share market news today : गुजरात स्टेट पेट्रोलियम कॉर्पोरेशन (GSPC) आणि गुजरात स्टेट पेट्रोनेट लिमिटेड (GSPL) कंपन्यांनी गुजरात गॅस (gujarat gas) मध्ये विलीन होण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर गुजरात गॅस कंपनीच्या शेअरचे भाव रॉकेटच्या वेगानं वाढले आहेत. जीएसपीएल कंपनीलाही याचा मोठा फायदा झाला आहे.
जीएसपीसी आणि जीएसपीएल यांच्या गुजरात गॅसमधील विलिनीकरणानंतर जीएसपीएल ट्रान्समिशन लिमिटेड (GTL) नावाची नवीन पारेषण आणि वितरण कंपनी अस्तित्वात येणार आहे. या कंपनीचे कालांतरानं विघटन करून ती शेअर बाजारात सूचीबद्ध करण्याची योजना आहे. या योजनेअंतर्गत जीएसपीसीच्या भागधारकांना प्रत्येक ३०५ शेअरमागे गुजरात गॅसचे १० शेअर मिळणार आहेत. तर, जीएसपीएलच्या भागधारकांना प्रत्येक १३ शेअरमागे गुजरात गॅसचे १० शेअर मिळणार आहेत. जीएसपीसी एनर्जी लिमिटेड (GEL) चं देखील गुजरात गॅसमध्ये विलिनीकरण होणार आहे.
पहिल्या टप्प्यातील फेररचनेनंतर गुजरात गॅसधील गॅस ट्रान्समिशन व्यवसायाचे जीएसपीएल ट्रान्समिशन लिमिटेड (GTL) या नव्यानं स्थापन झालेल्या कंपनीत विलीनीकरण करण्यात येणार आहे. गुजरात गॅसच्या भागधारकांना प्रत्येक ३ शेअरमागे नव्यानं अस्तित्वात आलेल्या जीटीएलचा १ शेअर दिला जाणार आहे.
गुजरात गॅसच्या शेअरमध्ये आज १० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. या कंपनीच्या शेअरची कामगिरी मागच्या वर्षभरात उत्तम राहिली आहे. मागील एका वर्षात शेअरनं गुंतवणूकदारांना ४७ टक्के नफा मिळवून दिला आहे. तर, यंदाच्या कॅलेंडर वर्षात हा शेअर सुमारे ३८ टक्क्यांनी वाढला आहे.
या सगळ्या घडमोडी मूल्यवर्धक असतील असा अंदाज अँटिक स्टॉक ब्रोकिंगनं व्यक्त केला आहे. या विलीनीकरणाचा उद्देश प्रामुख्यानं कंपन्यांच्या रचनेत सुलभता आणणं हा आहे. विशेषत: गुजरात स्टेट पेट्रोनेट लिमिटेड (GSPL) कडे सध्या असलेल्या गुजरात गॅसच्या समभागांचे मूल्य अनलॉक करणं हा एक उद्देश आहे, असं अँटिक स्टॉक ब्रोकिंगचं म्हणणं आहे. हे विलीनीकरण गुजरात गॅससाठी खूपच लाभदायी असेल. गुजरात गॅसचा शेअर ७२६ रुपयांपर्यंत जाण्याची अपेक्षा असून तो खरेदी करण्याचा सल्ला अँटिक ब्रोकिंगनं दिला आहे.
जीएसपीसीला सध्या देण्यात येणारे ट्रेडिंग मार्जिन काढून टाकल्यास गुजरात गॅसला फायदा होणार आहे, परंतु ट्रेडिंग व्यवसायाचा समावेश केल्यामुळं उत्पन्नातील अस्थिरता वाढेल, असं जेफरीज इंडिया लिमिटेडच्या विश्लेषकांचं मत आहे.