गेल्या महिन्याभरात गुजरात टूलरूमच्या शेअरमध्ये जवळपास ३५ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या तीन महिन्यांत कंपनीच्या शेअरमध्ये जवळपास ५२ टक्क्यांची वाढ झाली आहे. एका आठवड्यात कंपनीच्या शेअर्समध्ये २७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मात्र, गेल्या वर्षभरात गुजरात टूलरूमचे शेअर्स ५२ टक्क्यांनी घसरले आहेत.
संबंधित बातम्या