सध्याच्या तरुण पिढीला पैसे कमवण्यासाठी घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे आयुष्य जगण्याचा कंटाळा येऊ लागला आहे. लवकरात लवकर आर्थिक स्वातंत्र्य मिळवून निवृत्त होण्याकडे नव्या पिढीचा अधिक कल दिसतोय. त्यामुळे तरुण वयात म्हणजे चाळिशीच्या आसपास निवृत्ती घेण्याकडे जगात कल वाढतोय. तुम्हीही अशाप्रकारचा विचार करत असाल तर खाली दिलेल्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील.
हुशारीने आर्थिक गुंतवणूक करणे हे सुद्धा एक कौशल्य असते. त्यामुळे तुम्ही चाळीशी गाठेपर्यंत आर्थिकदृष्ट्या स्थिर होऊ शकता. असं म्हणतात की कोणत्याही दोन व्यक्तींचा आयुष्यातला आर्थिक विकासाचा प्रवास एकसमान नसतो. तुमच्याकडे वारसा हक्काने आलेली संपत्ती असेल तर त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या, असा सल्ला मुंबईत आर्थिक सल्लागार म्हणून काम करणारे मयंक पाहुजा देतात.
वयाच्या ४०व्या वर्षी निवृत्त होण्यासाठी तुम्ही वयाच्या ३९व्या वर्षापर्यंत वाट पाहू शकत नाही. दिल्लीतील जाहिरात व्यावसायिक श्रुती रॉय (वय ३३) हिला वयाच्या ४५व्या वर्षी (जास्तीत जास्त वयाच्या ४८व्या वर्षी ) निवृत्ती घेण्याचा विचार आहे. श्रुतीचे लग्न झाले असून १० महिन्यांचे मूल आहे. सध्या ती आपल्या पगारातील ५० टक्के रक्कम बचत योजनांमध्ये टाकते. (यात म्युच्युअल फंड, शेअर्स आणि एक्स्चेंज ट्रेडेड फंडांच्या एसआयपीचा समावेश आहे). श्रुती वयाच्या २९व्या वर्षापासून निवृत्तीसाठी प्लॅन करत आहे. ती दर सहा महिन्यांनी तिची गुंतवणूक चांगली चाललीय की नाही याची खात्री करण्यासाठी सेव्हिंग पोर्टफोलिओकडे जातीने लक्ष देते. किमान दोन कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा तिचा प्रयत्न आहे. असं केल्यांतरच बचतीतला काही भाग आयुष्य जगण्यासाठी काढून घेता येईल आणि उर्वरित रकमेवर चक्रवाढ व्याजाने जगता येईल, असं तिचं म्हणण आहे.
आज केला जाणारा वायफळ खर्च, उद्याचा लाभांश कमी करत असतो. त्यामुळे तुम्हाला स्टारबक्समध्ये जाऊन काही खायचे असेल तर ते करा, परंतु गरज नसताना डिझायनर बॅग घेणे, नाईट-आऊटवर भरमसाठ बिल करणे, व्हीआयपी कॉन्सर्टची महागडी तिकिटे… या सर्व गोष्टींचा पुनर्विचार करा.
फायनान्स प्रोफेशनल सौरभ सुंदर म्हणतात, ‘लवकर रिटायरनेंटचा विचार करणाऱ्यांनी त्यांच्या पहिल्या नोकरीपासूनच पगाराचा काही भाग गुंतवण्याची शिस्त लावली पाहिजे. वयाच्या २०व्या वर्षापासून अशी बचत केल्यास आणखी २० वर्षांनी म्हणजे वयाच्या ४०व्या वर्षी एक मोठी रक्कम जमा होते. या रकमेच्या चक्रवाढ व्याजातून पुढचं आयुष्य आखू शकता.’
रांची शहरात राहणारे विमल सिंह (वय ५६) यांनी ११ वर्षांपूर्वी निवृत्ती घेतली आहे. ते दिल्लीमध्ये बँकर होते. ४० किंवा ४५ व्या वर्षी निवृत्ती घेणं पूर्वीपेक्षा आता अवघड झालय, असं ते स्वानुभवावरून सांगतात. सिंह यांना सुरक्षित नोकरी होती, त्यांचं जगणं साधेपणाचं होतं. त्यांनी गुंतवणुकीला लवकर सुरूवात केली होती. त्यांना दुसरं अतिरिक्त काम करावं लागलं नव्हतं. ‘मी आता माझ्या पत्नीसोबत बागकाम आणि प्रवास करतो. माझा मुलगा वकील असून तो मुंबईत राहतो. मला कधीही त्याच्याकडे मदत मागावी लागलेली नाही. निवृत्तीनंतर मुलाच्या शिक्षणाचा खर्चही व्यवस्थित करू शकलो’ असं सिंग सांगतात. सिंह यांनी दिलेल्या टिप्स: स्मार्ट आर्थिक सल्लागार शोधा आणि बचतीची सवय लावा. विशेषत: सध्याच्या अस्थिर अर्थव्यवस्थेमध्ये तुम्ही गुंतवलेला इमर्जन्सी फंड कोणत्याही जोखमीच्या साधनांमध्ये किंवा शेअर्समध्ये गुंतवला जाणार नाही याची काळजी घ्या.
लवकर रिटायरमेंट घेऊन स्वप्नवत जगण्याचा दावा करणारे अनेकदा त्यांच्या ‘सेफ्टी नेट’ उघड करत नाहीत. वयाच्या ३५ व्या वर्षी संपूर्ण होमलोन फेडल्याचा दावा करणारे सहकारी आपल्या वडिलांकडून भरमसाठ डाउनपेमेंट घेतले होते, हे अनेकदा कबूल करत नाहीत. Early Retirement घेणाऱ्या महिलांचा बहुतेक खर्च त्यांचे पती उचलत असतात, हेही वास्तव आहे. चाळिशीत निवृत्ती घेण्यासाठी उशिरा गुंतवणूक करण्यास सुरुवात केल्यामुळे अनेकांना साध्या जीवनशैलीने त्याची भरपाई करावी लागते. अशावेळी सतत बाहेर जेवायला जाणे, सिनेमाला जाणे किंवा नवीन कपडे किंवा शूज खरेदी करणे परवडण्यासारखे नसते.
मुंबईचे आर्थिक सल्लागार मयंक पाहुजा यांच्यानुसार अधिकचा परतावा मिळवण्यासाठी काही जण उच्च जोखीम असलेल्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करतात. परंतु त्या जोखमींचे व्यवस्थापन कसे करावे याकडे क्वचितच लक्ष देतात. काहींना दीर्घकालीन गुंतवणूक योग्य वाटते. परंतु दीर्घकालीन गुंतवणूक हाही एकमेव उपाय नाही. उच्च जोखमीच्या ज्या गुंतवणुकीतून फारसं काही हाती लागत नसेल तर त्यातून बाहेर पडा आणि पुढे जा, असा सल्ला पाहुजा देतात. विमल सिंग यांनी वयाच्या २७व्या वर्षी म्हणजे पहिल्या नोकरीनंतर पाच वर्षांनी गुंतवणूक करायला सुरूवात केली होती. त्यांच्या मते Early Retirementची योजना आखताना नोकरी करतानाचे जीवनही सुखकर जगायला हवे. बचत करण्यात घालवलेल्या वर्षांमध्ये जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा त्यातील काही संपत्तीचा उपभोगही घेणे आवश्यक असते. मन आणि शरीराला त्या आनंदापासून वंचित ठेवू नका, असा सल्ला सिंह देतात.
संबंधित बातम्या